Friday, 11 April 2014

हे तर देशाच्या संविधानाला आव्हान


देशातल्या मिडीयाबरोबरचा हनिमून संपल्याबरोबर अरविंद केजरीवालांनी सगळ्या मिडियाला थेट जेलमध्ये टाकण्याची घोषणा करून टाकली. नागपूरमध्ये  लब्ध प्रतिष्ठांच्या समवेत डिनर पार्टी करताना केजरीवालांनी काढलेले हे उद्गगार सांगोवांगी नाहीत. ध्वनीचित्र मुद्रित आहे.  दुसरया दिवशी आपण तसं बोललोच नाही असं बिनदिक्कतपणे सांगत त्यांनी यू टर्न  घेतला. राजकारणातल्या या यू टर्नला दिल्लीत केजरीवाल टर्न असं नाव  पडलं आहे. पण मिडियाला धमकावण्याचं  सत्र संपलेलं  नाही. दिल्लीत मिळालेल्या सत्तेनं उडालेलं विमान अजून जमिनीवर यायला तयार नाही.

जून १९७५ च्या आणीबाणीला तीन तपं उलटून गेली आहेत. आणीबाणीनंतर जन्माला आलेल्या पिढ्यांना त्या जेलचा अनुभव नही. पण आणीबाणीच्या तुरुंगाचे चटके सोसलेली पिढी अजूनही जीवंत आहे. साठी - सत्तरीत असलेल्या या पिढीला वृत्तपत्र स्वातंत्र्य गामावणे म्हणजे काय हे चांगल ठाऊक आहे. केजारीवालांच्या आकंठ प्रेमात बुडालेले कदाचित समर्थन करतील. पण आणीबाणीनंतर अशी धमकी आजपर्यंत कोणत्याच राजकीय नेत्यांनी दिली नव्हती.

नो आयडॉलॉजी अशी घोषणा घेऊन जन्मलेल्या पक्षाच्या नेत्याची फासिस्ट पाऊल फार लवकर दिसू लागली हे एक बरं झालं. भंपक देशभक्ती आणि फसव्या समाजवादाचा चेहरा पांघरत हिटलरचा उदय झाला होता. नैराश्याच्या पोकळीत फासिस्ट शक्तींचा नेहमीच उदय होत असतो.

काँग्रेस प्रणित युपीए सरकारच्या भ्रष्ट कारभाराने देशात निर्माण केलेल्या नैराश्यातून दोन संकटांना आमंत्रण दिलंय. मोदी आणि केजरीवाल ही दोन संकटांची रूपं आहेत. केजरीवाल मोदीच्या विरोधात वाराणसीत उतरल्यामुळे एका भ्रामक राजकीय लढाईचं चित्र देशात उभं राहिलं आहे. दोघांच्याही मागे कॉर्पोरेट भांडवली शक्ती उघडपणे उभ्या आहेत. मोदींच्या मागे देशी आणि केजारीवाल यांच्या मागे विदेशी, असा फरक आहे. केजरीवाल भारतात तहरिर स्क़्वेअर पूर्ण करू शकत नाही, हे लक्षात आल्यानंतरच अमेरिकेने मोदींसाठी दरवाजे खुले केले. केजरीवाल यांच्या मर्यादा त्यांना उशिरा लक्षात आल्या. अन्यथा रामलीला मैदानावरूनच पंतप्रधान पदाच्या घोडयावर बसविण्याची त्यांच्या उमेदवाराची तयारी झाली होती. अण्णा  हजारे यांना रामलिला मैदानावरच शहीद करण्याचा डाव होता असं स्वामी अग्निवेश म्हणाले तेव्हा, मिडीयाने त्याची फारशी गंभीर दखल घेतली नाही. पण त्यात तथ्य होतं. अण्णा हजारे म्हणूनच केजरीवाल मंडळीपासून दूर गेले.

