Saturday 24 October 2020

अभिलाष प्रार्थना


'इतनी शक्ती हमें देना दाता
मन का विश्वास कमजोर हो ना'

देशात क्वचितच एखादी शाळा असेल की ज्या शाळेतून या प्रार्थनेचे शब्द ऐकू आले नसतील. ही प्रार्थना लिहणारे गीतकार अभिलाष या दुनियेत आता नाहीत. अलीकडेच त्यांचं निधन झालं.

त्यांच्या प्रार्थनेतील दुसऱ्याच कडव्यातली पहिलच ओळ आहे, 'हर तरफ़ जु़ल्म है, बेबसी है' अभिलाष यांचा मृत्यू म्हणजे ती बेबसी होती. कवी, लेखक निर्धन जगतात. त्यांचं आयुष्य संपतं ते 'चिरा न पणती' असं. अभिलाष यांची पत्नी रडत सांगत होती की, उपचारासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. 46 वर्षांच्या संसारात जो नवरा एका चकार शब्दाने पत्नी आणि मुलीवर आवाज चढवून कधी बोलला नाही. देशातल्या लाखाहून अधिक शाळांमध्ये त्यांचं गीत गायलं जातं त्या नवऱ्यावर आपल्याला नीटसे उपचारही करता आले नाहीत, याची सल तिला बोचत होती.

या प्रार्थनेला ज्यांनी साधं, सरळ पण मनाला भिडणारं संगीत दिलं ते संगीतकार कुलदीप सिंग म्हणत होते, 'या गाण्यासाठी ना अभिलाष यांना रुपया मिळाला, ना संगीतकार म्हणून मला बिदागी मिळाली.' भूल नसलेल्या जिंदगीला त्यांनी भली म्हटलं. मनात तीळभर वैर भावना ठेवली नाही.

अभिलाष जाताना एकटेच गेले. युट्यूबवर त्यांची ही प्रार्थना 2.5 कोटींहून अधिक लोकांनी पाहिली, ऐकली आहे. आपण कधी कवीची विचारपूसही केली नाही. पण ते अशी काही जबरदस्त प्रार्थना देऊन गेले आहेत की, आपलं मन कधी कमजोर होणार नाही.

आपल्या शाळांमध्ये आणि शाळाच कशाला कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरवात निरर्थक ईशस्तवनाने आणि शब्दबंबाळ स्वागत गीताने होत असते. देवाचं स्तवन गाणाऱ्या त्या प्रार्थनांना ना कसला अर्थ असतो, ना कोणत्या मूल्यांचा ओलावा असतो. पण देवाचं नाव घेतल्याशिवाय कार्यक्रमाची सुरवात होत नसते. प्रार्थनेला काही अर्थ तर असायला हवा? प्रार्थनेतल्या त्या ईश्वराला ती प्रार्थना ऐकावीशी तरी वाटायला हवी? क्षणभंगूर बुडबुड्यांप्रमाणे त्या प्रार्थनेतले शब्द विरून जातात.

दिवसाची सुरवात प्रार्थनेनेच व्हावी का? शाळेची घंटा शिपाई जशी बडवतो तशा कर्कश आवाजात प्रार्थना म्हटल्या पाहिजेत का? निरर्थक स्वागत गीतं आणि कंठाळी ईशस्तवनांनी वेळ खात सार्वजनिक कार्यक्रमांचा विचका केलाच पाहिजे?

केरळातल्या एका मुलीने तिच्या पंथात प्रार्थनेला जागा नसल्याने राष्ट्रगीत म्हणायलाही नकार दिला होता. राष्ट्रगीत सुरू व्हायचं, तेव्हा ती राष्ट्रगीताला सन्मान देत शांतपणे उभी राहत असे. पण प्रार्थना शब्दाने म्हणत नसे. प्रकरण कोर्टात गेलं. सुप्रीम कोर्टाने तीची बाजू घेतली.

