Friday 26 March 2021

मूकनायिका

 


प्रा. पुष्पा भावे यांना जाऊन जेमतेम पाच महिने झाले असतील. आज त्यांचा जन्मदिवस आहे. पण त्यांच्या आठवणी तितक्याच जाग्या आहेत. सार्वजनिक जीवनात असं जागं राहणं फक्त पुष्पाताईच करू शकत होत्या. त्यांची वाणी आणि लेखणी कपाट बंद पुस्तकांसाठी कधीच नव्हती. प्रश्नांना त्या थेट भिडत होत्या. लोकांसाठी उभ्या राहत होत्या. जनतेच्या प्रश्नावर त्यांची वाणी सत्याग्रहासारखी प्रत्येक आघाडीवर व्यक्त होत होती.


पुष्पाताईंनी तसं बसून लेखन खूप कमी केलं. पण साहित्य आणि समीक्षा या दोन्ही क्षेत्रात त्यांची असलेली प्रतिष्ठा आणि दरारा सर्वमान्य होता. दुर्गाबाई भागवतांसारखं विपुल लेखन नाही केलं कधी पुष्पाबाईंनी, पण दुर्गाबाईंची जी भीती सत्ताधाऱ्यांना वाटत होती, तितकीच भीती पुष्पाताईंबद्दल सत्तेवर कुणी असो त्यांना वाटत होती. 

सामाजिक आणि सार्वजनिक नीती मूल्यांचा आवाज म्हणजे पुष्पाताई होत्या. अन्यायाच्या विरोधात 'मेरी झाँसी नही दूंगी' सारखा त्यांचा प्रण असायचा. 'लोकशाही, स्वातंत्र्य आणि मानवाधिकार याबाबत कधीच तडजोड नाही', असा त्यांचा झाँसीच्या राणीसारखा नही दूंगी निर्धार होता. पुष्पाबाईंचा हा निर्धारच आधार होता निराश्रित, परावलंबी, दुर्बल, अव्यक्त मूक समाज समूहांचा.

मागच्या चार दशकांमधल्या त्या मूकनायिका होत्या. बोलू न शकणाऱ्यांच्या, अन्यायाचा प्रतिवाद करू ना शकणाऱ्यांच्या आवाज बनून राहिल्या होत्या. त्या कायम सत्याग्रही असायच्या. बोलायच्या तेव्हा त्यांना शब्द शोधावे लागत नसत. पारंपरिक शब्दांची उपमा द्यायची तर, सरस्वतीचं जणू वरदान त्यांना होतं. सरस्वती म्हणजे वाणी. भाषा. खरंच त्यांना वाणी आणि भाषेचं जे वरदान होतं, त्यामुळे शब्दच काय, एक अक्षरही त्यांना इथे तिथे जावं लागत नसे. शब्दामागून शब्द लीलया प्रगट होत. नुसते प्रगट नसत होत, कानात, मनात घुमत असत. अन्याय, उपेक्षा, अत्याचार यांच्याविरोधात आदळत असत. शस्त्र बनून. तुकोबाराय जसे शब्दांना रत्न आणि शस्त्र मानत पुष्पाताई तशा होत्या.

चळवळीत आणि पत्रकारितेत असताना पुष्पाताईंचा सहवास अनेकदा लाभला, मिळाला. सेवादल, समाजवादी संघटना, दलित संघटना, उपेक्षितांची व्यासपिठं या सगळ्यांना पुष्पाताई आपल्या वाटत होत्या. यापैकी कुणाच्याच त्या सभासद झाल्या नसतील कदाचित. पण त्या त्यांच्यातल्याच एक होत्या. आणि त्यांच्यासाठी बोलत होत्या.

आणीबाणीच्या विरोधात त्या निडरपणे लढल्या. लोकशाही स्वातंत्र्याच्या प्रश्नावर त्यांनी तडजोड केली नाही. समतेच्या प्रश्नावर तशाच त्या कायम आग्रही राहिल्या. मग प्रश्न मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा असो किंवा मंडल आयोगाचा. मराठावाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मिळावं यासाठी जो प्रदीर्घ संघर्ष झाला, त्या संघर्षात पुष्पाताई अग्रणी होत्या.

पुष्पाताईंचं वाचन अफाट होतं. व्यासंग खूप मोठा होता. संदर्भ शोधायला त्यांना पुस्तकं चाळावी लागत नव्हती. कमालीची स्मरणशक्ती. विवेचक बुद्धिमत्ता. मर्मग्राही समिक्षा. काय नव्हतं त्यांच्याकडे, सगळंच होतं.

शिक्षक भारतीचं संघटन करताना कार्यकर्त्यांची वैचारिक बैठक बांधण्यासाठी आम्हाला पुष्पाताईंचीच मदत झाली. शिबिरांमध्ये त्या यायच्या. शिक्षकांना मंत्रमुग्ध करायच्या. कवयित्री नीरजा यांच्या अध्यक्षतेखाली पहिलं राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलन झालं तेव्हा उदघाटन सत्राच्या प्रमुख पाहुण्या पुष्पाताई होत्या, तर समारोप भालचंद्र नेमाडे यांनी केला होता. शिक्षक भारतीच्या प्रत्येक उपक्रमाला त्यांची अशी साथ होती. नीरजाताईंमुळे पुष्पाबाई शिक्षक भारतीशी जोडल्या गेल्या त्या अखेरपर्यंत. 


मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आरक्षणवादी चळवळींमध्ये एक मोठा पेच निर्माण करून गेला होता. ५० टक्क्यांची मर्यादा, ओबीसी आरक्षणाचे निकष आणि दुसऱ्या बाजूला मराठा समाजात शेती अरिष्टामुळे निर्माण झालेले प्रश्न, आलेलं वैफल्य, विशेषतः मराठा स्त्रियांमध्ये निर्माण झालेला असंतोष या सगळ्याकडे पुष्पाताई वेगळ्या नजरेने पाहत होत्या. त्यांनी एक टिपण तयार केलं. मी त्यांच्या घरी गेलो होतो. दलित, ओबीसी, मुस्लिम ओबीसींच्या आरक्षणाच्या चळवळीतला माझा सहभाग त्यांनी जवळून पाहिला होता. माझ्या हाती त्यांनी ते टिपण दिलं. मराठा समाजाच्या दैन्य, वैफल्य आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीच्यासंदर्भात  पुष्पाताईंचा कौल अर्थातच मराठा आरक्षणाच्या बाजूने होता.  ते टिपण त्यांनी प्रसिद्धीस न देता संबंधित कार्यकर्त्यांच्या चर्चेला खुलं केलं. अशा प्रश्नांच्या चळवळीत पुढारपणा न करता कार्यकर्ते व नेते यांची वैचारिक बांधणी नेमकी कशी होईल यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील असायच्या. त्यांच्या टिपणाची चर्चा आंदोलनामधल्या फार थोड्या लोकांपर्यंत पोचली होती. पण ज्यांच्यापर्यंत पोचली त्यांना तो मोठा आधार वाटला. पुष्पाताईंबाबत एक नवं कुतूहल त्यांच्यामध्ये निर्माण झालं.

पुष्पाबाईंचं पूर्वीचं आडनाव 'सरकार' होतं. आरमारी आंग्रे घराण्यातल्या त्या  सरकारच. त्यांच्या दारावर तीच पाटी होती. पण ते नाव मिरवण्याचा सरंजामी लवलेश पुष्पाताईंच्या आचारात, विचारात कुठेही नव्हता. जमिनीशी त्यांचं नातं होतं. वेशीबाहेरच्या माणसांबद्दल त्यांना जिव्हाळा होता. उपेक्षितांच्या प्रश्नांशी त्यांची निष्ठा होती. ती त्यांनी अनमिषपणे जपली.

त्या गेल्या त्या दिवशी नीरजाताईंनी कळवलं. पण कोविडमुळे लवकरच उरकण्यात आलं. आणि अनंत भावे पुण्याला निघूनही गेले.  पोचता नाही आलं. दूर होतो. पुष्पाताईंची आठवण येत असताना अनंत भावेंना हा त्यांच्याशिवायचा काळ नीट जावा एवढीच प्रार्थना.

प्रा. पुष्पा भावे यांना विनम्र अभिवादन!

- कपिल पाटील
( सदस्य - महाराष्ट्र विधान परिषद , अध्यक्ष - लोक भारती आणि कार्यकारी विश्वस्त - राष्ट्र सेवा दल.)

6 comments:

  1. सर अशा वैचारिक बैठक असणाऱ्या व्यक्तिमत्वांच्या तालमीत तुम्ही घडला आहात याचा सार्थ अभिमान आहे. ते तुम्ही सभागृहात वेळोवेळी सिद्धही केलं आहे आजही बाकीच्या शिक्षक आमदारांना मिळणारा मानसन्मान आणि आपल्याला मिळणारा यात फरक आहे तो दिसतोही आणि दिसलाच पाहिजे, कोणत्याही दगडाला शेंदुर फासला म्हणजे तो देव होत नाही त्याला टाकीचे घाव सोसावे लागतात.आणि तुमच्या वागण्या बोलण्यातून ते घाव जाणवतात.....कपील सर थोडं कुंपणापलीकड जातोय त्यासाठी आधीच क्षमा मागतो पण सर गेला महिनाभर पुणे जिल्ह्यातील काही शिक्षक मित्र तुम्हाला त्यांच्या शाळा अपात्र झाल्यात हे सांगताहेत आणि तुम्ही चक्क दुर्लक्ष करता?त्यांच्या शाळा डोंगरी विभागात आहेत शासकीय अधिकाऱ्यांनी याकडे डोळेझाक करून त्या अपात्र ठरवल्यात हे तुम्ही मंत्री महोदयांच्या लक्षात आणुन दिले तर ते बिचारे किमान पगार तरी घेतील आणि त्या पगारावर तुमचं नाव कोरलं जाईल आयुष्यभर मग सर प्रश्न येतो कुठं?आणि हो हे तुम्हीच करू शकता बाकीचे नाही म्हणुन तुम्हाला गळ घालताहेत ते बिचारे जर होत असेल तर मला वाटतं केलं पाहिजे आपल्या ज्ञानाच्या उजेडाने कोणाचा बंगला प्रकाशित होत असेल तर आनंदच आहे परंतु एखाद्याची झोपडी पण अंधारात राहिली नाही पाहिजे आणि पुन्हा एकदा सांगतो तो दिवा तुमच्याकडेच आहे...... अमोल पाटील 8802993333

    ReplyDelete
  2. , प्राध्यापक पुष्पा भावे मला यामध्ये या कॉलेजमध्ये मराठी विषयात करता होता वरील लेख वाचत असताना त्यांची प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली त्यांचे शिकवणे त्यांचं वाचन त्यांचं राहणीमान साधी राहणी व उच्च विचारसरणी या वृत्तीच्या होत्या अफाट वाचन तसेच विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रोत्साहीत करीत असत

    ReplyDelete
  3. प्राध्यापक पुष्पा भावे मॅडम मला रुईया कॉलेजमध्ये मराठी विषया कविता होत्या वरील लेख वाचत असताना त्यांची प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर उभी राहिले त्यांचे शिकवणे त्यांचं वाचन अफाट होतं साधी राहणी व उच्च विचारसरणी या वृत्तीच्या त्या होत्या अफाट वाचन तसेच विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रोत्साहित करायच्या स्वतः लायब्ररीमध्ये अनेक पुस्तके घेऊन आम्हास वाचनासाठी त्या देत असत वर वरील लेखाच्या माध्यमातून आठवणींना उजळा मिळाला धन्यवाद सर

    ReplyDelete
  4. पुष्पा भावे मॅडम यांच्या बद्दल छान लिहिलेलं आहे तुम्ही सर. उपेक्षितांच्या चळवळी मधले त्यांचे योगदान मोठे आहे. आणि अशा चळवळ करणाऱ्या अनेक व्यक्तींच्या तालमीत तुम्ही तयार झालेला आहात. शिक्षकांच्या प्रश्नासाठी आपण नेहमीच अग्रेसर आहात.

    ReplyDelete
  5. त्यांच्या अनेक प्रसंगी केलेल्या छोट्या छोट्या भाषणानच संकलन करून एक पुस्तिका करायला हवी. साधाच छोटेखानी सभारंभ किंवा सभा असायची पण त्यातही त्या एखादा असा मुद्दा मांडायच्या की त्या विषयाचा आपल्या मनात चाललेला विचार त्या एकदम पुढे घेऊन जायच्या. व्यासंग तर होताच पण एखाद्या विषयाचा चौफेर विचार करण्याची वेगळीच प्रतिभा त्यांच्या पाशी होती. त्यांची अनेक भाषणे ऐकून मी अवाक झालो आहे.पुष्पाताई म्हणजे वैचारिक दबदबा. अनेकदा त्या अत्यंत एककल्ली विचार करतात असा पूर्वग्रह मनात ठेवूनच मी त्यांचे भाषण ऐकायचो पण शेवटी लक्षात यायचे की त्यांचा विचार करण्याचा पैसच मोठा आहे...त्या आपल्या सोबत होत्या ह्याचा नेहमी अभिमान वाटत राहायचा..

    ReplyDelete
  6. आजही पुष्पाताई ची वात्सल्यमूर्ती डोळ्यासमोर आहे तसेच आहे दोन वेळा त्यांच्यासमवेत प्रचाराच्या निमित्ताने फिरण्याचा सहवास लाभला

    ReplyDelete