स्वराज आणि विदेशी पैसा एकत्र चालू शकत नाहीत, ही अण्णांची भूमिका होती. ती योग्यच होती. एकवेळ भारतीय बाजारातील एफडीआयच्या भूमिकेची चर्चा  करता येईल. पण भारतीय राजकारण परदेशी पैशावर चालवणं म्हणजे देशाचं सार्वभौमत्त्व आणि आपली कायदेमंडळे विदेशी भांडवली शक्तींकडे गहाण टाकण्यासारखं  आहे. कोणताही देशभक्त आपलं निर्णय स्वातंत्र्य गहाण ठेवायला मंजूरी देणार नाही. त्यासाठी समाजवादी आणि डावं असण्याची सुद्धा गरज नाही. विदेशी स्त्रोतातून  देशातल्या जवळपास ३३ हजार एनजीओना मदत मिळते. २०११-१२ मधला मदतीचा आकडा होता ११ हजार ५४६ कोटी रु. अमेरिकेचा त्यातला वाटा होता ३ हजार ८३८ कोटी रु. गेल्या ३ वर्षांत या विदेशी देणग्यांमध्ये ११ टक्क्यांनी वाढ का झाली ? हे कुणालाही सहज लक्षात यावं. देशातील समाजवादी आणि डावी चळवळ संपावण्याच काम एनजीओमार्फत करण्यात आलं. काँग्रेसच्या छत्राखाली असलेल्या देशातल्या सत्ताधारी वर्गाच्या ते पथ्यावर होतं. देशातील गरीब आणि उपेक्षितांची राजकीय चळवळ कमजोर करण्याचा त्यामागे उद्देश होता.

कालपर्यंत राजकारणाचे तुच्छतेने पाहणारे हे कार्यकर्ते लोकशाहीच्या प्रक्रियेत येत असतील तर त्याचं स्वागत करायला काही हरकत नाही. हे कार्यकर्ते  व्यक्तिश: कितीही प्रामाणिक असले, तरी विदेशी पैशावर राजकीय हस्तक्षेप ते करू मागत असतील तर भारतीय लोकशाही स्वातंत्र्याला धोका संभवतो. या संस्थांना जिथून पैसा येतो त्या विदेशी फंडिंग एजन्सीचा अजेंडा आणि आर्थिक कार्यक्रम तपासला की हा धोका किती मोठा आहे याचं उत्तर सहज मिळेल.

बहुसंख्य वर्गावर मोदित्व नावाचा फासिस्ट उन्माद स्वार होत आहे. अल्पसंख्य समाजाच नव्हे तर स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायाची आस आणि बुज असलेला मोठा वर्ग भयभीत झाला आहे. प्रधानमंत्री पदाची खुर्ची अजून दीड महिने दूर आहे. पण आताच सर्वेसर्वा  झाल्याच्या गुर्मीत नरेंद्र मोदी त्यांच्याच पक्षातल्या जेष्ठ नेत्यांना हुकूमशाही पद्धतीने तडाखे मारत आहेत. लालकृष्ण अडवाणी, जसवंत सिंग, शुषमा स्वराज, नितिन गडकरी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना आणीबाणीची आठवण यावी अशी स्थिती भारतीय जनता पार्टीत आहे. मोदी पंतप्रधान झालेच तर ते कसं  वागतील याचा अनुभव त्यांच्याच पक्षाचे नेते सध्या घेत आहेत.

महाभारतातल्या भस्मासुरातली उपमा कोणी नरेंद्र मोदींनी दिली. पण नरेंद्र मोदींचा आदर्श औरंगजेबच आहे. तीच महत्वकांक्षा. तोच रस्ता. औरंगजेबाने आपल्या भावांना मारलं. बापाला नाही. नरेंद्र मोदीही औरंगजेब इतकेच दयाळू आहेत. आपल्या पक्षाला सर्वोच नेत्याला जेरबंद केलं की दिल्लीचा दरवाजा आपोआप उघडेल, हा त्यांचा होरा आहे.