नाशिकच्या एका शिक्षकाने तो निरीश्वरवादी असल्याने 'खरा तो एकची धर्म' ही प्रार्थना म्हणायला नकार दिला होता. कारण त्या प्रार्थनेतही प्रभू म्हणजे ईश्वराचा उल्लेख आहे. कोर्टाने त्या शिक्षकाचा अधिकारही मान्य केला.

केरळची मुलगी किंवा नाशिकचा तो शिक्षक प्रार्थनेचा अवमान करत नव्हते. आदरच करत होते. मुलगी कट्टर धार्मिक होती. तर शिक्षक पक्का अधार्मिक. दोघांनाही त्यांचं स्वातंत्र्य जपण्याचा अधिकार होता आणि आहे.

याच्या अगदी विपरीत उत्तरप्रदेशात घडलं. एका शिक्षकाने अल्लामा इकबालांची एक अतिशय सुंदर प्रार्थना मुलांना शिकवली. म्हणून थेट त्यांना निलंबित व्हावं लागलं. यूपीचं सरकार फक्त माणसातच भेद करत नाही, तर ईश्वर आणि अल्लाह मध्ये सुद्धा अंतर मानतं.

प्रार्थनेत ईश्वर असो की नसो पण आर्तता तर हवी. आपल्याकडच्या क्वचितच एखाद्या आरतीत आर्तता असते. बाकी टाळ बडवणं जास्त. आरतीचा अर्थ आरतीत असायला नको का? प्रार्थनेत प्रार्थना असायला नको का? आवाहन देवाच्या नावाने असो की महापुरुषांच्या तीच आरती, तीच प्रार्थना, तेच भजन तेच गीत लोकप्रिय होतं, जे ऐकणाऱ्याच्या व गाणाऱ्याच्या मनाला आवाहन करतं. त्याच्या मनात वादळ निर्माण करतं. चांगल्या विचाराच्या बाजूने ती व्यक्ती विचार करायला लागते. खऱ्या धर्माचं त्यात आवाहन असायला हवं. माणुसकीचा ओलावा असायला हवा. मनाला शांती देणारं आर्जव असायला हवं. नवं काही करण्याची प्रेरणा देणारं, ऊर्जा देणारं असावं. यातली एक जरी गोष्ट असली तरी ते शब्द भावतात. ते सूर मनात घुमतात.

आपलं राष्ट्रगीत 'जन गण मन ...' गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी लिहलंय. बांग्लादेशचं राष्ट्रगीतही त्यांचंच आहे, 'आमार सोनार बांग्ला ...' अन् श्रीलंकेचं राष्ट्रगीतही टागोरांच्या शिष्याने त्यांच्याच प्रेरणेने लिहिलेलं आहे. 'जन गण मन' मध्ये ईश्वर नाही आहे काय? त्यातला भाग्यविधाता हा शब्द कुणासाठी आहे? साने गुरुजींचा प्रभू, अभिलाष यांचा दाता आणि टागोरांचा भाग्यविधाता वेगळे नाहीत. पण यातला प्रभू, दाता आणि विधाता परलोकातला ईश्वर राहत नाही. ज्ञानेश्वर, तुकारामांचा विठ्ठल जसा बडव्यांच्या कैदेतला कुणी विष्णूचा अवतार नव्हता. तो आत्म पंढरीचा पंढरीनाथ होता. म्हणून 'विश्वाचे आर्त मनी प्रगटले', असं ज्ञानेश्वर म्हणू शकतात. कारण त्यांच्याच शब्दात,

'मी अविवेकाची काजळी |
फेडोनी विवेक दीप उजळी |
ते योगिया पाहे दिवाळी |
निरंतर ||'

अभिलाष यांच्या प्रार्थनेचं मोठेपण हे आहे की, ते दात्याकडे आत्मविश्वास मागतात. 'नेक रास्ते पे' चालण्यासाठी. 'भूलकर भी कोई भूल हो ना', असं म्हणतात. मनात बदल्याची भावना नको, असं सांगतात. करुणा अशी दे म्हणतात की, 'सबका जीवन ही बन जाये मधुबन.' फुले ईश्वराच्या चरणी टाकण्यासाठी नाहीत तर आनंदाची फुलं सर्वांना वाटण्यासाठी ते अर्पण करतात. दुनियेतला जुल्म रोखण्यासाठी, गांधी अन् ख्रिस्ताच्या भाषेत ममतेचं आवाहन करतात.

