Wednesday 27 November 2019

त्या तिघांचं सरकार 


संयम, निर्धार आणि चिकाटी दाखवली की काय घडतं ते उद्धव ठाकरे यांनी करून दाखवलं आहे. भाजपला दूर सारत महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात उद्या स्थापन होत आहे. शिवाजी पार्कवर उद्या शपथविधी होईल आणि तिघाचं सरकार महाराष्ट्राला मिळेल. तिघांचं म्हणजे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं नाही. तिघांचं म्हणजे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि संजय राऊत यांचं. या तिघांशिवाय अन्य कुणालाही या सरकारचं श्रेय देता येणार नाही. काँग्रेसचे गटनेते खुद्द बाळासाहेब थोरात यांनी परवा कबुली दिली की संजय राऊतांशिवाय हे सरकार येणं शक्यच नव्हतं. संजय राऊत यांची एकहाती लढाई होती. किती दडपण असेल त्यांच्यावर. लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल होत हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्त वाहिन्यांमधले दोन ब्लॉक त्यांनी काढून घेतले. पण पुढे वाढून ठेवलेले दोन मोठे राजकीय ब्लॉकही दूर करण्यात त्यांना यश मिळालं. ते मिळालं नसतं. तर काय झालं असतं? कल्पना करता येणार नाही. पण उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यावर कमालीचा विश्वास दाखवला.

शरद पवार यांना सलाम करायला हवा. नुसती बाभूळझाडाची उपमा थिटी पडावी. वारा खात, गारा खात बाभूळ झाड उभेच आहे. हे वर्णन अपुरं आहे. महाराष्ट्राच्या विराट राजकीय वृक्षाची कल्पना केली तर ती पवारांना चपखल बसेल. त्यांच्या फांद्यांवरच आघात झाले. प्रतिष्ठा पणाला लागली. प्रश्न विश्वासार्हतेचाही होता. पण पवार साहेब पुरून उरले. राजकीय शिष्टाचार, सभ्यता आणि संस्कृती यांचं दुसरं नाव म्हणजे शरद पवार. त्या शिष्टाचारापोटी ते पंतप्रधान मोदींना भेटले तरी शंकांचा धुराळा उडायचा. अजितदादांच्या 'त्या' निर्णयाने तर शरद पवारांचं राजकीय चरित्र पणाला लागलं होतं. पण उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील हा निर्णय ज्यादिवशी शरद पवारांनी खरा करून दाखवला त्याक्षणी त्यांच्या राजकीय उंचीने देश स्तिमीत झाला.

शिवसेना ही महाराष्ट्रातील सामान्य बहुजनांची संघटना. नाव प्रबोधनकारांनी दिलेलं. पण वाढवलं बाळासाहेब ठाकरे यांनी. मराठी मनाचा हुंकार बाळासाहेबांनी जागवला आणि मराठी अस्मितेचा ते स्वतःच एक भाग बनले. पुढे शिवसेना भाजप बरोबर गेली आणि भाजपच मोठा झाला. हिंदुत्वाच्या राजकारणात मराठीचा आणि शिवसेनेचा बळी गेला. त्या शिवसेनेला पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम ज्यांनी केलं त्यात शरद पवार, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे या तिघांचाच वाटा आहे. सरकार बनवण्यापेक्षा हे काम खूप मोठं आहे. विमानतळावरून राष्ट्रवादीचे फुटलेले आमदार पकडून आणणं, नव्या मित्र पक्षांशी बोलणं, भाजपला निर्धाराने दूर करणं हे झाले घटनाक्रम. पण उद्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बनणारं सरकार हे जाती धर्माच्या आणि द्वेषाच्या राजकारणातून महाराष्ट्राला बाहेर काढणारं असणार आहे. म्हणून ही घटना मोठी आहे. ऐतिहासिक आहे. म्हणून हे सरकार या तिघांचंच सरकार आहे.

महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांचा वारसा आहे. महात्मा जोतीराव फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आहे. ही तीन नावं घेत महाराष्ट्र भाजपापुढे झुकणार नाही, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनीच जाहीर केला, तोच टर्निंग पॉईंट होता. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महाराष्ट्र विकास आघाडीला लोक भारतीच्या वतीने म्हणून मी पाठिंबा जाहीर केला. तो करताना प्रबोधनकार ठाकरेचं नाव मी जोडलं. त्याची दखल नेत्यांपासून तिन्ही पक्षांच्या आमदारांनी खचाखच भरलेल्या सभागृहाने घेतली. प्रबोधनकार ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे आजोबा. पण ही झाली उद्धव ठाकरे यांना मानत असलेल्या पिढीला असलेली ओळख. प्रबोधनकार सत्यशोधक होते. फुले, शाहू, आंबेडकर या  विचारधारेतील चौथे सर्वात मोठे नाव आहे. समतावादी आणि डाव्या पुरोगामी चळवळीतही प्रबोधनकारांचा उल्लेख आदराने होतो. संयुक्त महाराष्ट्राच्या पाच शिल्पकारांपैकी ते एक होते. शाहू महाराजांचे पाठिराखे होते. ब्राह्मणेतर चळवळीचे लढवय्ये नेते होते. तो मोठा वारसा उद्धव ठाकरे यांच्या मागे आहे. म्हणूनच त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यांच्याबद्दल एक विश्वास आहे. आणि उद्धव ठाकरे स्वतः म्हणालेही, 'तीस वर्षे ज्यांच्या सोबत होतो त्यांनी विश्वास ठेवला नाही. मात्र तीस वर्षे ज्यांच्याशी सामना केला त्यांना मात्र माझ्या (उद्धव ठाकरे) नेतृत्वावर विश्वास ठेवला.'

शरद पवार स्वतः सत्यशोधक विचारांचे आहेत. त्यांच्या आई शारदा पवारांकडून आणि यशवंतराव चव्हाणांकडून त्यांना हा वारसा मिळाला. बाळासाहेब ठाकरे, जॉर्ज फर्नांडीस आणि शरद पवार ही मैत्री सर्वांना माहित आहे. स्वतः पवारांनी त्याचा उल्लेख केला. पण पवार साहेब केवळ मैत्रीतून निर्णय घेत नाहीत. महाराष्ट्राचा इतिहास, परंपरा आणि महाराष्ट्राची सामाजिक भूमी यांच्या जाणीवेतून ते निर्णय घेतात. ते सत्यशोधकीय नातं पुन्हा प्रस्थापित करण्याची संधी उद्धव ठाकरेंच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घालून त्यांनी घेतली असणार हे स्वाभाविक आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही संधी आहे. त्याहीपेक्षा मोठं आव्हान आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचं प्रीअँबल आश्वासक आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून म्हणूनच खूप अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा त्यांना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केल्या आहेत.

पण त्याआधी एक आठवण सांगायला हवी. मी आज दिनांकचा संपादक होतो. आज दिनांक दुपारचा पेपर असला तरी तुफान खपत होता. गाजत होता. महाराष्ट्रात युतीचं सरकार होतं. एक दिवस अचानक स्वतः उद्धव ठाकरेंनी मला फोन केला. आणि विचारलं. तेव्हाच्या दादर लोकसभा (म्हणजे मुंबई उत्तर मध्य) मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार होता का? मी नाही म्हणालो. त्यांनी दुसऱ्यांदा फोन करून पुन्हा विचारलं. मी त्यांना नम्रपणे म्हणालो, 'मी तुमचा आभारी आहे. पण वैचारिक मतभेदांमुळे मला सेनेत कधीच येता येणार नाही.' ते फक्त हसले. म्हणाले, 'त्याने काय फरक पडतो. आमच्याकडे नवलकर, दत्ता नलावडे आहेतच ना.' मी नाही वरती ठाम राहिलो. पण तेव्हापासून उद्धव ठाकरेंच्या बद्दल माझ्या मनात कायम कृतज्ञतेची भावना राहिली आहे. शिवसेनाही भाजपचा हात सोडून नवं काही घडवू मागत आहे. काल ट्रायडेंटमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीला पाठिंबा देताना ती जपून ठेवलेली कृतज्ञतेची भावना मी व्यक्त केली इतकंच.

महाराष्ट्र विकास आघाडीला पाठिंबा देताना व्यक्त केलेल्या अपेक्षा - 

दिनांक : २६ नोव्हेंबर २०१९
प्रति,
मा. श्री. उद्धवजी ठाकरे
विधिमंडळ नेते, महाराष्ट्र विकास आघाडी

महोदय,
भाजपला सत्तेपासून दूर ठेवत छत्रपती शिवराय, महात्मा जोतीराव फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या विचारांचं सरकार आपल्या नेतृत्वात स्थापित होत आहे, या अपेक्षेने आणि विश्वासाने लोक भारती पक्षाच्या वतीने मी महाराष्ट्र विकास आघाडीस समर्थन देत आहे.

