Friday 11 December 2020

दिलीपकुमारांच्या त्या एका कॉलने भारत-पाक युद्ध टळलं


दिलीपकुमार म्हणजे चित्रपटसृष्टीतले महानायक.

अत्यंत संयत अभिनयासाठी प्रसिद्ध. ते अभिनय करतात असं कधी वाटतच नाही. अमिताभ बच्चन पासून शाहरुख खान पर्यंत प्रत्येकावर दिलीपकुमार यांचा ठसा आहे.

भारतीय अभिनयाचा मानदंड म्हणजे दिलीपकुमार.  

गेली 30 ते 40 वर्ष अमिताभ बच्चन भारतीय सिने सृष्टी व्यापून आहेत. त्यांच्या तितक्याच श्रेष्ठ दर्जाच्या अभिनेत्री असलेल्या पत्नी खासदार जया बच्चन यांना एकदा विचारलं, भारतीय सिने सृष्टीचा महानायक कोण? अमिताभ बच्चनच ना? त्या म्हणाल्या, 'नाही. दिलीपकुमार. फक्त दिलीपकुमार.' 

पण अभिनय एवढीच काय ती दिलीप कुमार यांची ओळख नाही. माणुसकीने ओतप्रोत भरलेला हा अभिनय सम्राट तितकाच रसिक वाचक आहे. इंग्रजी, हिंदी, उर्दू, पंजाबी आणि मराठी या पाच भाषांवर त्यांचं प्रभुत्व आहे. त्यांच्याकडे विपुल ग्रंथ भंडार आहे.

दिलीप कुमारांचं कुटुंब पेशावरवरुन आलं नाशकात. देवळाली जवळ राहिलं. नाशिककडचं कुणी भेटलं की ते नाशिकच्या ढंगातलं मराठी आवर्जून बोलतात. मराठीतली अनेक गाणी त्यांना तोंडपाठ आहेत. तमाशा त्यांच्या आवडीचा. अनेक लावण्या त्यांना मुखोद्गत आहेत. मूड मध्ये असले की अगदी तालासुरात ते लावणी गात.

मला एकदा ते म्हणाले, 'मी मराठी बोलतो ती नाशिककडची. मुंबई, पुण्याची मराठी मला काही नाही जमत.'

खूप आधीची गोष्ट. औरंगाबादला त्यांचं शुटींग सुरु होतं. त्यांना कळलं डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुभेदारी गेस्ट हाऊसला आले आहेत. ते बाबासाहेबांना जाऊन भेटले. खूप बोलले. खूप गप्पा मारल्या. बाबासाहेब त्यांना म्हणाले, 'मुस्लिम समाजातल्या दुबळ्या वर्गासाठी काही करा.'

दिलीपकुमार मला म्हणाले, 'तेव्हा मला नाही जमलं. पण मुस्लिम ओबीसींच्या प्रश्नावर काम करताना माझ्या मनात आंबेडकरांची ती याद होती.'

इस्लाममध्ये जात पात नाही. भेदभाव नाही. पण भारतीय मुस्लिम समाजात त्याच जाती पाती आहेत. बिरादरी आहेत. मुस्लिम समाज हा जातीग्रस्त भारतीय समाजाचा अभिन्न अंग आहे. इथे आलेल्या सगळ्या धर्मांना जाती व्यवस्थेने गिळून टाकलं आहे. जातीचा संबंध नसलेल्या धर्मांना जाती व्यवस्थेची तडजोड करावी लागली. धर्मांतरं झाली पण जात्यंतरं झाली नाहीत. जाती तशाच राहिल्या. त्यामुळेच मंडल आयोगाने ओबीसींच्या यादीत अनेक मुस्लिम जातींचा समावेश केला. त्यांना आरक्षण मिळावं म्हणून मुस्लिम ओबीसींची चळवळ उभी राहिली. वरिष्ठ मुस्लिम वर्गीयांकडून आधी विरोध झाला. पण दिलीपकुमार ठामपणे उभे राहिल्यानंतर विरोध संपुष्टात आला. महाराष्ट्रात ठिकठिकाणी परिषदा झाल्या. लखनौ, दिल्ली, हैदराबाद. प्रत्येक ठिकाणी स्वतः दिलीप कुमार गेले. मुस्लिम ओबीसींना सवलती देण्याचा निर्णय शरद पवार यांनी प्रथम घेतला तेव्हा, मुस्लिम ओबीसींच्या सवलती आणि सर्टिफिकेटचा प्रश्न विलासरावांनी सोडवला तेव्हा आणि युतीच्या काळात रद्द झालेल्या सवलती गोपीनाथ मुंडे यांनी पुनर्स्थापित केल्या तेव्हा त्यामागची खरी ताकद दिलीपकुमार यांचीच होती. शब्बीर अन्सारी, हसन कमाल, जहीर काझी, मी आम्ही सारे त्या चळवळीत होतो. पण दिलीपकुमार पाठीशी नसते तर मुस्लिम ओबीसींना न्याय मिळाला नसता. हिंदू ओबीसी आणि मुस्लिम ओबीसी एक कसे आहेत, एका जातीचे, एका बिरादरीचे कसे आहेत हे त्यावेळी मुख्यमंत्री असलेले शरद पवार यांना सांगताना दिलीपकुमार म्हणाले, 'छगन भुजबळ माळी आहेत आणि मी बागवान. म्हणजे माळीच. जात एक. सवलत त्यांना मिळते मग बागवानाला का नको?' शरद पवार आणि छगन भुजबळ यांचे डोळे त्याक्षणी विस्मयचकीत झाले होते. 