'ऐ मालिक तेरे बंदे हम ...' हे भरत व्यासांचं गाणं बुराईला, भलाईने उत्तर देणारं आहे. वैर मिटवण्यासाठी 'प्यार का हर कदम' ते उचलायला सांगतात. नेकीचा रस्ता चालण्यासाठीच, ते 'मालिक'ची बंदगी मागतात.

तुम्ही कोणत्याही धर्माचे असा, हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, ईसाई ही प्रार्थना किंवा यातला मालिक तुम्हाला परका वाटत नाही.

अभिलाष यांचा दाता त्यापुढे जातो. साने गुरुजींच्या 'खरा तो एकची धर्म...' या प्रार्थना गीतातल्या प्रभू सारखा. फक्त बापाच्या भूमिकेत. 'तयाची लेकरे सारी.' भावंडांची याद देण्यापुरता. तसाच अभिलाष यांचा दाताही. 

मन का विश्वास कमजोर होऊ द्यायचा नसेल तर ती शक्ती देणारा दाता कुणी मालिक नसतो. तथागत बुद्धांच्या शब्दात सांगायचं तर, अत्त दीप भव. स्वयंम प्रकाशी व्हा.

मला स्वतःला भावते मराठीतली समीर सामंत यांची ती प्रार्थना. माणसाला आवाहन करणारी आणि माणसाला माणसासारखी वागू मागणारी. सरळ, साधी रचना माणसातल्या माणूसपणाला हात घालणारी.

आणखी एका प्रार्थनेचा उल्लेख करावा लागेल. कारण ती प्रार्थना लहानपणापासून मनात आहे. सेवा दलाशी जोडलो गेल्यापासून. कवी वसंत बापट यांची,
'देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना'

बापटांच्या पत्नी नलूताई बापट सांताक्रूझला साने गुरुजी शाळा चालवत होत्या. त्यांनी बापटांना सांगितलं, 'देव, धर्म आणि पंथ यांचा उल्लेख नसलेली एखादी प्रार्थना लिहून दे.' आणि बापटांनी लिहलं,
'मुक्त आम्ही फक्त मानू बंधूतेच्या बंधना
देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना'

कवी वसंत बापट हे सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्तही होते. साने गुरुजींच्या सहवासात 
त्यांनी स्वतःचं जानवं तोडलं. पंढरपूरच्या सत्याग्रहात ते गुरुजींसोबत होते. पण नंतर कधी मंदिरात गेले नाहीत. देह आणि चित्ताला मंदिर मानून त्यांनी ही प्रार्थना लिहली. 

भागवत पंथातले संत असोत किंवा सुफी फकीर त्यांच्या प्रार्थनेत ईश्वरापेक्षा माणसाची आळवणी अधिक होती. संत मीराबाईची भजनं असोत की कबिराचे दोहे त्यात माणसाच्या प्रेमाला अधिक स्थान होतं. 'खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे' हे साने गुरुजींनी सांगितलं. त्याआधी कबीराने, 'ढाई अक्षर प्रेम केे'. मीराबाईंच्या आळवणीत प्रेमाचीच अभिलाषा होती. खुद्द बायबलमधल्या गीतरत्नात प्रेमाशिवाय दुसरं काही नाही. साधा देवाचाही उल्लेख नसलेली ही गीतं बायबलमध्ये कशी घ्यावीत, असा प्रश्न धर्मपंडितांना पडला होता. फादर दिब्रिटो यांनी त्यांच्या 'सुबोध बायबल'मध्ये ती तरल गाथा त्यातलं गहिरं नाट्य सुंदर वर्णन केलं आहे. "खेड्यातील ती लावण्यवती गावातल्याच मेंढपाळावर अनुरक्त होती. तिच्या अप्रतिम लावण्यामुळे राजाच तिच्या प्रेमात पडतो. तिला मागणी करतो. धनदौलतीचं आमिष दाखवतो. ती बधत नाही. प्रियकरावरची तिची अढळ निष्ठा पाहून राजा तिचा नाद सोडून देतो. ती हरिणीप्रमाणे धावत 
सजणाला भेटायला जाते."

