Friday, 5 December 2025

फडणवीसांना कसं नाकारणार ?



मुंबईच्या Aqua Line मधून सहकुटुंब प्रवास करताना निखिल वागळेंना सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. मोठ्या आनंदाने त्यांनी ती पोस्ट करताना 'थँक्यू फडणवीस' म्हटलं. मनापासून त्यांना मुख्यमंत्र्यांचं कौतुक करावंसं वाटलं. देवेंद्र फडणवीस यांची हीच तर जादू आहे.

पाच वर्षांच्या खंडानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या दुसऱ्या टर्मची आज वर्षपूर्ती झाली. पहिल्या टर्ममध्ये त्यांनी जी पेरणी केली, ती आज फळाला आली आहे. तिच्या लाभापासून विरोधकही वंचित नाहीत. जात, धर्म आणि पक्षभेदाच्या पलीकडे जात विकासाचे जे मार्ग त्यांनी अवलंबले त्याची दृश्य रूपे आहेत, जमिनीवरची मेट्रो किंवा जमिनीखालची Aqua Line.

भाजपचं किंवा सत्ताधारी पक्षांचं राजकारण आपल्याला मान्य असण्याचं कारण नाही. पण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी केलेली कामगिरी नाकारता येणार नाही. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासूनच्या इतिहासात सर्वाधिक आर्थिक गुंतवणूक राज्यात कुणी खेचून आणली असेल तर ती फडणवीस यांनी.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील भाजपचे किंवा महायुतीचे. पण त्यांनी कायम हे भान राखलं की आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहोत. भाजप शासित अन्य राज्यांपेक्षा इथलं राजकारण वेगळं आहे. महाराष्ट्रात तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षात असा, तुम्हाला शिव - फुले - शाहू - आंबेडकर ही चौकट मोडता येत नाही. सत्तेवर कोणी बसो, त्याला ही लक्ष्मण रेखा ओलांडता येत नाही. राजकारणात Relevent राहावं लागतं असं देवेंद्र फडणवीस स्वतः रजत शर्माच्या आप की अदालत मध्ये म्हणाले होते. फडणवीसांना ते पक्कं उमजलं म्हणूनच ते टिकून राहिले. पुन्हा परत आले.

महाराष्ट्रात विकासाचा मानदंड म्हणून शरद पवारांचा कायम उल्लेख होत असे. मध्ये 25 – 30 वर्षांचा काळ गेला आहे. ती जागा आता देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.

गेल्या काही वर्षात मार्केट इकॉनॉमी वेगाने बदलली आहे. टेक्नॉलॉजीमधल्या IT ते Ai पर्यंतच्या वेगवान बदलाने जगभरच्या अर्थव्यस्थेने नवा आकार घेतला आहे. त्यात महाराष्ट्राचं स्थान फक्त टिकवून ठेवणे नाही तर ते अव्वल ठेवणे यासाठी लागणारी दूरदृष्टी आणि व्यापक भान दोन्ही देवेंद्र फडणवीसांकडे आहे. अन्यथा मुंबईत कोलकाता आणि दिल्लीच्या आधीच मेट्रो यायला हवी होती.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अमृत महोत्सवानिमित्त एका शिक्षण विषयक परिसंवादात त्यावेळचे आमदार देवेंद्र फडणवीस आणि मी वक्ते म्हणून होतो तर विधान सभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील परिसंवादाचे अध्यक्ष. राजा राममोहन रॉय आणि महात्मा फुले यांनी आधुनिक शिक्षणाची मागणी केली होती. त्याचा संदर्भ देत, ते शिक्षण आता वंचितांच्या हातून निसटत असल्याचा माझा मुद्दा होता. जगभर होणाऱ्या नव्या अर्थव्यवस्थेतील बदलानुसार आवश्यक असलेले शिक्षणाचे नवे अभ्यासक्रम विकसित करण्यावर देवेंद्र फडणवीस यांचा भर होता. वळसे पाटील महाराष्ट्रातल्या सत्ताधारी नेते स्वाभाविकच त्यांनी शिक्षणाच्या खाजगीकरणाचा पुरस्कार केला. सत्ताधारी वर्गाच्या हातात असलेल्या विनाअनुदानित संस्था आणि खाजगी विद्यापीठे यांची बाजू त्यांनी घेणे स्वाभाविक होतं. पण देवेंद्र फडणवीस त्याबाजूला नाहीत, हे त्यादिवशी माझ्या लक्षात आलं. वेगाने बदलणाऱ्या जगामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची मुलं मागे राहू नयेत याची त्यांना चिंता होती. फुले -आंबेडकरी विचारधारेचा ज्या पक्षाशी संघर्ष आहे, त्या पक्षाचा नेता आधुनिकतेचा आणि नवतेचा विचार करतो, वंचितांचीही काळजी घेतो, हे फडणवीसांचं वेगळेपण आहे.

