Saturday 20 July 2024

पैशाने पोखरलेली निवडणूक पद्धत आणि Proportionate representation ची गरज


धारदार बनलेल्या धर्मसंघर्षांना बोथट करण्याची, परस्पर अस्तित्त्व आणि भागीदारी मान्य करण्याची शक्यता प्रमाणशीर प्रतिनिधित्वातच मिळू शकते. 


महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत कोटी कोटींची उड्डाणं झाली. चर्चा दबक्या आवाजात नाही, उघड होत होती. आमदार खरेदी नव्हे आमदारांच्या मतं खरेदीसाठी कोटींची बोली लावली जात होती. याचं अनेकांना आश्चर्य वाटेल. नवीन काहीच नाही. आकडा फक्त फुगत चालला आहे.

आमदारांच्या एका मताची ही किंमत. सामान्य मतदाराची किती असेल ?

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातही पैसे वाटपाची चर्चा राजकीय दालनांमध्ये उघडपणे ऐकू येत होती. मताला 5 हजार, 7 हजार आणि 10 हजार असे रेट तीन उमेदवारांनी लावल्याचे उघड बोललं जात होतं. पैशाच्या बळावर विधानपरिषदेच्याच निवडणुका हायजॅक केल्या जातात, असं नाही. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही मतखरेदीसाठी पैशाचं वाटप सुरू झालं आहे. सरसकट सर्वांनाच दिले जातात आणि सर्वच घेतात ही काही वस्तुस्थिती नाही. पण पैसे देण्याची आणि घेण्याची लागण झाली आहे, हे नाकारता येत नाही.

निवडणूक आयोगाने दिलेल्या खर्चाच्या बंधनात निवडणूक लढण्याचे दिवस कधीच इतिहास जमा झाले आहेत. कर्नाटकचे जेष्ठ माजी मंत्री सांगत होते की, तिथे एका विधानसभा मतदार संघाचा खर्च 50 कोटींच्या घरात गेला आहे. ते असंही म्हणाले की, सगळ्याच मतदार संघात हाच आकडा आहे, असं नाही. आणि 50 कोटी खर्च करणारा निवडून आला, असंही झालेलं नाही. काही ठिकाणी त्या तुलनेत नगण्य खर्च करणारा गरीब उमेदवारही निवडून आला आहे. दक्षिणेतील राज्यांमधील ही चर्चा आता महाराष्ट्रातही सुरू झाली आहे.

लोकसभेत पैशाचा वापर फारसा होत नाही, असं मानलं जात होतं. पैशाशिवाय कोणतीच निवडणूक शक्य नाही, हे सगळेच राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते मोठ्या चिंतेने आता म्हणत आहेत. निवडणुकच विकत घेतली जात असेल तर ज्या निवडणुकीतून लोकशाही प्रस्थापित होते तीच पोखरून निघते.

निवडणुकीतल्या खर्चाची ही परंपरा लोकशाहीची जन्मभूमी मानली गेलेल्या अथेन्स इतकीच प्राचीन आहे. सिमॉन लोकप्रिय होते. हमखास निवडून येत होते. 461 ईसापूर्व काळातली गोष्ट आहे. सिमॉनला पाडण्यासाठी पेरिकल्सने पैशांचा वापर केला. मेळे भरवायला सुरवात केली. freebies ची लयलूट केली. पेरिकल्सने निवडणूक जिंकली. याच मार्गाने तो जिंकत राहिला. अथेन्स पोखरून गेलं. स्पार्टाबरोबरच्या युद्धात अथेन्सची पैशाने पोखरलेली लोकशाही धारातीर्थी पडली. नंतर आलेल्या प्लेगमध्ये पेरिकल्स आणि त्याचे कुटुंबीय.