देव आणि मानव यांच्या दिव्य प्रीतीचे ते रूपक आहे, असा दावा रब्बाय अकिबा (इ. स. 50 - 135) यांनी केला. ख्रिस्ती धर्मग्रंथात त्या प्रेम गीताला अढळ स्थान आहे.

'जसा अग्नी देवाने प्रद्युक्त केलेला
साता सागरांना येत नाही विझवता
प्रेमाची धगधगती ज्वाला
महापुरांना येत नाही बुडवता तिला
साऱ्या धनाची केली जरी तुला
प्रीती राहील सर्वदा अतुलाा'

प्रेम असं सार्वत्रिक असतं. प्रेम, करुणा, बंधुता, संवेदना जागवणारी अशी गाणी, प्रार्थना असायला हवीत. अशी प्रार्थना किंवा गाणी देण्याची अभिलाषा बाळगणारे आणखी कुणी गीतकार, कवी आहेत का? अशी अविट, अमीट रचना आणखी कुणी करील का? ज्याला धर्म, पंथ, श्रद्धा आणि ईश्वराचेही बंधन असणार नाही. फक्त मानव्याचं बंधन. खरंच कळवा.

- कपिल पाटील
(महाराष्ट्र विधान परिषद सदस्य, लोक भारती अध्यक्ष आणि कार्यकारी विश्वस्त राष्ट्र सेवा दल)

वर उल्लेख केलेल्या प्रार्थना पुढीलप्रमाणे -

1)

इतनी शक्ति हमें देना दाता
मनका विश्वास कमज़ोर हो ना
हम चलें नेक रास्ते पे हमसे
भूलकर भी कोई भूल हो ना...

हर तरफ़ ज़ुल्म है बेबसी है
सहमा-सहमा-सा हर आदमी है
पाप का बोझ बढ़ता ही जाये
जाने कैसे ये धरती थमी है
बोझ ममता का तू ये उठा ले
तेरी रचना क ये अन्त हो ना...
हम चले...

दूर अज्ञान के हो अन्धेरे
तू हमें ज्ञान की रौशनी दे
हर बुराई से बचके रहें हम
जितनी भी दे, भली ज़िन्दगी दे
बैर हो ना किसीका किसीसे
भावना मन में बदले की हो ना...
हम चले...

हम न सोचें हमें क्या मिला है
हम ये सोचें किया क्या है अर्पण
फूल खुशियों के बाटें सभी को
सबका जीवन ही बन जाये मधुबन
अपनी करुणा को जब तू बहा दे
करदे पावन हर इक मन का कोना...
हम चले...

हम अन्धेरे में हैं रौशनी दे,
खो ना दे खुद को ही दुश्मनी से,
हम सज़ा पाये अपने किये की,
मौत भी हो तो सह ले खुशी से,
कल जो गुज़रा है फिरसे ना गुज़रे,
आनेवाला वो कल ऐसा हो ना...
हम चले नेक रास्ते पे हमसे,
भुलकर भी कोई भूल हो ना...

इतनी शक्ति हमें देना दाता,
मनका विश्वास कमज़ोर हो ना...

- अभिलाष

----------------------

2)

ऐ मालिक तेरे बंदे हम
ऐसे हो हमारे करम
नेकी पर चलें
और बदी से टलें
ताकि हंसते हुये निकले दम

जब ज़ुल्मों का हो सामना
तब तू ही हमें थामना
वो बुराई करें
हम भलाई भरें
नहीं बदले की हो कामना
बढ़ उठे प्यार का हर कदम
और मिटे बैर का ये भरम
नेकी पर चलें ...

ये अंधेरा घना छा रहा
तेरा इनसान घबरा रहा
हो रहा बेखबर
कुछ न आता नज़र
सुख का सूरज छिपा जा रहा
है तेरी रोशनी में वो दम
जो अमावस को कर दे पूनम
नेकी पर चलें ...