मोदींच्या विकास नितीचं या देशातल्या लब्ध प्रतिष्ठीतांमधल्या एका वर्गाला जरुर आकर्षण आहे. मोदी कसे नॉन करप्ट आहेत आणि विकासाचा एक्सप्रेस हायवे फक्त गुजरात मधूनच धावतो अशा कथा रंगवणं काॅर्पोरेट जगताला आणि त्याची बटिक असलेल्या मिडीयाला सोयीचं आहे. पण मोदींचा विकासाचा रस्ता नैसर्गिक संसाधनांच्या विखारी अोरबाडण्यातून, भूमिपुत्रांच्या निर्दय विस्थापनातून, शोषितांच्या शोषणातून आणि रक्तरंजित द्वेषातून बांधला गेला आहे.

मोदींचा अॅटिट्युड ज्यांनी पाहिला असेल, त्यांनी त्यातून झिरपणारा नथुरामी अहंकार जरुर पाहिला असेल. उदारतेची, रामराज्याची झुल त्यांनी किती पांघरु देत, त्यांच्यातलं हिंस्त्र श्वापद दडून राहिलेलं नाही.

गोव्यात त्यांनी काय भाषण केलं ? मोदी म्हणाले, "गोवा मेरे लिए लकी है. इसी गोवा मे मुझे गुजरात चलाने का लायसन मिला."

राज्य म्हणजे काय दुकान आहे ? की कसला ठेका आहे ? पवित्र मातृभूमीचे स्तोत्र गाणाऱ्या संघ पुत्राच्या लेखी मातृ भू म्हणजे दुकान आणि ठेका असेल तर त्याला काय म्हणायचं ?

सार्वभाैम जनतेचं राज्य चालवणं हा ठेका मानणाऱ्या वृत्तीच्या हातात देशाला सोपवणं लोकशाहीसाठी धोकादायक आहे.

जागतिकीकरण आणि उदारीकरणाचा फायदा घेत उच्च मध्यम वर्गाच्या सीमारेषेवर पोचलेला एक मोठा वर्ग आहे. सामाजिक न्याय आणि गरीबांच्या प्रश्नांबद्दल एकेकाळी आवाज उठवणारा मध्यमवर्ग आता या प्रश्नांकडे तुच्छतेने पाहतो आहे. या प्रश्नांचं त्याला ओझं वाटत आहे. आणि म्हणून एकाचवेळी मोदी आणि केजरीवाल यांचं आकर्षण या दोन व्यक्तींचं नसून अध्यक्षीय लोकशाहीचं आहे.

वाराणसीत भले मोदी आणि केजरीवाल एकमेकांच्या विरोधात उभे असोत. दोघांचा अजेंडा एक आहे. दिल्लीत केजरीवालांच्या पार्टीने ज्या पद्धतीने निवडणूक लढवली आणि आता भाजप ज्या पद्धतीने मोदींना प्रमोट करत आहे, या दोन्ही पक्षांना अध्यक्षीय लोकशाहीचा पुरस्कार करायचा आहे. त्यांचा पुढचा अजेंडा समान आहे. काँग्रेसने राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा उमेदवार भले जाहीर केलं नसेल. पण पक्षाचे उमेदवार ठरवण्यासाठी राहुल गांधी यांनी जो 'प्रायमरी' चा प्रयोग काही ठिकाणी सुरु केला आहे. त्यात अध्यक्षीय लोकशाहीचंच आकर्षण आहे.

