Thursday 17 November 2016

ट्रम्प का जिंकले?

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले आहेत. लोकशाही मार्गाने निवडून आले आहेत. अमेरिकेच्या लोकांनी त्यांना निवडून दिलं आहे. तरीही अमेरिकेतल्या रस्त्यांवर अमेरिकन जनता उतरली आहे. ‘Not my President.’ ‘We are not Trump’s America’ असे फलक फडकवत निकालाच्याच दिवशी लोक रस्त्यावर उतरले होते. आठवडा उलटूनही मोर्चे थांबलेले नाहीत.

नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा असं कुणी रस्त्यावर उतरलं नव्हतं.  मोदींना प्रचंड विरोध असूनही विरोधकांनी तो असा रस्त्यावर व्यक्त केला नव्हता.  भारतीय लोकमताचा कौल देशातल्या विरोध पक्षांनी स्वीकारला होता. अगदी दादरी, ऊना, जेएनयू आणि रोहीत वेमुला प्रकरण घडेपर्यंत,  मोदी विरोधाला टोक आलं नव्हतं. अमेरिकेत मात्र पहिल्याच रात्री असंतोष रस्त्यावर व्यक्त झाला.

तिथल्या टीव्हीवरचं डिबेट तर हिलरी क्लिंटननी जिंकलं होतं. कुणीच कल्पना केली नव्हती की, ट्रम्प निवडून येतील. ट्रम्प निवडून आले आणि अमेरिकेतच नाही, जगात राजकीय भूकंप घडला.

'गार्डियन'ने लिहिलं ‘A dark day for the world’.

ट्रम्पच्या स्पर्धक हिलरी क्लिंटन आणि त्यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाने आपली हार मान्य केली. निवडणुकीचा कौल स्वीकारला. मोदींचा विजय असाच सोनिया गांधींनी स्वीकारला होता. राहुल गांधींनी मान्य केला होता. लालकृष्ण अडवाणी यांनीही पचवला होता. निकालानंतरचे ते दिवस आठवा. गुजरातचा भूतकाळ विसरून मोदींचं स्वागत त्यांचे विरोधकही करत होते. अमेरिकेत मात्र असं घडले नाही. ट्रम्पना विरोध करणाऱ्यांना तिथे अजून कुणी देशद्रोही ठरवलेलं नाही.

'द न्यू यॉर्कर'मध्ये डेव्हिड रेमनीक यांनी 'AN AMERICAN TRAGEDY' या शीर्षकाखाली लिहिलंय, 'The election of Donald Trump to the Presidency is nothing less than a tragedy for the American republic, a tragedy for the Constitution, and a triumph for the forces, at home and abroad, of nativism, authoritarianism, misogyny, and racism.'

निवडणुकीची जी पद्धत स्वीकारली आहे, त्या पद्धतीत दोष असले तरी त्यातून आलेला निकाल मान्य करावाच लागतो. अमेरिकन निवडणुकीतले पॉप्युलर व्होटस् मोजले तर हिलरी क्लिंटन यांच्या पारड्यात ट्रम्प यांच्यापेक्षा जास्त मतं आहेत. ट्रम्प यांना ६०,२६५,८४७ इतकी मतं मिळाली आहेत. तर क्लिंटनबाईंना ६०,८३९,४९७. पण राज्यनिहाय मतांच्या मूल्यानुसार ट्रम्प यांनी आघाडी घेतली. अमेरिकेची निवडणूक प्रक्रिया अत्यंत किचकट आहे. तरीही ट्रम्प यांना निम्म्या अमेरिकेने स्वीकारलं आहे, हे मान्यच करावं लागेल. मोदींच्या पक्षाला फक्त ३० टक्के मतं होती. मित्र पक्षांसह ३९ टक्के मतं होती. याचा अर्थ ६१ टक्के लोकांनी मोदी किंवा भाजपा विरोधातील पक्षांना मतदान केलेलं आहे. सर्वाधिक जागा ज्या पक्षाला किंवा आघाडीला मिळतात त्यांची सत्ता येते. निवडणूक प्रक्रियेतील या तुटीबद्दल ती बदलत नाही तोवर दोष देता येत नाही. पण सत्ता मिळाली याचा अर्थ मनमानीला परवाना नाही. देशाच्या घटनेला स्मरून शपथ घ्यावी लागते. संविधानिक चौकटीत काम करावं लागतं. संविधानिक मूल्यांचा आदर करावा लागतो.

५० टक्के किंचीत उणे अमेरिकेने ट्रम्प यांना स्वीकारलं, ५० टक्के किंचित अधिक अमेरिकेने ट्रम्प यांना नाकारलं आहे. स्वीकारणं आणि नाकारण्याची कारणं समान आहेत.