बड़ा कमज़ोर है आदमी
अभी लाखों हैं इसमें कमीं
पर तू जो खड़ा
है दयालू बड़ा
तेरी कृपा से धरती थमी
दिया तूने जो हमको जनम
तू ही झेलेगा हम सबके ग़म
नेकी पर चलें ...

- भरत व्यास

----------------------

3)

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे

जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे

जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे

समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे

सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे

कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे

प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे

असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे

भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे

असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे

जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे

- साने गुरुजी

----------------------

4)

हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे

भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी,
सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री,
तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे

धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपू दे
एक निष्ठा, एक आशा, एक रंगी रंगू दे
अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे

लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले
पाउले चालो पुढे.. जे थांबले ते संपले
घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे

- समीर सामंत

----------------------

5)

देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बळांच्या रक्षणाला पौरुषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

जीवनी नव तेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो धैर्य लाभो सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

भेद सारे मावळू द्या वैर सार्‍या वासना
मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधूतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

- वसंत बापट

49 comments:

  1. अतिशय सुंदर व आत्मचिंतन करायला लावणारा लेख

    ReplyDelete
  2. छान लेख साहेब .

    ReplyDelete
  3. अतिशय मार्मिक आणि चिकित्सक लेख

    ReplyDelete
  4. अतिशय सुंदर सर

    ReplyDelete
  5. महाकवी वामनदादा कर्डकांना विसरता येईल काय ? उद्बोधक ...! साथी जिंदाबाद

    ReplyDelete
  6. अत्यंत सुंदर आणि मार्मिक

    ReplyDelete
  7. खूप आवश्यक आहे हे जाणण

    ReplyDelete
  8. Sme
    २४/१०/२०२०
    प्रार्थना

    सुंदर लेख हा वाचूनी अमुचे विचारमग्न जाहले मन
    प्रार्थनेचे आगळे अन् वेगळे असावे लेखन अन् गायन
    कवी अभिलाशांसरखे,भेद नसणारे,मानव्याचे असावे लेखन
    मनास भिडणारे,हृदयास भिडणारे असावे सुमधुर गायन
    शालिनी रोहित मेखा,
    संगीत शिक्षिका,
    आमची शाळा, मुंबई

    ReplyDelete
  9. खरंच आपण सुद्धा कामयब होऊया, आपल्या मुलांना, स्वतः ला, देशाला या महामारी पासून वाचऊया.
    आज सर्वांना मानसिक बळाची, गरज आहे.. या प्रार्थना मुळेच आपल्याला मानसिक बळ मिळते. 🙏🙏🙏🙏

    ReplyDelete
  10. अतिशय सुंदर लेख साहेब!

    ReplyDelete
  11. हृदयास आणि बुद्धीला 100% पटणारे सुंदर लेखन अश्या विचारांच्या लोकांची सध्याच्या काळात खूप गरज आहे sir and thank you

    ReplyDelete
  12. CONGRATULATIONS
    ALLAH KAMYAAB KARE
    IMTIYAZ MASURKAR
    9892433200

    ReplyDelete
  13. CONGRATULATIONS
    ALLAH KAMYAAB KARE
    IMTIYAZ MASURKAR
    9892433200

    ReplyDelete
  14. CONGRATULATIONS
    ALLAH KAMYAAB KARE
    IMTIYAZ MASURKAR
    9892433200

    ReplyDelete
  15. मार्मिक उद्बोधक असे विवेचन.. 100%

    ReplyDelete
  16. अतिशय मार्मीक,
    हृदयस्पर्शी,
    प्रत्येकाला आत्मचिंतन करण्यास भाग पडणारा लेख.
    काळजाला हात घालणार्या लेखणाची आज गरज आहे.
    आपणास तिन सलाम.
    Three salutes.

