Wednesday 13 April 2016

भारत भाग्यविधाते डॉ. आंबेडकर





सूर्यमालेतील शनी ग्रहाला देव मानायचे की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण एकदा त्याला तशी मान्यता दिली गेली असेल तर त्यावर श्रद्धा असणार्‍या स्त्रियांना त्याचं दर्शन घेऊ द्यायचं की नाही? स्त्रिया अपवित्र असतात, त्या जवळ गेल्या तर शनी कोपेल असं धर्ममार्तंड सांगतात. शंकराचार्य त्याही पुढे गेले. स्त्रियांनी शनी पूजा केली तर बलात्कार वाढतील म्हणे. शंकराचार्य तिथेच थांबले नाहीत. गेले वर्षभर ते बरळताहेत, साईबाबांची पूजा करू नका म्हणून. परवा तर ते म्हणाले, साई पूजा महाराष्ट्रात होते म्हणून राज्यात दुष्काळ पडला आहे.
                                         
प्रबोधनकार ठाकरे असते तर शंकराचार्यांची जीभच हासडली असती. तुकाराम महाराजांनी तर सांगूनच ठेवले आहे की जळो त्यांचे तोंड़. देशात नवं सरकार आल्यापासून मंबाजीची तोंडं दहा झाली आहेत. परवापर्यंत ते काय खायचं, काय खाऊ नये हे ठरवू लागले होते. दोन महिन्यापासून देशभक्त कोण हे ठरवण्याचा मक्ता त्यांनी घेतला आहे. आता श्रद्धा कशावर ठेवावी हेही ते सांगू लागले आहेत. त्यांचा हिंदुत्वाचा अजेंडा त्यांनी लपवून ठेवला नव्हता. सत्ता आल्याने त्यांना आता बळ मिळालं आहे. शंकराचार्यांपासून ते रामदेवबाबा, योगी आदित्यनाथ ते साध्वी निरंजन ज्योती यांच्यासारखी मंडळी बेभान सुटली आहेत. 

तुकारामांना छळणार्‍या मंबाजीची ही पिलावळ आहे. ज्ञानेश्‍वर आणि त्यांच्या भावंडांना बहिष्कृत करणार्‍यांचे ते वारसदार आहेत. सनातन्यांचं ऐकून महात्मा बसवेश्‍वरांना मारण्याचा आदेश देणार्‍या बल्लभाची राजवट कशी असेल, याची आठवण यावी असं देशात वातावरण आहे. संत मीराबाईंना आणि संत रोहिदासांना छळणार्‍या धर्ममार्तंडांची गादी आजही शंकाराचार्य चालवत आहेत. त्यांचं सध्याचं टारगेट साईबाबा आहेत.


आजही ज्यांच्या डोक्यात आणि व्यवहारात मनुस्मृतीचा कायदा कायम आहे, त्यांना सांगायला हवं की, हा देश मनुस्मृतीने नाही भीमस्मृतीने चालतो. बाबासाहेबांच्या संविधानाने चालतो. बाबासाहेबांचं संविधान नसतं तर या देशातल्या सगळ्या स्त्रियांची आणि बहुजनांची स्थिती काय असती याचा विचारही करवत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आपल्यावर किती उपकार आहेत याची पुन:पुन्हा आठवण यावी. उद्या या महामानवाची १२५वी जयंती आहे. उद्याचा दिवस सणासारखा साजरा केला पाहिजे. उद्याचा दिवस माणुसकीचा उत्सव आहे. समता पर्वाचा दिवस आहे. न्यायाची गुढी उभारण्याचा दिवस आहे. 

बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला ते हिंदूंवरती मोठे उपकार आहेत, असं सांगण्याची हिंदुत्ववादी परंपरा आहे. पण बाबासाहेबांनी बौद्ध धर्म ईहवादी, विज्ञाननिष्ठ आहे, म्हणून धम्मचक्र फिरवलं. त्यांनी धर्मांतराचा जो प्रचंड धक्का दिला त्यातून हिंदू धर्म आणि समाज अंधश्रद्धा आणि शोषणाच्या कर्दमातून बाहेर पडण्याची वाट मोकळी झाली. माणसाला माणूस म्हणून ओळख मिळाली. 

आज देश एक आहे. या देशाची लोकशाही जिवंत आहे. न्याय मागण्याचा रस्ता मोकळा आहे. राज्य कायद्याने चालण्याची व्यवस्था आहे. या सगळ्याचं कारण या देशाला एक जबरदस्त संविधान आहे. जे संविधान माझ्या बाबासाहेबांनी लिहिलं आहे याचा अभिमान प्रत्येक भारतीयाने बाळगला पाहिजे. युगपुरुष, बोधीसत्व, क्रांतीसूर्य आणि भारतरत्न या सार्थ शब्दांनी डॉ. भीमराव रामजी आंबेडकर या महामानवाचे वर्णन केलं जातं. पण भारतीय संदर्भात त्यांचं वर्णन आणखी एका विशेषणाने करावं लागेल. भारत भाग्य विधाता! या देशाच्या राष्ट्रगीतातले हे तीन शब्द आहेत. जन गण मन, अधिकनायक जय हे, भारत भाग्य विधाता. भारताच्या निर्मात्यांचं विशिष्ट शब्दांनी सार्थपणे वर्णन केलं जातं. वल्लभभाई पटेलांना गांधीजीनींच सरदार म्हटलं. रवींद्रनाथ टागोरांना गुरुदेव म्हटलं. सुभाषबाबूंना नेताजी म्हटलं. महात्म्यांचे महात्मा असं जोतीराव फुले याचं वर्णन खुद्द महात्मा गांधींनीच केलं. त्या मोहनदास करमचंद गांधी यांना सर्वप्रथम नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आणि नंतर पंडित नेहरू यांनी राष्ट्रपिता म्हणून संबोधलं. महात्मा गांधी यांचं राष्ट्रपिता म्हणून स्थान अढळ आहे. देशाला स्वातंत्र्य त्यांच्याच नेतृत्वाखाली मिळालं. गांधी आणि आंबेडकर यांच्यातला संघर्ष इतिहासातून पुसून टाकता येणार नाही. पण या देशाचं भविष्य, या देशाचं भाग्यविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातूनच लिहिलं जाईल याचा संकेत खुद्द गांधींच्याच आग्रहात होता. पहिल्या मंत्रिमंडळात आणि घटना समितीत बाबासाहेब हवेत हा गांधींचा आग्रह होता. म्हणून सरदार पटेल आणि पंडित नेहरू यांना बाबासाहेबांसाठी आग्रही राहवं लागलं. तिघांचाही डॉ. आंबेडकरांच्या विद्वत्तेवर, द्रष्टेपणावर, देशनिष्ठेवर आणि त्यांच्यातल्या महामानवावर तितकाच विश्‍वास होता. देशाला एकत्र बांधून ठेवू शकेल. मध्ययुगाच्या मानसिकतेतून बाहेर काढू शकेल, आधुनिक विश्‍वाचा नागरिक म्हणून प्रत्येक भारतीयाला उभं करू शकेल, असं संविधान बाबासाहेबच देऊ शकतात हा विश्‍वास होता. आज आपण प्रत्यक्षात अनुभवतो आहोत. आपण खरंच भाग्यवान. म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर ठरतात भारत भाग्य विधाते!

- कपिल पाटील
(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)

पूर्वप्रसिद्धी -  दै. पुण्यनगरी  १३ एप्रिल २०१६ 

4 comments:

  1. Supperb kapil ji great thought. ..

    ReplyDelete
  2. कपीलजी पाटिल सर,
    बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वास सुयोग्य शब्दांमध्ये रूपांतरीत केलत

    ReplyDelete