भारत हे संघराज्य आहे. भारतीय संविधानातली ही संघीय चौकट मोडून अध्यक्षीय लोकशाहीकडे नेण्याचा बाजारपेठी साम्राज्यवाद्यांचा कार्यक्रम आहे. तोच कार्यक्रम मोदी, केजरीवाल आणि राहुल गांधीही राबवत असतील तर संघराज्यापुढचं संकट मोठं आहे. १९३५ पर्यंत अध्यक्षीय लोकशाहीचं आकर्षण असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारताचं संविधान रचताना संसदीय लोकशाहीचा स्वीकार करतात. व्यक्ती पूजा आणि सामाजिक विषमतेने भरलेल्या देशात अध्यक्षीय लोकशाही, हुकूमशाहीत परवर्तीत होण्याचा धोका आहे असा इशारा त्यांनी दिला होता. बहुविविधता असलेल्या या खंडप्राय देशाचं भविष्य आणि स्वातंत्र्य एका व्यक्तीच्या मुठीत देण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला होता.

लोकसभा २०१४ ची निवडणूक अध्यक्षीय लोकशाही पद्धतीने लढवण्याचा चंग ज्यांनी बांधला आहे, ते या देशाच्या संविधानाला आव्हान देत आहेत.


आमदार कपिल पाटील 
अध्यक्ष, लोक भारती 
kapilhpatil@gmail.com

Tuesday, 26 November 2013

डॉ. बापूसाहेब रेगे यांना आदरांजली.

श्रद्धांजली
केवळ गुणवत्ता यादीतच नाही तर मूल्यशिक्षणात, आधुनिक ज्ञान विज्ञानात आणि जगाच्या स्पर्धेत बालमोहन या नावाने डॉ. बापूसाहेब रेगे शिक्षणाच्या क्षेत्रात एक अमिट मुद्रा सोडून गेले आहेत. The best School throughout India and Europe असा अभिप्राय अमेरिकेतून आलेल्या 25 शिक्षण तज्ज्ञांनी बालमोहनला भेट दिल्यानंतर दिला  होता. दादासाहेब रेगे यांनी लावलेलं हे रोपटं डॉ. बापूसाहेबांनी नावारुपाला आणलं. शाळेच्या दारातच महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक यांचे केवळ त्यांनी पुतळे बसविले असं नाही तर देशभक्तीचा आणि सामाजिक सलोख्याचा संस्कार देणारी ही शाळा आहे.

दादर जसं शिवाजी पार्क , चैत्यभूमी यामुळे ओळखलं जातं तसं ते बालमोहन मुळेही ओळखलं जातं.दादरच्या संस्कृतीचं  बालमोहन हे प्रतिक मानलं जाऊ लागलं ते बापूसाहेब रेगे यांच्या असंख्य शैक्षणिक प्रयोगांमुळे सरकारने सुरु करण्याआधीच त्यांनी पहिलीपासून इंग्रजी, कॉम्पुटर  शिक्षण, राष्ट्रीय एकता सफरी, एक सुर एक ताल असे प्रयोग आपल्या शाळेत सुरु केले . मार्च 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटात दादर  हादरलं होतं. त्यावेळी त्यांनी आपल्या शाळेतल्या सर्व मुलांना एकाचवेळी धीरोदात्तपणे माणसुकीच्या  शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरु... हे समुह गान गायला लावलं होतं.

गेल्या  2 फेब्रुवारीला शिक्षण हक्क वृत्र्ती समितीच्या वतीने मुंबईतल्या सर्व शिक्षकांनी आणि शाळा चालकांनी एकत्र येऊन प्रचंड मोर्चा काढला होता. त्या मोर्च्याची सुरवात बाल मोहनच्या पायरीवरून  झाली होती. त्या मोर्च्याची सुरवात करुन द्यायला  83 वर्षाचे डॉ. बापूसाहेब रेगे प्रकृती ठिक नसतानाही खाली उतरले होते. त्यांना स्वतःला मोर्च्यात चालायचं होतं. पण ते शक्य नव्हतं. त्यांच्यावतीने त्यांचे चिंरंजीव गिरीष रेगे मोर्च्यात शेवटपर्यंत अमोल ढमढेरे, प.म.राऊत यांच्या सोबत चालत आले.