महाराष्ट्रातील उद्ध्वस्त शेतकरी, बेरोजगार होणारा कामगार, वैफल्यग्रस्त बेरोजगार तरूण, त्रस्त शिक्षक, वंचित पीडित वर्ग आणि अल्पसंख्यांक समुदायांना न्याय देण्याचं काम आपण कराल याचा विश्वास आहे. महाराष्ट्रात शिक्षण व्यवस्था गेल्या पाच वर्षात पार कोलमडून पडली आहे. ती दुरूस्त करून शिक्षणातून ज्या भावी पिढ्या घडतात त्यांना आपल्या सरकारकडून दिलासा मिळेल ही अपेक्षा आहे. महाराष्ट्राच्या शैक्षणिक परंपरेतील इतिहास, अस्मिता आणि समतेची वैचारिक बैठक पुन्हा अभ्यासक्रमात पुनर्स्थापित व्हावी ही सुद्धा शिक्षक आमदार म्हणून माझी अपेक्षा आहे.

महाराष्ट्र आणि मुंबईच्या जैविक नात्यावर घाला घालणारे बुलेट ट्रेन सारखे महाकाय प्रकल्प, आदिवासी-शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे वाढवण व नाणार प्रकल्प आणि 'आरे'त घुसखोरी करणारी मेट्रोची कारशेड आपण रद्द कराल याचीही खात्री आहे.

प्रबोधनकारांचा वैचारिक वारसा अधिक घट्ट करत महाराष्ट्राला न्याय व विकास देणारं सक्षम सरकार आपण देणार आहात म्हणून तुम्हाला विधान परिषदेतील लोक भारती पक्षाचा सदस्य या नात्याने मी आज संविधान दिनी विश्वास आणि समर्थन देत आहे. धन्यवाद!

आपला स्नेहांकित,

कपिल पाटील, वि.प.स.
अध्यक्ष, लोक भारती


प्रसिद्धी - पुण्यनगरी,  २८ नोव्हेंबर २०१९

31 comments:

  1. Jai Maharashtra saheb

    ReplyDelete
  2. सर आपण दिलेला पाठिंबा हे एक योग्य निर्णय आहे आणि हे ऐतिहासिक निर्णय आहे.अल्पसंख्यांक समाजासाठी व सर्व बहुजनांच्या साठी आपण करत असलेल्या कामाबद्दल आमचा आपल्याला सलाम आहे. आमची एकच अपेक्षा आहे ही या मंत्रिमंडळात आपला देखील सहभाग असावा जे शिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणेल

    ReplyDelete
  3. आपलाही या मंत्रिमंडळात समावेश व्हावा असे मनापासून वाटते

    ReplyDelete
  4. शालेय शिक्षण खात्यात बरंच काम बाकी आहे. आपणासारखा अभ्यासू आमदार च या खात्यास योग्य तो न्याय देऊ शकेल.विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक्रम, संस्था प्रत्येकाचे वेगवेगळे प्रश्न आहेत.

    ReplyDelete
  5. भावी शिक्षण किंवा समाज कल्याण खाते आपल्याला मिळाली तर महाराष्ट्राचे नवनिर्माण होईल.

    ReplyDelete
  6. भावी शिक्षणमंत्री

    ReplyDelete
  7. कपिल, तुझ्या निर्णयनिर्णयाला माझा मनापासून पाठिंबा आहे. (अंकुश जाधव).

    ReplyDelete
  8. कपिल, तुम्ही घेतलेल्या निर्णयाला माझा मनापासून पाठिंबा.(अंकुश जाधव)

    ReplyDelete
  9. जय हो मा.कपिल पाटील साहेब

    ReplyDelete
  10. शिक्षकांची कळकळ असलेला नेता

    ReplyDelete
  11. तुझा निर्णय योग्य आहे. समाजासाठी व सर्व बहुजनांच्यासाठी तु करत असलेल्या कामाबद्दल आम्हाला तुझा अभिमान वाटतो. आमची एकच इच्छा आहे की या मंत्रिमंडळात तुझा देखील सहभाग असावा असं आम्हाला मनापासून वाटते.
    तुझ्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून भरपूर शुभेच्छा !