    ReplyDelete
  17. अप्रतिम लेखन साहेब

    ReplyDelete
  18. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  19. अप्रतिम लेख आहे साहेब

    ReplyDelete
  20. लेख तर अतिसुंदर आहे परंतु वाचुण पुर्ण माहीती कळायावर जो आनंद आहे तो वेगळा मिळतो

    ReplyDelete
  21. अप्रतिम गीत अंतःकरणाला स्पर्शून जाणारे, नेक रस्त्यावरुन जाताना चुकून सुद्धा एखादी चुक होऊ नये असे मागणे मागणारी सुंदर प्रार्थना. एखादे गीत जेव्हा मनाला भावते तेव्हाच तिचे प्रार्थनेत रुपांतर होते. लेख फारच सुंदर.

    ReplyDelete
  22. फ़ारच छान लिहले आहे.

    ReplyDelete
  23. अभिलाष यांची ही प्रार्थना एक अजरामर काव्य आहे. राजीव जोशी.

    ReplyDelete
  24. इश्वर अल्लाह तेरो नाम
    सब को सन्मती दे भगवान!
    अतिशय उत्तम व अभ्यास पुर्ण विश्लेषण.
    माझ्या धार्मिक भावनांचा प्रत्येकांने आदर केलाच पाहिजे,नव्हे त्यांनीही तशी भावना ठेवली पाहिजे,अशी माझी तीव्र इच्छा. पण दुसर्याने ही तशीच भावना ,इच्छा ठेवली तर ? I do no want tolerance, I want acceptance.

    ReplyDelete
  25. खूप सुंदर लेख होत सर ,व पुन्हा कविता वाचण्याचा आनंद मिळाला .
    धन्यवाद साहेब !

    ReplyDelete
  26. चिंतनशील विचार करायला प्रवृत्त करणारा असा अत्यंत हृदयस्पर्शी अप्रतिम लेख धन्यवाद सर

    ReplyDelete
  27. सुंदर लेखन.विचार करायला लावणारे विचार आहेत

    ReplyDelete
  28. अतिशय सुंदर असा लेख, अभिलाष याचं हे गीत चिरंजीव ठरो आणि पुढील सहस्त्र पिढयांना प्रेरणादायी ठरो.आजच्या विज्ञान तंत्रज्ञान युगाच्या चष्मयतून पाहिले असता तत्कालीन काळात अनेक गोष्टीची वानवा होती.परंतु क्षेत्र कोणतंही असो सिहावलोकन केल्यावर मात्र त्यांच्याविषयी उर भरून येते, अभिमान वाटावा अशीच कामगिरी ते आपल्यासाठी करुन गेलेत.

    ReplyDelete
  29. अप्रतिम , सुंदर व प्रेरणादायी लेख ....
    धन्यवाद सर !

    ReplyDelete
  30. भावी पिढीला चिंतनशील विचारांची प्रेरणा देवो आणि अंतःकरणाला जागृत करणार्या प्रार्थना.

    ReplyDelete
  31. आतापर्यंत कपिल पाटील यांच्या लेखनापैकी सर्वांगसुंदर लेख! आप्रतिम.. भाव तर शब्दापलीकडला. प्रार्थना म्हणजे काय आणि सर्व मुद्दे पटवून देताना दिलेली उदाहरणेही अलौकीकच .. वेगळी! मी पूर्णपणे आस्तिक आहे. येशू असो, अल्ला असो वा माझा शिवशंकर. कोणी तरी आहे हे जग चालवते. नास्तिक म्हणवणारेही सृष्टी मानतात हेही आस्तिक्यच! फक्त वाईट एवढंच वाटतं की , माणूस गेल्यावर त्याच्या बद्दल कळतं आणि वाईट वाटतं. मागे मारूती चितमपल्लींबद्दल वाचलं. पण मना- मनात गुंजणारी, शाळा- शाळातून घुमणारी ही प्रार्थना लिहणारे अभिलाष यांची माहीती आणि प्रार्थनेचा गर्भितार्थ खूप सुंदर रित्या उलगडून,दाखवला आहे.प्रतिक्रिया दिल्याविना राहवेना एवढा छान!! -- सुचिता

    ReplyDelete
  32. कपिलजी , अप्रतिम !
    फार वेगळे चिंतन मांडलेत तुम्ही.
    शेयर करतो.
    - अशोक थोरात .

