Sunday 23 April 2023

निखिल वागळे आग आहेत


विस्तव हा शब्द अधिक चांगला. विस्तव हातावर घेता येत नाही. विस्तव स्वतः जळत असतो. त्यातून निर्माण होणारी उर्जा नव्या निर्मितीला आच देत असते. विस्तव जळत असतो स्वतः, पण वाईटाची राख करण्यासाठी. १९७७ पासून हा निखारा पेटलेला आहे.

अवघ्या २२ - २३ व्या वर्षी ते संपादक झाले. दिनांक साप्ताहिकाचे. बाळशास्त्री जांभेकरांच्या नंतर इतक्या तरुण वयात संपादक झालेला दुसरा कोणी नसेल. आता ती परंपरा हरवली आहे. महाराष्ट्रातल्या पत्रकारितेची आणि संपादकांची खास परंपरा राहिली आहे, जे जे अनिष्ट आहे त्या विरोधात उभं राहायचं, अन्यायाच्या विरोधात आवाज उठवत राहायचं. त्या सगळ्या संपादकांची त्या त्या वेळची सगळी मतं बरोबर असतीलच असं नव्हे. शेवटी आकलनाचा, उपलब्ध साधनांचा, सामाजिक अवकाशाचा, आर्थिक - सामाजिक संबंधांचा प्रश्न असतो खरा. परंतु बाळशास्त्री जांभेकर आणि फुले - शाहू - आंबेडकरी ही परंपरा एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला टिळक - आगरकरी परंपरा. या परंपरेत एक सामान दुवा आहे, यातली एकही परंपरा अप्रामाणिक नाही. जी बाजू समोर आली, जे सत्य समोर आलं, त्या सत्याच्या बाजूने ते उभे राहिले. सुधारणांचा त्यांनी कैवार घेतला. या परंपरेत निखिल वागळे अगदी फिट्ट बसतात.

विस्तवासारखी वागळेंची भाषा प्रखर आहे. जाळते ती. वेदना देते. त्या आगीत सुक्याबरोबर ओलंही कधीकधी जळतं. पण त्याचा दोष विस्तवाला, आगीला कसा देता येईल?

निखिल वागळेंसोबत १९७८ पासून आहे. राष्ट्र सेवा दलाच्या शिबिरात. अभ्यासवर्गात. साप्ताहिक दिनांकच्या कचेरीत. नंतर नामांतराच्या चळवळीत. नंतर महानगरमध्ये. त्यावेळच्या सेनेच्या दहशतीच्या विरोधात लढताना, जातीयवाद्यांशी पंगा घेताना निखिल वागळे यांना खूप जवळून पाहिलं आहे. त्यांचं प्रेम, त्यांचं मैत्र्य जितकं अनुभवलं तितकाच राग आणि भांडणही अनुभवलं. काही प्रश्नांवरच्या भूमिकांमधलं अंतरही पाहिलं.

वागळेंसाठी वाद नवे नाहीत.
वादामधली त्यांची बाजू १०० टक्के बरोबर असते, असं मी म्हणणार नाही. पण त्यांची भूमिका ठाम असते. आणि आपल्या भूमिकेशी ते हिंमतीने, प्रामाणिकपणे घट्ट चिकटून राहतात. त्या भूमिकेसाठी ते युद्ध खेळतात. त्यासाठी हवी ती किंमत मोजतात. मार खातात. तब्बेतीची पर्वा करत नाहीत. मृत्यूला भीत नाहीत.

कुणी तरी जात काढली म्हणून सांगतो आहे,
डंके की चोट पर एक गोष्ट नक्की सांगेन की, ते दलित, आदिवासी, पिछडे, बहुजन, अल्पसंख्यांक, स्त्रिया, उपेक्षित घटक यांच्या बाजूनेच आहेत. निखिल वागळे लढणारा पत्रकार आहे. जीव जाईल पण जातीयवाद्यांशी, हुकूमशहांशी, प्रस्थापित व्यवस्थेशी कधीही हात मिळवणी करणार नाही. फॅसिझमच्या विरोधातली त्यांची भूमिका स्वच्छ आहे.

फॅसिझम विरोधात जे जे लढताहेत त्यांना प्रामाणिकपणे सांगितलं पाहिजे की शुद्धतेच्या दांभिक कसोट्या कुणी लावू नये. फॅसिझमच्या विरोधात जो जो लढतो आहे तो आपला मानला पाहिजे. या देशातला फॅसिझम हा हिटलरी फॅसिझम नाही हा नथुरामी फॅसिझम आहे. फॅसिझमच्या विरोधात लढणाऱ्यांनी तुझं शस्त्र बोथट, माझं हत्यार धारधार म्हणत परस्परांवर वार करण्यात काय हाशील आहे?

नथुरामी फॅसिझमच्या पातळ यंत्राशी लढण्यासाठी सगळ्यांना एकजूट करावी लागेल. गांधी - आंबेडकरी विचारांच्या आणि मार्गाच्या समन्वयाशिवाय ते शक्य नाही. हा खरा 'आजचा सवाल' आहे. निखिल वागळेंसारख्या निर्भय पत्रकारांची भूमिका त्यात निर्णयाक असणार आहे.

निखिल वागळे यांचा आज वाढदिवस आहे. ते पासष्टीत पदार्पण करत आहेत. त्यांना निरोगी आणि दीर्घ आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि मनापासून सलाम!
- कपिल पाटील

6 comments:

  1. योग्य परिचय दिला साहेब....

    ReplyDelete
  2. औरंगाबाद शिक्षकभारती तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

    ReplyDelete
  3. खूप खूप शुभेच्छा वागळे सर

    ReplyDelete
  4. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वागळे सर

    ReplyDelete
  5. निखिल वागळे सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    ReplyDelete