ट्रम्प कमालीचे वंशद्वेषी आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षपदी गेली ८ वर्षे काळ्या रंगाचे ओबामा आहेत. अमेरिकेतल्या अनेक गोऱ्यांना ते मान्य नाही. त्यांच्या मनातला विखार ट्रम्प उघडपणे बोलून दाखवतात. काळ्यांचा द्वेष करतात. बाहेरच्या देशातून येणारे लोंढे ट्रम्प यांना मान्य नाहीत. मेक्सिको सीमेवर त्यांना भिंत बांधायची आहे. ट्रम्प मुसलमानांचा उघड द्वेष करतात. ओबामा आणि क्लिंटन यांना त्यासाठी हिणवतात. ट्रम्प स्त्रियांचा द्वेष करतात. असभ्य भाषेत टीपणी करतात.

अमेरिकेतल्या सुजाण जनतेला हे मान्य नाही. अमेरिकेत हिस्पॅनिक, लॅटीनो, ज्यू, मुस्लिम, आफ्रो अमेरिकेन आणि इतर रंगाचे लोक हे सारे अल्पसंख्य आहेत. ट्रम्प यांनी हिंदू आणि भारतीयांबद्दल दोन शब्द चांगले व्यक्त केले, म्हणून हुरळून जाण्याचं कारण नाही. 'हुरळली मेंढी, लागली लांडग्याच्या पाठी', अशी एक ग्राम्य म्हण आहे. ती इथं वापरणं कितपत योग्य याबद्दल आक्षेप घेतला जाईल. त्याबद्दल क्षमा मागून सांगितलं पाहिजे की, ट्रम्प यांच्यासाठी जे बाहेरचे आणि इतर रंगाचे आहेत, त्यात भारतीय आणि हिंदूही येतात. पण वर्णद्वेषी गोऱ्यांप्रमाणे बाहेरचे आणि इतर रंगांचे यांचा द्वेष सगळेच अमेरिकन गोरे करत नाहीत. अगदी ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या अनेकांना हा द्वेष मान्य नाही. भारतातही बहुसंख्य हिंदूंना द्वेषाचं राजकारण मान्य नाही.

अमेरिकेची अर्थव्यवस्था अडचणीत आहे. बेकारी वाढते आहे. रोजगार मेक्सिको, चीन, भारत, बांगलादेश आणि व्हिएतनामने पळवून नेला आहे. साध्या गॅस सिलेंडरची ऑर्डर द्यायची असेल तर फोन बंगलोरच्या कॉल सेंटरला करावा लागतो. सॉफ्टवेअर भारतात तयार होतं. सगळ्याच वस्तू चीनमध्ये. मोटारी मेक्सिकोत आणि कपडे बांगलादेश, व्हिएतनाममध्ये. दुसऱ्या बाजूला शिक्षण प्रचंड महाग होत चाललं आहे. ड्रॉप आऊटची संख्या वाढते आहे. तरुणांमधल्या वाढत्या असंतोषावर बोट ठेवत बर्नी सॅन्डर्स यांनी डेमॉक्रेटिक पक्षाची उमेदवारी मागितली. पण पक्षांतर्गत निवडणुकीत अनुभवी अन् मुत्सद्दी हिलरीने त्यांना मात दिली. सॅन्डर्स समानतेची, समाजवादाची मागणी करत होते. असंतोषाच्या त्याच ठिणग्यांना रंग, धर्म आणि बाहेरचे यांच्या द्वेषाचा वारा देत डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकन उमेदवारी जिंकली. जगाच्या सुपरपॉवरचं अध्यक्षपदही पटकावलं.

हिलरी क्लिंटन यांनी ट्रम्प यांना धोका कधीच मानलं नव्हतं. बर्नी सॅन्डर्स नास्तिक कसे आहेत, याचे मेल पाठवून त्यांना उमेदवारीच्या स्पर्धेतून बाद करण्यासाठी हिलरी क्लिंटन डाव रचत राहिल्या. तोच डाव त्यांच्यावर उलटला. सॅन्डर्स सर्मथक मतदार त्यामुळे उदासिन राहिले. ट्रम्प जिंकले. एक स्त्री राष्ट्राध्यक्ष होऊ शकली नाही.

अमेरिकेसाठी आणि जगासाठी ही वाईटाची सुरुवात होऊ नये इतकंच...

(लेखक, मुंबईचे शिक्षक आमदार आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)


पूर्वप्रसिद्धी - दै. पुण्यनगरी, दि. १६ नोव्हेंबर २०१६

3 comments: