Monday, 29 August 2022

बिल्किस बानोवरचे अत्याचार भक्तांना मान्य आहेत का?


बिल्किस बानोवर बलात्कार करणाऱ्या त्या ११ जणांची गुजरात सरकारने सुटका केली आहे. गोध्रा कांडानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीत दाहोद जिल्ह्यातील रणधीकपूर गावात बिल्किस बानोवर सामूहिक बलात्कार झाला होता. त्यावेळेला ती पाच महिन्यांची गर्भवती होती. तिच्या तीन वर्षांच्या मुलीला मारण्यात आलं. त्या लहानगीसह घरातील सातही जणांची हत्या करण्यात आली. बिल्किस बानोवर अकरा जणांनी बलात्कार केला. २१ जानेवारी २००८ ला मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत गजाआड केलं होतं. जन्मठेप दिली. १५ वर्षानंतर जास्त काळ कैदेत व्यतित केल्यानंतर सुटका व्हावी म्हणून त्यांनी अर्ज केला. निर्णय गुजरात सरकारने घ्यायचा होता. सरकारने त्यांच्या सुटकेचा निर्णय घेतला तो १५ ऑगस्ट रोजी. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या दिवशी. तुरुंगाच्या बाहेर येताच त्या अकरा जणांचं हार घालून स्वागत करण्यात आलं. गुजरातमधल्या सत्ताधारी पक्षाचे एक आमदार म्हणाले, 'ते दोषी असले तरी ब्राह्मण आहेत. त्यांच्यावर चांगले संस्कार झालेले आहेत.'
देश थंड आहे?
बिल्किस बानो मुसलमान आहे, म्हणून तिच्यावरचा बलात्कार क्षम्य आहे? की बलात्कार करणारे काही ब्राह्मण होते म्हणून बलात्काराचा गुन्हाही क्षम्य आहे?

तर शिवसेनेच्या सामनाने विचारलं, हे कसलं हिंदुत्व?

साध्या भाबड्या हिंदू माणसालाही हा प्रश्न पडला असेल. बलात्कार करणे हिंदुत्वाला मान्य आहे का?

सरळमार्गी ब्राह्मणांनाही कदाचित प्रश्न पडला असेल, ब्राह्मण असल्याने हत्या आणि बलात्काराचा गुन्हाही क्षम्य कसा असू शकतो?

मनुस्मृती या धर्मशास्त्रात ब्राह्मण असल्यास हे दोन्ही गुन्हे क्षम्य केले आहेत. पण ब्राह्मणेतरांनी किंवा शुद्रांनी असे गुन्हे केल्यास त्यास कठोर शिक्षा आहे. वेद मंत्र उच्चारल्यास जीभ छाटावी आणि ऐकल्यास कानात शिसं ओतावं, हा मनुस्मृतीचा दंड आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं ते बापूसाहेब सहस्त्रबुद्धे या पुरोगामी विद्वान ब्राह्मणाच्या हातून. मनुस्मृतीतली एक एक ऋचा बापूसाहेब सहस्त्रबुद्धे वाचून दाखवत होते. त्याचा अर्थ सांगत होते. साध्या माणुसकीला मान्य नसणारा तो मजकूर ते अग्नीच्या स्वाधीन करत होते.

बिल्किस बानो ही मुसलमान असल्याने ती अत्याचाराला पात्र आहे, हे सावरकरी हिंदुत्ववादाचे सार आहे. या वाक्यावर ज्यांना राग येईल त्यांनी विनायक दामोदर सावरकर यांचं 'सहा सोनेरी पानं' हे पुस्तक वाचावं. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला 'पर स्त्री माते समान' असा मान देत छत्रपती शिवरायांनी सन्मानाने परत पाठवलं. अफजल खानाच्या वधानंतर त्याच्या कुटुंबाला अभय दिलं. त्याच्या बायकोला आणि मुलांना सुरक्षित आणि सन्मानाने परत पाठवलं. एका गरीब स्त्रीवर अत्याचार करणाऱ्या रांझेच्या पाटलाचे हात पाय तोडण्याची शिक्षा छत्रपती शिवरायांनी दिली होती. हिंदुत्वाचे जनक असलेल्या सावरकरांना हिंदवी स्वराज्याच्या संस्थापकांचं हे औदार्य मान्य नाही. छत्रपती शिवरायांना सावरकर दोष देतात. अत्याचाराची परतफेड केली नाही म्हणून बुळगा ठरवतात. परस्रीयांचा सन्मान केला म्हणून शिवरायांचा घोर अवमान करतात. छत्रपतींची ती सदगुण विकृती मानतात.

छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्यात परस्त्रीलाही अभय होतं.

छत्रपती शिवरायांना सहा सोनेरी पानांमध्ये सावरकर स्थान देत नाहीत.

फक्त शिवरायांनाच नाही पोर्तुगीजांवर विजय संपादन करणाऱ्या पराक्रमी चिमाजी अप्पांनी एका सुंदर पोर्तुगीज स्त्रीची अशीच परत पाठवणी केली. चिमाजी अप्पा जन्माने ब्राह्मण, तरीही सावरकर त्यांना दोष देतात. मस्तानीशी लग्न करणारा बाजीराव पेशवाही हिंदुत्वाला म्हणूनच मान्य नाही.

गुजरात सरकारच्या ज्या समितीने त्या अकरा जणांच्या सुटकेचा निर्णय घेतला त्यात सी. के. राऊळ होते. ते म्हणाले, 'दोषी ब्राह्मण आहेत. ब्राह्मणांवर चांगले संस्कार असतात. त्यांना अडकवलं असणार.'

ते सारे अकरा ब्राह्मण होते का? खचितच नाही. फक्त तीन ब्राह्मण होते. पाच ओबीसी, दोन एससी, एक बनिया. अत्याचारी कोणत्या जातीचा आहे म्हणून अत्याचार माफ होऊ शकत नाही.

दिल्लीतल्या निर्भयाची आई आशा देवी संतापून म्हणाल्या, 'त्यांना तर फाशीच व्हायला हवी होती.'

पीडिता बिल्किस बानो म्हणाल्या, 'मी सुन्न आहे.'

- कपिल पाटील
(सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद)

-------------------

महिलांचा आदर करणारे शिवराय - श्रीमंत कोकाटे
https://www.esakal.com/saptarang/shrimant-kokate-write-chhatrapati-shivaji-maharaj-article-editorial-172022

2 comments:

 1. देशातील तमाम भक्तांच्या बुद्धीला आवाहन करणारा प्रश्न... खरंतर त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देऊच नये, त्यांचं आणि त्यांच्या आकांचं नैतिक अध:पतन देशाला या कृतिद्वारे मिळालं आहे.
  सत्तेचा माज एखाद्या सरकारला या ही स्तरावर नेऊ शकतो व जातीय निकाषांच्या आधारे बलात्कार, निष्पाप जीवांचे खुन यासारख्या गुन्ह्यांना माफ केले जाते हे न्यायव्यवस्थेची विटंबना करणारं आहे.
  जन्मजात जातीय वर्गवारीनुसार व्यक्तींचं पावित्र्य, शालिनता, देशप्रेम,विद्वत्ता ही मनुस्मृतीची देणं पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आली आहे.राज्यातील ब्राह्मनांना आता दिवसाढवळ्या कोणाही आया-बहिणीच्या पदराला हात घालायला गुजरात सरकारने मुभा दिली आहे.आता एक करा, केंद्रात ही तुमचचं सरकार आहे, आता देशपातळीवर हा न्याय लागू करा आणि सर्व जेलमधील सर्व गुन्हेगार ब्राह्मणांना सजामुक्त करा.. कारण ते ब्रह्माच्या मुखातून जन्मले आहेत.शूद्र, अतिशूद्र,अल्पसंख्यांक व अनुसूचित जाती-जनजातीच्या तमाम बहू बेटीनी त्यांची सेवा करण्याचा व पवित्र होण्याचा वटहुकूम काढा... म्हणजे गुन्ह्यांची नोंदच होणार नाही, तपासयंत्रणा व न्यायालयीन व्यवस्थेवर पारदर्शी न्यायदानाची जबाबदारी येणार नाही.
  कारण,न्यायव्यवस्था, केंद्रीय तपास यंत्रनांना आधीच तुमच्या विरोधकांचे पाळं-मुळं खोदायचं काम करायचं आहे...
  टीप - जगातल्या सगळ्या हुकूमशहांचा अंत अत्यंत विदारक व भीषण झाला आहे. इतिहासातील या नोंदी मात्र लक्षात असू दया.....

  ReplyDelete
 2. अशा हिंदुत्वादी वैचारिक पातळीने भारत देश बदनाम होईलच आणी पुढे काय काय होईल विचार करून मन सुन्न होत आहे

  ReplyDelete