दिलीप कुमारांकडे, ही प्रेरणा आणि हिम्मत आली कुठून?  मी एकदा विचारलं. तेव्हा त्यांनी मला सुभेदारी गेस्ट हाऊस मधला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटीचा प्रसंग सांगितला. त्यांच्या सामाजिक जाणिवांच्या मागची प्रेरणा होती डॉ. आंबेडकर.  त्या आधीचा आणखी एक प्रसंग आहे. मुंबई विद्यापीठ अंतर्गत फुटबॉल टूर्नामेंटमध्ये दिलीपकुमार खालसा कॉलेजकडून खेळत होते. सामना जिंकल्यावर टीमच्या कॅप्टनने बाबूने संध्याकाळी सगळ्यांना घरी जेवायला बोलावलं. बाबूने स्वतः कोंबडी शिजवली होती. पण जेवायला फक्त दिलीप कुमार पोचले. टीम मधले अन्य कुणीच आलं नाही. दिलीप कुमारांनी बाबूला विचारलं, 'अरे इतर कुणी का नाही आले?' विजेत्या टीमचा कॅप्टन बाबू म्हणाला, 'युसुफ भाई मी दलित महार आहे. माझ्या हातचं ते कसं खातील?' तो प्रसंग सांगताना दिलीप कुमारांच्या डोळ्यात पाणी होतं. गळा भरलेला होता.

आणखी एक प्रसंग आहे. अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान होते. तर पाकिस्तानात नवाज शरीफ. भारत - पाकिस्तान समोरासमोर ठाकले होते. प्रसंग मोठा बाका होता. अचानक बांद्रा पाली हिलला दिलीपकुमार यांच्या घरात फोन खणखणला. खुद्द वाजपेयी साहेब बोलत होते. त्यांनी तातडीने दिल्लीला बोलावलं. डॉ. जहीर काझी यांना घेऊन दिलीपकुमार थेट दिल्लीला पोचले. जहीर काझी हे त्यांचे जवळचे डॉक्टर, मित्र. जहीर काझींच्या घरात आणि सासरी स्वातंत्र्यसैनिकांची समाजवादी परंपरा. काझींचे सासरे मोहिद्दीन हॅरिस दिलीप कुमारांचे मित्र. त्यामुळे काझींवर दिलीप कुमारांचा फार भरवसा.

वाजपेयींनी दिलीप कुमारांना सांगितलं, की तुम्ही हे करु शकता? थेट नवाज शरीफांना फोन गेला. पलिकडे दिलीप कुमारांचा आवाज ऐकून नवाज शरीफ एकदम चाट पडले. ते दिलीप कुमारांचे प्रचंड फॅन. त्यांचे अनेक सिनेमे, डॉयलॉग आणि गाणी त्यांना पाठ. दिलीप कुमारांच्या शब्दांने जादू केली आणि पुढचं भयावह युद्ध थांबलं. अटलबिहारी वाजपेयींचं मोठेपण हे की त्यांना ते अचूक सुचलं. दिलीप कुमारांची शिष्टाई कामाला आली. 