भारतातली प्राचीन गणराज्यं, “अंतर्गत भेदाने पोखरत नाहीत तोवर अभेद्य राहतील’’ असा इशारा तथागत बुद्धांनी त्यावेळी दिला होता. भारताच्या लोकशाहीपुढे ही दोन्ही आव्हानं आहेत. भ्रष्टाचाराने आणि मतखरेदीने निवडणुकच हायजॅक केली जाते. लोकशाही पोखरली जाते. धर्म - जातींच्या वैमन्यस्यातून आणि निवडणुकीतल्या भ्रष्टाचारातून भारतीय लोकशाही गणराज्याला सगळ्यात मोठा धोका निर्माण झाला आहे.

निवडणूक खर्चावर आणि निवडणुकीतील भाषणांवर बंधनं टाकण्याचा जुजबी उपाय सुचवला जातो. आयोगाने घातलेली बंधनं आणि कायद्यातली व्यवस्था पैसा आणि नफरतीच्या शस्त्रापुढे कमजोर ठरतात, याचा अनुभव पुन्हा पुन्हा येतो आहे. देशातली भ्रष्टाचाराची सगळ्यात मोठी गंगोत्री निवडणुकीतला खर्च हीच आहे.

शासनाने खर्च उचलण्याचा उपाय बिनकामाचा आहे. मत खरेदीला त्यातून अटकाव कसा होणार ?

खरी समस्या आहे ती, First Past the Post या व्यवस्थेत. भारतीय निवडणुका 1935 च्या ब्रिटिश कायद्यानुसार होतात. निवडणुका कशा घ्याव्यात याची पद्धत संविधानाने निश्चित केलेली नाही. First Past the Post मध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांमध्ये जो एक मत इतरांपेक्षा जास्त घेईल तो निवडून येतो. काही अपवाद सोडले तर निवडून येणारे उमेदवार 31 ते 38 टक्के मतांच्या दरम्यानचे असतात. याचा अर्थ 69 ते 62 टक्के मतदार हे निवडून आलेल्या उमेदवाराला नाकारत असतात. म्हणजे पराभूत उमेदवारांची एकत्रित बेरीज 69 टक्के असूनही निकालानंतर त्या खंडित मताधिक्याला कायदेमंडळाच्या कोणत्याही सभागृहात कोणताही say नसतो.

विधान परिषदेच्या किंवा राज्य सभेच्या निवडणुकांमध्ये Preferential voting पद्धत असते. 50 टक्के मतांचा कोटा किमान पूर्ण करावा लागतो. तरच निवडून येता येतं.

विधानसभेत किंवा लोकसभेत 50 टक्के सुद्धा मतं मिळवावी लागत नाहीत. 30 ते 31 टक्के मतांच्या शिदोरीवर आणि प्रतिस्पर्धी निकटच्या उमेदवारांपेक्षा एक मत अधिक मिळवून निवडून येता येतं. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात अमोल कीर्तिकर हे अवघ्या एका मताने पुढे होते. मात्र रवींद्र वायकर पोस्टल बॅलेटसह 48 मतांनी निवडून आले.

ही व्यवस्था समाजातल्या सगळ्या घटकांना किंवा मतांना प्रतिनिधित्व कधीच देत नाही. Proportionate representation हा त्यावरचा उपाय आहे. प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीने निवडणुका घेतल्या तर समाजातल्या सगळ्या घटकांना प्रतिनिधित्व मिळू शकेल. अल्पसंख्य किंवा वंचित घटकांना alliances करून परस्परांच्या मदतीने सभागृहात जाता येईल.

एकेकाळी भारतीय जनता पक्ष आणि देशातील कम्युनिस्ट पक्ष प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या बाजूने होते. तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस आणि आताची सत्ताधारी भाजप प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची चर्चाही करत नाहीत. न्यायमूर्ती व्ही. एम. तारकुंडे यांनी जयप्रकाशजींच्या लोकशाही उठावानंतर प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची चर्चा व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न केला होता. पण अल्पकालीन जनता राजवटीत तो मुद्दा पुढे काही गेला नाही.