    ReplyDelete
  33. अभिलाषजींचा साधेपणा एवढा की नागपूरला आले असताना फक्त भेटीसाठी अमरावतीला माझ्या घरी आले होते. थोर कवी , तेवढाच थोर माणूसही !
    - अशोक थोरात . अमरावती .

    ReplyDelete
  34. एका प्रखर पत्रकारातला, बेधडक नेत्यातला हळवा कलावंत या लेखात डोकावतो, आम्ही धन्य आहोत कारण कपिल सर आपले नेतृत्व करतात. 🙏💐🌹💐🌹🙏

    ReplyDelete
  35. कपील पाटील यांना छात्रभारतीमुळे फार पूर्वीपासून ओळखत
    असलो तरी, त्यांचं लेखन मी कधी वाचलेले नाही.मात्र त्यांची काही भाषणे मी छात्रभारतीच्या मंचावरून ऐकलीत.पण आज छा.भा.च्या व्हाटस अप गृपवर त्यांनी प्रार्थना या गीतप्रकाराबद्दल जे काही सुंदर विवेचन केले आहे, ते माझ्या मनात जागा करुन केले.काही चांगल्या प्रार्थनांची आठवण करून देत त्यांची मांडणी मस्तच उद्बोधक केली आहे.प्रार्थनेतून
    माणसाला काय मिळायला हवे हेही त्यांनी नेमकेपणाने सांगितले आहे.प्रार्थनेचं एवढं सारं महत्त्व ज्ञात असूनही प्रार्थना न म्हणण्याचं व्यक्तीचं स्वातंत्र्य ते अधोरेखीत करतात हा उदारमतवाद पटण्यासारखाच असल्याने मनाला भावतो.
    खरं तर प्रार्थना हा माझा आवडता गीतप्रकार असून त्याबद्दल एक निश्र्चित अशी वैज्ञानिक भुमिका आहे.याबाबत संत तुकाराम, राष्ट्रसंत तुकडोजी, सानेगुरुजी आणि वसंत बापट
    हे माझे मार्गदर्शक मी मानतो.मला वाटते प्रार्थना ही हृदयपुर्वक पण उचीत जाणीवेने एका माणसाने दुसऱ्या माणसाला घालायची भावस्पर्शी अशी प्रेरक हाक आहे.तो परस्परांनी परस्परांना सादप्रतिसादाचा काव्यमय सुसंवाद आहे तसेच तो
    व्यक्तीगत असाही आपणंच आपल्याशी अंतर्मुख होऊन करायचा
    असा आत्मिक संवाद आहे.असा हा प्रार्थनेचा संवाद जर खरंच
    मनापासून झाला तर तो निश्र्चितच परिणाम साधतो व स्वत:वर
    आणि इतरांवरही एक मानवीय संस्कार करून जातो.या दृष्टीने मला साने गुरुजींची," खरा तो एकचि धर्म", कवीवर्य वसंत बापटांची,"सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना", संत तुकडोजींची," या भारतात बंधुभाव नित्य वसुदेव","सबकेलिए खुला है मंदीर यह हमारा', उबंटु चित्रपटातील,"माणसाने माणसाशी, माणसासम वागणे",संत तुकारामांचा अभंग," मन करारे प्रसंन्न" या प्रार्थना माणसाला योग्य दिशेला नेणाऱ्या म्हणुन अधिक उचीत वाटतात.मात्र ज्या प्रार्थनांमध्ये देणारा दाता वेगळा आणि मागणारा याचक वेगळा असे दोन पक्ष कल्पुन त्यांची रचना केली आहे त्या प्रार्थनांना मी मिकमाग्या प्रार्थना म्हणतो.उदा." इतनी शक्ती हमे देना दाता", "तु बुद्धी दे, तू तेज दे,नवचेतना विश्र्वास दे" इ.इ.माझं म्हणणं असं आहे की दात्याने(माझ्या वैज्ञानिक परिभाषेत निसर्गाने) आपण माणसांना अशी शक्ती, बुद्धी, चेतना व तेज दिलेले नाही का? तर दिलेले आहे.म्हणून जे मुळात दिलेलेच आहे ते परत,परत का मागायचे ? तर असे ते न मागता, जे दिले आहे ते आपल्या मानवी व्यक्तित्वात शोधायचे, ओळखायचे, जोपासायचे व बाहेर काढायचे म्हणजे कृतीत आणायचे.माणसाला असा प्रवास करायला प्रेरणा देणारी प्रार्थना हवी.भिक मागायला लावणारी नको.प्रार्थनेत आपण मारलेली हाक आपल्यालाच ऐकू आली पाहिजे.प्रार्थनेचा नाद, आपल्या
    मनाच्या गाभाऱ्यातच घुमला पाहिजे.त्या काव्यरचनेतील मानवी मुल्यांचे सुंदरपण आपल्या मनचक्षुंना न्याहळता आले पाहिजे,त्यातील त्यातील अर्थपुर्ण तत्वांचा भावगंध अंतःकरणात
    दरवळंत राहिला पाहिजे.थोडक्यात प्रार्थनेची दिशा अंतर्मुखी हवी,बहिर्मुखी नको.जसे की,"भरावा मोद(चुकून मोदी टाईप व्हायला लागले होते.) विश्वात, असावे सौख्य जगतात , सदा हे ध्येय पुजावे, जगाला प्रेम अर्पावे!",किंवा " भेद सारे मावळू द्या,वैर साऱ्या वासना, मानवाच्या एकतेची पुर्ण होवो कल्पना,मुक्त आम्ही फक्त मानु बंधुतेच्या बंधना",इ.इ.हे आपणंच आपल्याला सांगणे आहे,आपणंच आपल्याला मागणे आहे.दुसऱ्या,बाहेरच्या अमानवी शक्तीकडून काहीही मागायचे नाही,तिला काही सांगायचेही नाही.संत तुकारामांनुसार," तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपलाची वाद आपणाशी" असा
    प्रार्थनेतला संवाद आहे.
    नमुन्यादाखल माझ्या दोन-तीन गीतरचना उधृत करतो:
    १.निसर्गाच्या सर्वच शक्ती, आपुल्या हो प्रेरणा
    होऊ आम्ही निर्भय, निर्मळ उजळू या जीवना.
    २.सकल हितास्तव सदैव असुद्या,दक्ष आपुली कृती
    मानवतेसाठीच करुया, जाणीवांची जागृती
    करुया जनतेची जागृती!
    ३.श्वासांची गरज हो जशी,जीव जगण्यासाठी
    विवेकाची जोड हवी, वाटचालीसाठी !
    शाहीर तुळशीराम जाधव
    लोकपंचायत,जाणीव जागृती कलामंच,
    संगमनेर जि.अहमदनगर
    भ्रमणध्वनी:९४२३७९३८१३



    ReplyDelete
  36. प्रार्थना खुपच छान

    ReplyDelete
  37. खूप छान लेख आहे सर

    ReplyDelete
  38. अतिशय सुंदर व प्रेरणादायी लेख आहे

    ReplyDelete
  39. अतिशय सुंदर व प्रेरणादायी लेख आहे

    ReplyDelete
  40. अतिशय सुंदर व प्रेरणादायी लेख आहे

    ReplyDelete
  41. अतिशय सुंदर व प्रेरणादायी लेख आहे

    ReplyDelete
  42. अत्युत्तम !

    ReplyDelete
  43. Ram Barote.
    अत्युत्तम !

    ReplyDelete
  44. अप्रतिम. आपल्यातील संवेदनशीलता वेळोवेळी जागृत असते. लेख वाचून प्रचिती . धन्यवाद.

    ReplyDelete
  45. अतिशय प्रेरणादायी लिखाण. अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. मनःपूर्वक अभिनंदन आणि विधायक , समजोपयोगी उपक्रमास हार्दिक शुभेच्छा!

    ReplyDelete