मुस्लिम ओबीसींच्या आंदोलनामुळे दिलीपकुमार, शब्बीर अन्सारी, हसन कमाल, डॉ. झहीर काझी या सगळ्यांशी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची दोस्ती जमली. राज्यसभेची निवडणूक होती. मायनॉरिटी कोट्यातून बरेच काँग्रेसजन प्रयत्नात होते. पण विलासरावांना वाटत होतं की दिलीपकुमारांनी राज्यसभेवर जावं. त्यांनी दिलीपकुमारांशी मला बोलायला सांगितलं. दिलीपकुमार म्हणाले, 'अरे या निवडणूकीत घोडेबाजार होतो. मी कुठून पैसे आणू?' मी विलासरावजींना फोन लावून दिला. ते मस्त हसले. त्यांना म्हणाले, 'दिलीपसाब आप को कुछ नही करना है, जिम्मेदारी मेरी है.' विलासरावजी त्याच दिवशी दिल्लीला निघाले होते. सोबत प्रदेशाध्यक्ष गोविंदराव आदिक होते. आदिक स्वतःच्या प्रयत्नात होते. दिलीपकुमारांचं नाव सांगताच सोनिया गांधी यांनी आनंदाने मान्य केलं. 

विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. त्यावेळी मंत्रीमंडळात स्थान मिळावं म्हणून आमदार असलेले हुसेन दलवाई यांनी बरेच प्रयत्न केले होते. पहिल्या पाचात त्यांचा समावेश झालाही. पण तोही एक मोठा किस्सा आहे. सोनिया गांधींनी दिलीपकुमार यांना विचारलं, 'हुसेन दलवाई हे नाव कसं आहे?' दिलीप कुमारांच्या डोक्यात सिनिअर हुसेन दलवाई होते. म्हणजे वसंतदादा पाटील यांच्यासोबत मंत्रिमंडळात असलेले. दिलीप कुमारांचे ते जुने मित्र. त्यांनी एका क्षणात सोनियाजींना सांगितलं, 'हुसेन दलवाई बिलकुल चांगला माणूस आहे. राष्ट्र सेवा दलात वाढलेला आहे. सज्जन आहे. बिलकुल त्यांना करा.' हुसेन दलवाई हे नाव पक्कं झालं. पण तेव्हा त्याच कुटुंबातले एक ज्युनिअर हुसेन दलवाई हे दिलीप कुमारांना माहित नव्हते. ज्युनिअर हुसेन दलवाई म्हणजे युक्रांदवाले. अलीकडच्या काळात राज्यसभेवरही होते ते हुसेन दलवाई. हमीद दलवाई यांचे भाऊ. त्यावरून काँग्रेसमधल्या काही मुस्लिम नेत्यांनी दिल्लीत आक्षेप घेतला. तेव्हा दिलीपकुमारांनी मला विचारलं, 'अरे माझ्या डोक्यात ते सेवा दलाचे हुसेन दलवाई होते. हे हुसेन दलवाई कोण?' मी म्हटलं, 'हे युक्रांदवाले.' ते म्हणाले, 'हे मला माहित नव्हते. मला वाटलं हे सेवा दल वाले हुसेन दलवाई आहेत. म्हणून मी सोनियाजींना तात्काळ हो म्हटलं.' मी हसलो. आणि म्हटलं, 'तुमची जुन्या हुसेन दलवाईंसोबत कशी दोस्ती?' ते म्हणाले, 'ते हुसेन दलवाई माझे जुने मित्र. जुन्या सेवा दलातल्या बऱ्याच लोकांना मी व्यक्तिगत ओळखतही होतो. त्यामुळे माझ्या  डोळ्यात ते नाव राहिलं.' ते सिनियर हुसेन दलवाई या हुसेन दलवाईंचे काकाच. चिपळूणमधलेच. आणि सेवा दलाच्या पहिल्या पिढीतले. कोकणामधली बहुतेक मुस्लिम मंडळी सेवा दलात सुरवातीपासून होती. आणि त्यांचं आणि सेवा दलाचं योगदान दिलीप कुमारांना माहित होतं. त्यामुळे त्यांनी मोठ्या प्रेमाने सोनियाजींना शिफारस केली होती. 


दिलीप कुमारांचं प्रेम हा माझ्यासाठी फार मोठा ठेवा आहे. भेंडी बाजारात घांची म्हणजे मुस्लिम-तेली समाजाच्या पुढाकाराने झालेल्या ओबीसी मेळाव्यात त्यांच्या हातून झालेला सत्कार मी कधीच विसरू शकणार नाही. लखनौच्या मुस्लिम - ओबीसी परिषदेत माझ्याबद्दल ते किती प्रेमाने बोलले. औरंगाबाद, जालना दिलीपकुमार असले की मोठ्या सभा होत. त्यांच्या सोबतीचे हे क्षण विसरता येणार नाहीत. 