बापूसाहेब रेगेंच्या आठवणी दादार आणि शिवाजी पार्कच्या परिसरात कायम दरवळत राहतील.

आमदार कपिल पाटील
अध्यक्ष, लोक भारती

Sunday, 17 November 2013

सचिन खेळत होता, तेव्हा अख्खी इंडिया खेळत होती.

अखेर सचिनने मैदानाचा निरोप घेतला. डोळ्यात त्याच्या तेव्हा अश्रू होते. स्टेडियम स्तब्ध होतं. अख्ख्या इंडियाच्या डोळ्यात तेव्हा पाणी होतं. कारण सचिन खेळतो तेव्हा इंडिया खेळत असते. सचिन आऊट होतो तेव्हा इंडिया आऊट होतो. प्रत्येक भारतवासीयाचं त्याच्यावर प्रेम आहे. म्हणूनच त्याचा हा निरोप चटका लावतो. जणूकाही आपणच आता खेळणार नाही आहोत. खेळायचा आनंद आता घेता येणार नाही. आनंद इतक्या लवकर थोडाच रिटायर करायचा असतो. प्रत्येक भारतीयाचं सचिनशी असलेलं हे विलक्षण नातं जोडलं होतं ते सचिनेच. परवा अभिषेक बच्चनची प्रतिक्रिया खूपच बोलकी होती. सचिनने 10 रन्स केल्या, 50 केल्या काय किंवा सेंच्यूरी ठोकली काय, ती प्रत्येक रन जणू आपण स्वतः करतो आहोत असं प्रत्येक भारतीयाला वाटतं.

असं नातं आजपर्यंत कुठल्याही खेळाडूचं भारतात निर्माण झालं नव्हतं. प्रत्येकजण त्यात स्वतःला पाहतो. सचिन म्हणून खरा भारतरत्न आहे.

खेळाडू म्हणून तो किती महान आहे, हे सांगण्याची आपली पात्रता नाही. पण तो माणूस म्हणूनही खूप मोठा आहे. 200 अनाथ मुलांचा तो सांभाळ करतो, म्हणून हे सांगत नाही. त्यांच्या सासूबाई अनाबेल मेहता यांच्या संस्थेत आणि तसंच अनेकांना तो मत करतो, म्हणून तो केवळ मोठा नाही. क्रिकेटचं  पिच तयार करणार्‍या आणि मैदानाचं रखरखाव ठेवणार्‍या माळ्यांची तो आठवणीने विचारपूस करतो. आऊट होणार्‍या सेहवागवर कोच जॉन राईटने हात उगारला म्हणून सौरभने माफी मागायला सांगितली. तेव्हा वडिलांच्या जागी असणार्‍या राईट सरांकडून माफी मागायला लावणं बरं नाही, हे सचिनच सांगू शकला. शेवटचा सामना बघायला आपल्या आईबरोबर आपल्या गुरुलाही आणण्याची व्यवस्था त्याने केली. पण आचरेकर सरांच्या आजारपणात त्यांची सगळी काळजी आणि व्यवस्था एखाद्या मुलाप्रमाणे सचिननेच केली. अडचणीतल्या अनेक सहकारीक्रिकेटपटूंना व मित्रांना सचिनने मतीचा हात अनेकादा दिला. तोही कोणतीही अपेक्षा न करता.

तो कोणत्याही वादात जात नाही. कुणाशी भांडत नाही. अगी लताबाईंसारखी प्रतिक्रिया देऊन अडचणीतही येत नाही. मी मराठी आहे याचा अभिमान तो बाळगतो. पण सर्व प्रथम भारतीय आहे, असं छातीठोक सांगायलाही तो कचरत नाही. त्याचा एक वेडा चाहता  आहे, सुधीरकुमार चौधरी मुझफ्फर नगर, बिहारचा. त्याच्याही आनंदाला तो आवर्जून साथ देतो. सचिन रमेश तेंडुलकर या माणसाचं हे असं नातं अख्ख्या देशाशी जोडलेलं आहे. पूर्वी गांधी, नेहरु आणि मौलाना आझाद यांच्या सारखे नेते देश जोडण्याचं काम करत. आताचे राजकारणी देश तोडण्याचं काम करतात. आता देश जोडण्याचं काम फक्त एपीजे अब्दुल कलाम यांच्यासारखे शास्त्रज्ञ आणि सचिन तेंडुलकर सारखे महान खेळाडूच करतात. 

