Monday 29 February 2016

सर्वज्येष्ठ समाजवादी नेता हरपला


निहाल अहमद गेले. महाराष्ट्रातील सर्वज्येष्ठ समाजवादी नेता हरपला. कॉंग्रेसमधून समाजवादी गटाने स्वतंत्र होऊन आचार्य नरेंद्र देव यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथे समाजवादी पक्ष स्थापन केला. तेव्हापासून निहाल अहमद समाजवादी आंदोलनात होते. स्वातंत्र्य  चळवळ, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन आणि आणीबाणीत लोकशाहीसाठी दिलेला लढा यात ते अग्रेसर राहिले. तुरुंगवास भोगला. 

मालेगावमधील त्यांच्या भूमिकांमुळे ते अनेकदा वादग्रस्त ठरले. परंतु हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि धर्मनिरपेक्षता यावरील त्यांची निष्ठा वादातीत होती. ते स्वतःला गंडेदार मुसलमान म्हणवत. गंडेदार म्हणजे खास भारतीय परंपरा पाळणारा मुसलमान. मुस्लिम सुधारक हमीद दलवाई मालेगावला आले तेव्हा सनातन्यांचा विरोध असूनही निहाल भाईनी त्यांचं हार घालून स्वागत केलं. 

शरद पवारांच्या पुलोद सरकारमध्ये ते मंत्री ही होते. बापूसाहेब काळदाते किंवा निहाल अहमद मुख्यमंत्री व्हावेत अशी एस. एम. जोशींची इच्छा होती परंतु जनता पक्षातील संघाच्या गटामुळे नेतेपदाच्या निवडणुकीत त्यांची हार झाली. आयुष्यभर ते निरलसपणे  आणि निस्वार्थपणे जगले. मालेगावात ते सायकलवरूनच फिरायचे. आमदारांना तेव्हा वाहन भत्ता नव्हता. ते पाहूनच वसंतदादा पाटील आणि शिवाजीराव देशमुख यांनी आमदारांच्या पगारवाढीचा प्रस्ताव आणला होता. 



हिंदुत्ववादी  आंदोलनाने बाबरी मशिद पाडल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला होता. तेव्हापासून अखेरपर्यंत ते शर्टाच्या बाहीवर काळी रीबिन लावत असत. परंतु  मनात त्यांनी कधीही कटुता बाळगली नाही. भाजप नेत्यांशी त्यांचे व्यक्तिगत संबंध होते. दलित, ओबीसी, आदिवासी हे त्यांचे आस्थेचे विषय होते. लोकशाही, समाजवादावरची त्यांची श्रद्धा अढळ होती. 

निहाल भाईना विनम्र आदरांजली. 

- कपिल पाटील,
अध्यक्ष, लोकभारती.

No comments:

Post a Comment