Monday 27 July 2015

आता फक्त पाच वर्ष



नेहरु जसे मुलांचे चाचा आणि देशाचे भाग्यविधाते पंतप्रधान होते. तसे एपीजे अब्दुल कलाम मुलांचे दुसरे चाचा आणि देशाचे भाग्यविधाते राष्ट्रपती होते.

एपीजे अब्दुल कलाम मिसाईल मॅन होते. त्याहीपेक्षा त्यानी देशाला आणि उ़द्याच्या पिढीला नवे अग्निपंख दिले. Wings of Fire.

20-20 मध्ये रमणार्‍या पिढीला त्यांनी 20-20चं स्वप्न दिलं. उ़द्याचा भारत घडवण्यासाठी. देशाला महासत्ता बनवण्यासाठी. 

कलाम म्हणत असत, 'स्वप्न खरी होण्याआधी स्वप्न पहायला लागतात. कधी हार मानू नका. संकटांना आपल्यावर कुरघोडी करु देऊ नका. मोठी स्वप्नं पहा, मोठे व्हा. अन्‌ देशही मोठा करा.'

स्वतः बरोबर देशालाही मोठं करण्याचं स्वप्न उ़द्याच्या पिढीत पेरणारे कलाम चाचा खरे भारतरत्न होते.

ही पिढी खरंच भाग्यवान ज्यांना कलाम चाचा पाहता आले. कलाम चाचांना पाहत मोठी होणारी ही पिढी.

तुमचा आवडता नेता कोण? असं कोणत्याही लहान मुलांना विचारलं की, ते एकच नाव सांगत, एपीजे अब्दुल कलाम. मुलांना राष्ट्रपतींची नावं विचारा ते पहिलं नाव घेतील एपीजे अब्दुल कलामांचं.

निहायत साधेपणा हे त्यांचं वैशिष्ट्य. मोठी माणसं खरच खूप साधी असतात.

देशाच्या सगळ्या ऩद्याचं, दोन्ही बाजूच्या समुद्राचं तीर्थसार ज्या रामेश्वरमला एकवटतं त्या रामेश्वरमचे होते कलाम. देशाच्या मिश्र संस्वृत्र्तीचे ते मूर्तीमंत प्रतिक होते. त्यांनी लग्न केलं नव्हतं म्हणून त्यांना मुलं बाळ नव्हती. पण त्यांच्या मागे या देशाची सारी मुलं आहेत. 20-20 उजाडायला आता फक्त पाचच वर्षे आहेत. पण किती लांब. मिसाईल सोबत नाही पण मिसाईलचा वेग, त्या वेगाने स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा पेरुन गेला हा मिसाईल मॅन.

कलाम चाचांना अखेरचा सलाम!
______________________

अध्यक्ष, लोक भारती
आमदार, मुंबई शिक्षक मतदार संघ



No comments:

Post a Comment