भारत रत्न एकाचवेळी सचिन आणि सी. एन. आर. राव यांना जाहीर व्हावा, याचा म्हणूनच अधिक आनंद आहे. 

आमदार कपिल पाटील 
अध्यक्ष, लोक भारती 
kapilhpatil@gmail.com



Wednesday, 2 October 2013

डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून का झाला? आणि खूनी अजून का सापडत नाहीत?





देव, धर्म आणि श्रद्धा यांच्या विरोधात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अवाक्षर सुद्धा कधी काढलं नाही. केवळ प्रबोधनाच्या माध्यमातून अंधश्रद्धेचा अंधार दूर करण्याचं काम हा महान सारस्वत करत होता. तरीही त्यांचा खून का झाला? दीड महिना उलटून गेला अजून खूनीही सापडत नाहीत.

डॉ. दाभोलकर हे थेट साने गुरूजी परंपरेतले. सौम्य प्रवृत्तीचे. तरीही सनातन्यांना ते सहन झालं नाही. गणेशोत्सवाला विधायक वळण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. शेकडो गावात त्यांनी एक गाव एक गणपतीचा उपक्रम करायला लावून मंडळामंडळातली व गटागटातली भांडणे मिटवली. गणपती विसर्जन प्रूषणमुक्त व्हावं, नैसर्गिक रंगाचा वापर व्हावा यासाठीसुद्धा ते मोहिम चालवत होते. हे  दाभोलकर करू शकत होते कारण श्रद्धांनाही विधायक वळण देता येतं यावर त्यांचा विश्वास होता. सत्य, शिव, सुंराची प्रार्थना म्हणणार्‍या साने गुरुजी परिवारातले ते होते.

ज्या अंधश्रद्धा निर्मूलन बिलाला सनातनीच नव्हे तर राज्यातल्या विरोधी पक्षांनीही जोरदार  विरोध केला, त्या विधेयकात 'श्रद्धा' हा शब्दच नाही. इतकचं कशाला 'अंधश्रद्धा' हा शब्दही त्यात नाही. धर्माचा, कोणत्याच धर्माचा तर मागमूस सुद्धा नाही. तरीही ओरड का होते आहे?

अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा करावा हा मूळ ठराव तर शिवसेना-भाजप युतीचे सरकार होतं त्या काळातला. 18 वर्षांत कायद्याचा मूळ मसुदा पातळ झाला आणि विरोधाची धार मात्र तीव्र. छोट्या निरागस मुलांना पळवून त्यांचा नरबळी द्यायचा. त्यासाठी उद्दुक्त करायचं. मुलींचं आणि स्त्रियांचं लैगिंक शोषण करायचं. म्हणजे फसवून, स्वतः देवपुरूष असल्याचे सांगत थेट बलात्कार करायचा. तंत्र मंत्राच्या नावाखाली अत्यंत विकृत अघोरी प्रथा लादायच्या. हा ज्यांचा धंदा बनला होता, ते कायद्यातील त्रुटींचा फायदा घेत नामानिराळे होत राहिले. मानवत खून खटल्यात मारणारे फासावर गेले, मारायला लावणारे कमी शिक्षेने निसटले. हे सारं रोखण्यासाठी कायदा का नको? दाभोलकर फक्त तर एवढंच मागत होते.

तरीही दाभोलकरांचा जीव घेण्यापर्यंत सनातन्यांची मजल गेली.