दिलीपकुमार यांच्या या दीर्घ आयुष्यात त्यांना साथ आहे ती सायरा बानोंची. त्या त्यांच्या धर्मपत्नी. पण आता जणू त्यांच्या आई बनल्या आहेत. लहान मुलासारखी त्या दिलीप कुमारांची काळजी घेतात. दिलीप कुमारांच्या अनेक सामाजिक उपक्रमात भाग घेतात. लोकांना मदत करतात. सायरा बानोंनी आपलं सगळं आयुष्य दिलीप कुमारांना समर्पित केलं आहे. अभिनेत्री म्हणून त्या मोठ्या आहेतच. पण जीवनसाथी म्हणून आणखी मोठ्या आहेत. सतत त्यांच्या सोबत राहतात. एक क्षणही अंतर देत नाहीत. वय 98 झालंय. फिरणं मुश्किल आहे. Bedridden आहेत. आठवणी पुसल्या जात आहेत. त्यांचा शेवटचा कार्यक्रम म्हणजे ताज एंडला झालेल्या रितेश देशमुख आणि धीरज देशमुख यांच्या रिसेप्शनला ते आले होते. मला पाहताच त्यांनी माझा जो हात पकडला ते माय फ्रेंड कपिल, कपिल करत. ते हात सोडायलाही तयार नव्हते. मोठ्या मुश्किलीने मी त्यांचा हात हळूच काढून पुन्हा सायराजींच्या हातात दिला. तो प्रसंग मला आठवला की आजही गलबलल्या सारखं होतं. कारण दिलीपकुमार हरवत चालले होते. 

दिलीपकुमार तर सिनेमातला मोठा माणूस आहेच. पण त्यांच्यातला माणूस, त्यांच्यातला देशभक्त त्याहून खूप मोठा आहे. ते विचाराने पक्के समाजवादी. पक्के सेक्युलर आणि तितकेच आधुनिकही. मुस्लिम समूहातल्या पस्मांदा तबक्यासाठी त्यांनी दिलेले योगदान अफाट आहे. हिंदू-मुस्लिम एकीसाठी त्यांचं योगदान मोलाचं आहे. 

देशाच्या चित्रपट विश्वातील हा महानायक भारतरत्न किताबाच्या पात्रतेचा आहे. तो किताब मिळेल न मिळेल पण त्यांचं काम त्या तोलामोलाचं आहे हे नक्की. आज 11 डिसेंबर. दिलीप कुमारांचा जन्मदिन. दिलीपकुमार आणि सायरा बानो या दोघांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना आणि सलाम!

- कपिल पाटील
(कार्यकारी विश्वस्त - राष्ट्र सेवा दल, आमदार - मुंबई शिक्षक मतदार संघ, अध्यक्ष - लोक भारती.) 

10 comments:

  1. Kapil dada No-1
    दिलीप कुमारजी सिनेसृष्टीचे महानायक...
    आमचे कपिलदादा शिक्षणक्षेत्रातील महानायक...
    आमच्या गळ्यातील ताईत...

    ReplyDelete
  2. Thank you Kapil Patil sir for acquainting us about noble and patriotic gentleman,DILIP SAHAB.Wish him

    ReplyDelete
  3. व्वा व्वा! सर दिलीप सहाब च्या वाढदिवशी इतक्या मौल्यवान आठवणी सांगून खुप माहिती मिळाली. दिलीप सहाब अन् सायराजींना आयुरारोग्य लाभो हीच प्रार्थना.

    ReplyDelete
  4. अशी माहिती जी कधी ऐकली नव्हती धन्यवाद कपिल जी

    ReplyDelete
  5. खूप सुंदर माहितीपूर्ण लेख
    जी माहिती पूर्वी कुठेच वाचली नव्हती

    ReplyDelete
  6. अभिवादन ! आभार ! धन्यवाद !

    ReplyDelete
  7. दिलीप साहेब है सामाजिक कार्यात अग्रसर होते एवळच माहित होत. पण ही अदभुत माहिती वाचून आनंद झाला. Thank you Kapil Sir

    ReplyDelete
  8. आपण शिक्षक आमदारकी सोडून नटांच्या पत्रकारितेची नोकरी उत्तमपणे करु शकता.

    ReplyDelete