भारतीय समाजातील आणि त्या त्या राज्यातील सगळ्याच घटकांना, समूहांना आणि विचारधारांना त्यांच्या संख्येनुसार किंवा ताकदीनुसार प्रतिनिधित्व मिळालं तरच भारतीय लोकशाही अधिक Participative किंवा सहभागाची ठरू शकेल. प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीत मोठे राजकीय पक्ष बलवत्तर होतील असं मानलं जातं, यात फारसं तथ्य नाही. उलट भारत हे संघ राज्य आहे. Union of states आहे. त्यामुळे त्या त्या राज्यातलं योग्य प्रतिनिधित्व ताकदीने पुढे येऊ शकेल. देश जसा राज्य संघ आहे, Union of states आहे तसाच तो बहुवांशिक, बहुसांस्कृतिक, बहुभाषिक आहे. अनेक वंश, संस्कृती, भाषा, परंपरा, जात, धर्म आणि आस्था यांना मानणाऱ्यांचा तो संघ आहे. या देशाचं सगळ्यात मोठं सौंदर्य आणि वैशिष्ट्य हेच आहे. हे वैशिष्ट्य आणि ही सुंदरता वर्तमान निवडणूक पद्धतीतून प्रतिबिंबित होत नाही. त्यामुळे या घटकांतर्गत संघर्षांना अनेकदा आमंत्रण मिळतं किंवा बळ मिळतं.

बलवत्तर जाती बलवत्तर बनतील ही भीती अनाठायी आहे. कारण छोट्यातल्या छोट्या समूहांना प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीत किमान आवाज मिळेल. छोट्या घटकांच्या सहअस्तित्त्वाची दखल घेणं, त्यांना भागीदारी किंवा हिस्सेदारी देणं हे मोठ्या पक्षांनाही भाग पडेल. भारत हा राज्य संघ असल्यामुळे त्या त्या राज्यातील मतांच्या विभागणीनुसार सगळ्या घटकांना राज्यनिहाय प्रमाणशीर प्रतिनिधित्व मिळण्याची व्यवस्था होईल.

अनेक राज्यांमध्ये आरक्षणाच्या मुद्यांवरून उभे राहिलेले नवे संघर्ष शेती संकटाशी निगडीत असले तरी त्या संघर्षांना धार चढली आहे ती प्रमाणशीर प्रतिनिधित्व नाकारलं गेल्यामुळे.

धारदार बनलेल्या धर्म संघर्षांना बोथट करण्याची, परस्पर अस्तित्त्व आणि भागीदारी मान्य करण्याची शक्यता प्रमाणशीर प्रतिनिधित्वातच मिळू शकते.

भारतीय संविधान आणि संविधानकर्त्यांचा हेतू आज संकटात आहे. देशातील दोन्ही पक्ष संविधानाच्या बाजूने बोलत आहेत. पण निवडणूक पद्धतीतल्या कॅन्सरवर उपाय करण्यास तयार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी या दुर्धर आजारावर उपाय करायला तयार आहेत का ?

- कपिल पाटील
अध्यक्ष, समाजवादी गणराज्य पार्टी
kapilhpatil@gmail.com

--------------------

पूर्वप्रसिद्धी - दै. लोकसत्ता 19 जुलै 2024 

पैशाने पोखरलेली निवडणूक पद्धत आणि प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची गरज
- कपिल पाटील

***

Friday 12 July 2024

तूर्त रजा घेतो, पण कायम तुमच्या सोबत आहे



मा. संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षक - बंधू भगिनींनो,

सप्रेम नमस्कार,
मुंबई शिक्षक मतदार संघातून सलग तीन टर्म, तुम्ही मला निवडून दिलंत. 18 वर्ष मी तुमचा प्रतिनिधी, तुमचा आमदार होतो. आता मी तुमची रजा घेत आहे, कारण माझी मुदत संपली आहे. या 18 वर्षांमध्ये तुमच्या सर्वांच्या सोबतीमुळे आपण शिक्षकांना सन्मान मिळवून दिला. अनेक प्रश्न मार्गी लावले.

आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख या महामानवींचे फोटो आता देशातल्या प्रत्येक शाळेत लागले आहेत. तुम्ही दिलेली साथ आणि शिक्षक भारती यांच्या प्रयत्नांमुळेच हे शक्य झालं.