साने गुरूजींच्या वृत्तीचा आणि प्रवृत्तीचा माणूस अधिक प्रभावी असतो. श्रद्धावानांच्या हृयाला हात घालू शकतो. म्हणून सनातन्यांना तो डेंजरस वाटतो. देव, धर्म आणि श्रद्धा हा ज्यांच्यासाठी धंदा असतो, शोषणाचं साधन असतं, आणि त्याहीपेक्षा राजकारणाचं हत्यार असतं त्यांना दाभोलकर अधिक धोकादायक वाटतात.

तुकाराम त्यांना अधिक धोकादायक वाटत होते. ज्ञानेश्वरांचा म्हणून तर छळ झाला. जीवंतपणी विवेकानंद  त्यांना अडचणीचे होते. महात्मा गांधींना मारणार्‍या नथुरामाची परंपरा नवी नाही. धर्माचं दुकान चालवणार्‍यांना खरा धार्मिक अडचणीचा असतो. इहवादी असूनही दाभोलकरांची वाट खर्‍या धार्मिकासारखी होती.

बहुसंख्य हिन्दू समाजाला हे चांगलंच उमजून आहे. तो श्रद्धावान आहे. धर्मपरायण आहे आणि म्हणूनच तो सनातन्यांपासून कायम दूर राहिला आहे. ज्ञानेश्वर, तुकारामांना छळणार्‍यांची वृत्ती त्यांना माहित आहे. त्यांची नावंही लक्षात राहू नयेत, इतका त्यांना त्याचा तिटकारा आहे. ज्ञानोबा माऊली एकनाथ नामदेव तुकाराम असा गजर मात्र वारकर्‍यांच्या हृयात युगानुयुगे सुरु आहे. उदार हिंदू बधत नाही. राजकीय हिंदुत्वाला साथ देत नाही. म्हणून हिंदुंच्या मनात राडा करण्याचा सनातन्यांचा डाव गेल्या दोन अडीच शकांपासून सुरु आहे. बाबरी मशिदिच्या विध्वंसापासून त्याची सुरवात झाली.

नथुराम समर्थनाचं नाटक याच काळातलं आहे, जे अजून सुरु आहे. हे नाटक यासाठी सुरु आहे, की माणसाला मारण्याचं समर्थन करता यावं. खुद्द महात्मा गांधींना मारण्याचं समर्थन अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली रंगमंचावर गेली अनेक वर्षे होत आहे. केवळ नाटकातूनच नाही अनेक माध्यमातून द्वेषाची होळी पेटवत त्यात उदारता आणि बंधुभावाच्या समिधा टाकल्या जात आहेत. त्यामुळे दाभोलकरांचाही खून पचवता येईल हा त्यामागचा त्यांचा कयास होता.

अंथरुणावर पडून मरण्यापेक्षा, दाभोलकरांना गोळ्या लागून मृत्यू आला, ही ईश्वराची कृपाच म्हणायची, असं जयंत आठवले उघडपणे म्हणतात आणि हिंदूंच्या विरोधात विधेयक कशाला अशी ओरड त्यांचं छूपे समर्थन करणारे उजवे पक्ष करतात. वटहुकुम निघाल्यानंतर राज्यात दोन ठिकाणी त्याची अंमलबजावणी करत जादुटोणा करणार्‍या बंगाली बाबांना पोलिसांनी अटक केली, ते हिंदू नाहीत. मुस्लिम धर्मीयांच्या विरोधात असा कायदा करा म्हणणार्‍यांना ही चपराक ठरावी. हे बंगाली बाबा मुस्लिम आहेत. इस्लाम धर्मात चमत्कार आणि जादूटोण्याला मान्यता नाही. माणसाला चमत्कार करता येत नाही आणि मीही त्यामुळे चमत्कार करु शकत नाही, असं खुद्द मोहम्मद पैगंबर (स.अ.) यांनी त्यांच्याकडून चमत्काराची अपेक्षा करणार्‍यांना सुनावलं होतं. तरीही बंगाली बाबा जादूटोण्याच्या नावावर लुटालुट करतात, हे काही लपून नाही. कायद्याला धर्म नसतो. पण खोट्या प्रचाराचा धुरळा लोकांच्या डोळ्यात उडवल्याशिवाय खून करता येत नाही. महात्माजींचा खून 55 कोटींसाठी केल्याचा असाच तद्दन खोटा आणि बेशरम प्रचार नथुरामीवादी आजही करतात. विधेयक कोणत्याच धर्माच्या विरोधात नसताना ते हिंदू विरोधी आहे, असा खोटा प्रचार अजूनही सुरु आहे, तो दाभोलकरांचा खून करणार्‍या मारेकर्‍यांच्या समर्थनासाठीच.