    ReplyDelete
  12. आपण घेतलेल्या निर्णयाचे आम्ही सर्व शिक्षक स्वागत करतो
    शिक्षणाची होत असलेली दयनिय अवस्था आता बघवत नाही त्यामुळे शिक्षकांचा सन्मान कमी होत आहे पंरतू तुम्ही घेतलेल्या निर्णयाचे आम्हांला प्रेरणा व ऊर्जा मिळाली नवमहाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आम्ही सदैव आपणाबरोबर आहोत
    सलाम

    ReplyDelete
  13. मा.कपिल पाटील सर,
    विद्यार्थी, शिक्षण व शिक्षक, शिक्षकेत्तर
    या सर्वांच्या ऊत्कर्षासाठी शालेय शिक्षण खाते
    मिळावे,ही मनोमन इच्छा.

    ReplyDelete
  14. योग्य निर्णय.

    ReplyDelete

  15. मा..कपिल पाटील सर, आपणास विद्यार्थी,शिक्षण,शिक्षक
    शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उत्कर्षासाठी शालेय शिक्षण विभाग
    खाते मिळावे ,ही मनोमन इच्छा.
    ------अशोक हिरे सर

    ReplyDelete
  16. आपल्या सारख्या जाणकार व शिक्षण प्रिय व्यक्तीस शालेय शिक्षण मंत्री केले तर ठीक नाही तर.. फिर वही दिन.

    ReplyDelete
  17. ना सत्तेसाठी ना स्वार्थासाठी, फक्त शिक्षणाच्या हक्कासाठी आणि शिक्षकांच्या सन्मानासाठी.

    ReplyDelete
  18. खूप छान लिहिलंय सर.

    ReplyDelete
  19. ना सत्तेसाठी ना स्वार्थासाठी, फक्त शिक्षणाच्या हक्कासाठी आणि शिक्षकांच्या सन्मानासाठी.
    सोमनाथ पाटील जळगाव

    ReplyDelete
  20. मा.कपिलजी,
    'त्या तिघांचं सरकार' मस्त आणि चपखल मांडणी.
    समर्थन देताना लिहिलेलं पत्र पण मस्त.या सर्व मांडणी मध्ये आपल्या सशक्त आणि सर्वसमावेशक विचारांची प्रचिती येत आहे.आम्ही आपल्या संस्कारातून लहानाचे मोठे झालो.आमचा नेता अधिक सजगपणे राजकारणात उत्तरोत्तर वाटचाल करीत आहे याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे.
    शिक्षकांच्या तसेच एकूण सर्व जनतेच्या सेवेच्या आपल्या भावी वाटचालीस माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा....!

    ReplyDelete
  21. योग्य निर्णय
    नव्या सरकारात कपिल पाटील साहेबांनी शिक्षण मंत्री व्हावे कारण त्यांच्याशिवाय शिक्षण खातं कोणीच चांगल्या पद्धतीने सांभाळू शकेल असं वाटत नाही. शिक्षक मतदारांचे आमदार म्हणून त्यांचे मागील 13 वर्षांचे भरीव योगदान आहे, त्यांना शिक्षकांच्या व खात्याच्या प्रश्नांची जाण आहे म्हणून शिक्षण मंत्री म्हणून कपिल पाटील is The Best.

    ReplyDelete
  22. योग्य निर्णय
    नव्या सरकारात कपिल पाटील साहेबांनी शिक्षण मंत्री व्हावे कारण त्यांच्याशिवाय शिक्षण खातं कोणीच चांगल्या पद्धतीने सांभाळू शकेल असं वाटत नाही. शिक्षक मतदारांचे आमदार म्हणून त्यांचे मागील 13 वर्षांचे भरीव योगदान आहे, त्यांना शिक्षकांच्या व खात्याच्या प्रश्नांची जाण आहे म्हणून शिक्षण मंत्री म्हणून कपिल पाटील is The Best.
    अमित नेवरेकर

    ReplyDelete
  23. नितीनभाऊ झिंजाडे said...
    शुभेच्छा आपल्यालाही,
    जय राष्ट्रवादी
    ⏰⏰⏰⏰⏰⏰
    आपलाच
    नितीनभाऊ झिंजाडे
    सोशल मिडिया टीम,
    राष्ट्रवादी काँग्रेस

    27 November 2019 at 23:47

    ReplyDelete
  24. सर आपल्या निर्णयाचे मी स्वागत करतो

    ReplyDelete
  25. सर आपल्या निर्णय याचे मी स्वागत करतो

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या निर्णयाचे मी स्वागत करतो
      महाराष्ट्र राज्य शासनाचा भाग बनून आपण शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करावे ही विनंती.
      आपणास व लोकभारतीच्या पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा
      - प्रजापती बोधणे

      Delete