सलाम -
चौथी निवडणूक आपण किरकोळ मतांनी हरलो असलो तरी सुभाष सावित्री किसन मोरे निवडणूक हरलेला नाही. पैसा, सत्ता आणि अपप्रकार यांचीच चर्चा या निवडणुकीत जास्त झाली. या निवडणुकीत विरोधकांकडून चुकीचे मार्ग अवलंबले गेले. त्यांच्याकडे सत्तेची प्रचंड ताकद होती. आपली साधनं अपुरी होती. तरीही आपण सारे निकराने लढलो. प्रलोभनांना भीक न घालता ठाम राहिलो. शिक्षक भारतीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मूल्यांशी कधीही प्रतारणा केली नाही. त्यांनी त्यांचा किल्ला लढवला. निष्ठेने जागले. अनेक सामान्य शिक्षक आणि मुख्याध्यापक, संस्थाचालक यांनीही आपलं इमान विकलं नाही. अनेकांनी आलेली पैशाची पाकीटं परत केली. ज्यांना परत करता आली नाहीत त्यांनी सुभाषला मतदान केलं. न नमता सोबत राहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांना सलाम !

यापुढच्या संघर्षात आपण सारे एकत्र राहू. शिक्षक भारती संघटना अजून मोठी करू. तुम्ही जेव्हा जेव्हा अडचणीत असाल, तेव्हा शिक्षक भारती तुमच्या सोबत असेल. मी तुमच्या सोबत असेन.

विश्वास आणि निर्धार -
सुभाष मोरे याने अलिकडेच्या पेन्शनच्या लढाईत सर्वांना पेन्शनचा अधिकार मिळवून दिला. निवडणूक आपण गमावली असली तरी सुभाषने दिलेला पेन्शनचा अधिकार हिरावून घेतला जाणार नाही, एडेड असो किंवा अनएडेड असो आपल्या अधिकाराबद्दल आपण जागरूक राहू. निवडणुकीत ज्यांनी दगाफटका दिला आहे, ते या अधिकारालाही दगाफटका देणार आहेत. पण घाबरू नका, तुमच्यासोबत मी स्वत:, अशोक बेलसरे सर, सुभाष मोरे आणि संपूर्ण शिक्षक भारती ठामपणे उभी राहील. विधीमंडळात नसलो तरी सडकेवर आपण सोबत आहोत.

अनएडेड संस्थांमधील शिक्षकांचं अपरिमित शोषण होतं. त्यांना स्केल सुद्धा मिळत नाही. एडेड शाळेमध्ये लाखांचा पगार, अनएडेड शाळेमध्ये काही हजारात पगार. ही विषमता संपून एडेड प्रमाणे अनएडेडला सुद्धा सन्मानजनक वेतन आणि पेन्शन मिळालं पाहिजे, यासाठी शिक्षक भारतीच्या माध्यमातून आपण सारे प्रयत्न करू. शिक्षक भारती समतेसाठी, समान न्यायासाठी म्हणजे समाजवादी विचारांसाठी कटिबद्ध आहे.

मुंबईतल्या सगळ्या शिक्षण संस्थांना मालमत्ता करातून सूट देण्याचं काम आपण केलं आहे. कोट्यवधी रुपयांचा फायदा या पुढच्या काळात संस्थांना होत राहणार आहे. संस्थांना यात काही अडचण आल्यास मदतीसाठी शिक्षक भारती सदैव सोबत आहे.

1 तारखेला राष्ट्रीयकृत बँकेतून पगार देण्याचा ऐतिहासिक निर्णय आपण करू शकलो. पुढे महाराष्ट्रभर शिक्षकांना त्याचा फायदा झाला. शिक्षण सेवक नावाचा अपमान पुसला, मानधन वाढवलं. सरप्लस महिला शिक्षिकांना मुंबई बाहेर जाऊ दिलं नाही. रात्रशाळा वाचवल्या. शिक्षकांच्या कामाचे तास कमी केले. स्पर्धा परीक्षेत टिकण्यासाठी एसएससी बोर्डाचा अभ्यासक्रम बदलला. महापुरात वाहून गेलेल्या शाळांना नवीन इमारती मिळवून दिल्या. तत्कालीन शिक्षणमंत्र्यांचा अन्यायकारक मसुदा स्क्रॅप करायला लावला. शाळांचं कंपनीकरण करणारं बिल रोखलं. कंपनीमार्फेत होणाऱ्या शिक्षक भरतीला विरोध केला. खाजगी विद्यापीठात आरक्षणाची तरतूद करायला भाग पाडलं. विद्यार्थी फ्रेंडली टाईमटेबल बनवले. वस्तीशाळा शिक्षकांना कायम केले. यादी मोठी आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा महाराष्ट्र विधान परिषदेत आमदार होते तेव्हा त्यांनी प्रसूती रजेचं बिल कामगार नेते एन. एम. जोशींच्या मदतीने मांडलं होतं. ते मंजूर झालं होतं. पुढे देशाचे मंजूर मंत्री म्हणून बाबासाहेबांनी देशातील महिलांना तीन महिन्यांची प्रसूती रजा बहाल केली होती. त्याच महाराष्ट्र विधान परिषदेत शिक्षक भारतीचा आमदार म्हणून मी जेव्हा गेलो तेव्हा ती रजा आपण सहा महिन्यांची केली. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पाईक म्हणून मी हे करू शकलो, याचा मला अभिमान आहे.

समाजवादाची लढाई -
इंडिया आघाडीत आपण सोबत राहिलो. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी त्यांना मतदान केलं. इंडिया आघाडीतल्या प्रमुख पक्षांची तक्रार होती की, भाजपने त्यांचे पक्ष चोरले, पळवले. पण इंडिया आघाडीतील छोट्या पक्षांशी मोठे पक्ष कसे वागले ? भाजपसारखेच ?

इंग्लंडमध्ये लेबर पार्टी 400 पार जाऊन जिंकली आहे. फ्रान्समध्ये फॅसिझमला तिथल्या जनतेने नकार दिला. तर इराणमध्ये सुधारणेच्या दिशेने एक पाऊल पडलं आहे. सामाजिक न्याय आणि समतेसाठी समाजवादाची लढाई पुढील काळात आपल्याला एकजुटीने लढावी लागेल. शोषण संपवण्यासाठी समाजवादाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यासाठीच शिक्षक भारती आणि समाजवादी गणराज्य पार्टीचा आग्रह आहे. या पुढच्या लढाईत आपण आपल्या चुका, त्रुटी दुरुस्त करू आणि शिक्षक आणि सामान्यांच्या हितासाठी एकत्र राहू. लढू आणि जिंकू.

शिक्षक आणि शिक्षण विरोधी हितसंबंधीय समाजवादी विचारांचा रस्ता रोखत राहणार असले तरी आपण सारे रणात उभे आहोत. आणि हे रण आपणच जिंकणार आहोत.

तूर्त आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद !

आपला स्नेहांकित,

कपिल पाटील
संस्थापक अध्यक्ष, शिक्षक भारती
अध्यक्ष, समाजवादी गणराज्य पार्टी

दि. 12 जुलै 2024

------------------

विधान परिषद कपिल पाटलांसारख्या चांगल्या संसदपटूला मुकणार आहे - देवेंद्र फडणवीस
Tap to watch - https://youtu.be/eTIhvj1n3o4   

यशवंतरावांना अपेक्षित, समाजवादाचा पाळणा सत्तर वर्षात हलला नाही याचं दु:ख - कपिल पाटील 

वैचारिक मतभेद असूनही सगळ्यांना कपिल पाटील आपला माणूस कसे वाटतात ? - निलम गोऱ्हे 

कपिल पाटील जबाबदारीला वाहून घेतलेला लोकप्रतिनिधी - एकनाथ शिंदे 

सतेज पाटील, शशिकांत शिंदे आणि अनिल परब यांनी कपिल पाटील यांना काय शुभेच्छा दिल्या ?

🙏