खाजगी विद्यापीठांच्या विरोधात, महाग होणाऱ्या शिक्षणाच्या संदर्भात काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी सरकारशी विधिमंडळात मला सतत संघर्ष करावा लागला. खाजगी विद्यापीठांमधील आरक्षण आणि शिष्यवृत्तीच्या योजना त्यानंतर सुरु झाल्या. सरकारी शिष्यवृत्त्या थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याची DBT योजना प्रभावीपणे राबवण्याचे सर्व श्रेय देवेंद्र फडणवीस यांनाच द्यावं लागेल. कल्याणकारी योजना यशस्वी करण्याचं DBT हे सगळ्यात चांगलं Tool ठरलं आहे. देशात सर्वप्रथम ते फडणवीस यांनी केलं, हे ही सांगितलं पाहिजे.

गोविंद पानसरे यांची हत्या, कम्युनिस्ट पक्षाचं आदिवासी शेतकऱ्यांचं आंदोलन, प्रकाश आंबेडकरांची आंदोलने, प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेली आदिवासी शेतकऱ्यांची आंदोलने, मुंबई मनपा सफाई कामगारांचे आंदोलन, विद्यार्थी / शिक्षकांची आंदोलने, नक्षलवादी मुलांची अटक अशा अनेक प्रश्नांवर फडणवीस सरकारशी विधिमंडळात माझा संघर्ष झाला. शनीशिंगणापूरच्या एका प्रश्नावर सत्ताधारी पक्षाचे आमदार तर माझ्या अंगावरच उसळले होते. पण या सगळ्या प्रकरणांमध्ये मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला प्रतिसाद अत्यंत प्रगल्भ आणि लोकशाहीची बूज असलेल्या राज्यप्रमुखाचा होता. त्यांनी कधीही शत्रू मानलं नाही. उलट या संघर्षामध्ये समेटाच्या जागा शोधण्यासाठी त्यांनी मलाच पुढे केलं. चर्चेतून मार्ग काढला.

विलासराव देशमुख आणि माझी खरोखरच घट्ट मैत्री होती. पण सभागृहात त्यांच्या सरकारी बिलांच्या विरोधात मी मतदान करत असे. ते स्वतः सभागृहात असतानाही. खैरलांजी प्रकरणात आणि अल्पसंख्यांकांच्या प्रश्नांवर मी सरकारवर टीकेची झोड उठवली तेव्हा गृहमंत्री असलेले आर. आर. आबा पाटील खूप अस्वस्थ झाले होते. त्यांना शांत करत विलासराव म्हणाले होते, ''तो समाजवादी आहे. विरोधी बाकावर आहे. तो तसंच बोलणार.'' सभागृहातली चर्चा संपली. माझ्या खांद्यावर हात ठेवून मुख्यमंत्री बाहेर आले. आबांना तेव्हा लक्षात आलं. मग आबांची आणि माझीही मैत्री झाली. असाच उमदेपणा, दिलदारपणा देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही मी अनुभवला.

राजकारणात तुम्ही शत्रू नसता. कुणी सत्ताधारी बाकावर असतो, कुणी विरोधी बाकावर. विरोधी स्वरालाही स्पेस मिळाली पाहिजे. तो अवकाश रुंद करण्याची जबाबदारी राज्यप्रमुखाची असते. देवेंद्र फडणवीस यांनी हा अवकाश विरोधकांना कायम दिला आहे. बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या ट्रस्टचं अध्यक्षपद उद्धव ठाकरेंना देण्याचा दिलदारपणा केवळ देवेंद्र फडणवीसच दाखवू शकतात.

समाज बहिष्कृत करण्याच्या जात पंचायतीच्या प्रथेवर बंदी घालणारं विधेयक पास करण्याची हिम्मत देवेंद्र फडणवीस यांनी दाखवली. अनाथ मुलांसाठी एक टक्का समांतर आरक्षण देण्याचा निर्णयही त्यांचाच आहे. या दोन निर्णयांनी सामाजिक सुधारणांच्या कोरीव लेण्यांवर त्यांचं नाव कोरलं गेलं आहे. लॉर्ड बेंटिंगने जे केलं, रावसाहेब बोलेंनी महाराष्ट्र विधान परिषदेत जे केलं, तेच देवेंद्र फडणवीस यांनी. कसं नाकारणार ?

संघाच्या एका सर्वोच्च नेत्याची भेट एकदा विमानतळावर झाली होती. माझी समाजवादी पार्श्वभूमी आणि हिंदुत्वाचा विरोध त्यांना पक्का माहित होता.
ते म्हणाले, ''नितीन गडकरींशी तुमची मैत्री आहे, हे मला माहित आहे. पण फडणवीसांबद्दल तुमचं मत काय ?''

जात पंचायत आणि अनाथांचा आरक्षण या दोन निर्णयांमुळे देवेंद्र फडणवीस मला मित्र वाटतात, मी म्हणालो.

अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी दिलेलं, आमदारांच्या सोसायटीतलं घर मी नाकारलं. तसंच आमदार देवेंद्र फडणवीस यांनीही.

देवेंद्र फडणवीस आपल्या वैचारिक विरोधकांना शत्रू मानत नाहीत.

त्यांची कारकीर्द बेदाग आहे.

दुसऱ्या टर्ममधील पहिल्या वर्षाची पूर्ती झाली म्हणून शुभेच्छा तर द्यायलाच हव्यात.

- कपिल पाटील
अध्यक्ष, हिंद मजदूर किसान पंचायत, महाराष्ट्र


No comments:

Post a Comment