तालिबानी असोत किंवा सनातनी दहशतवाद हा दहशतवाद असतो. आणि त्यांची पहिली शिकार ते ज्या धर्मातले असतात त्या धर्मातली माणसंच असतात. सीमेपलिकडच्या दहशतवा़द्द्यानी कश्मिरमध्ये आतंक सुरु केल्यानंतर त्यात जान गेलेले बहुतेक मुस्लिमच होते. शेकडोनी नाही हजारोनी. पाकिस्तानच्या सीमाप्रांतात तालीबान्यांनी गोळ्या घातल्या त्या मलाला युसुफझाईच्या डोक्यात. तीने शाळेत जाऊ नये म्हणून.  महात्माजींना मारणारा नथुराम होता. दाभोलकरांच्या डोक्यात गोळ्या घालणारे नथुरामीच आहेत.

नथुरामी प्रवृत्ती केवळ गोळ्या घालण्याचं समर्थनच करत नाही, आसारामच्या बाजूनेही उभी असते. नातवंडांपेक्षा लहान मुलींवर अतिप्रसंग करणार्‍या साधुंमधल्या हैवानाना लपवलं जातं, ते परधर्मीयांच्या द्वेषाआड.

नथुरामी ते आसारामी हे आव्हान परतवून लावायचं कसं?

हा प्रश्न केवळ अंधश्रद्धा निर्मुलनाचा नाही. ढोंगी बाबांच्या अटकावाचा नाही. ज्ञानेश्वर, कबीरांपासून ते तुकारामांपर्यंत सर्वच संतांनी या ढोंगी बाबांच्या विरोधात 'जळो त्यांचे तोंड' अशी जबरस्त आघाडी उघडलेली आहे. 'नवसे कन्या पुत्र होती, तरी का कारणे पती' असा सवाल संत तुकारामांनी कधीच विचारुन ठेवला आहे. शोषणावर उभी राहिलेली ही व्यवस्था उद्धवस्त करावीच लागेल. प्रबोधनाची यात्रा अखंड सुरु ठेवावी लागेल. पण त्यातून नथुरामी ते आसारामी हे आव्हान संपुष्टात येणार नाही. हे आव्हान धार्मिक नाही, राजकीय आहे. त्याला राजकीयच उत्तर द्यावं लागेल. 

नथुरामी आणि आसारामी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणून आसारामला वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरु आहेत. आसारामसाठी त्यांनी राम जेठमलानी सारखा नामांकित वकील उभा केला आहे. जेठमलानी काय म्हणाले? त्यांनी दोष त्या निरागस मुलीवरच लावला. तिला म्हणे आजार आहे. Girl has disease which draws her to men. म्हणजे त्या मुलीवर जो अतिप्रसंग झाला त्यात आसारामचा दोष नाही मुलीचाच दोष आहे. इतकं निर्लज्ज विधान राम जेठमलानी कसं करू शकतात? पंतप्रधानाच्या उमेदवारीसाठी भांडणारे भाजपाचे नेते जेठमलानी यांच्या वाढदिवसाला एकत्र येतात. त्यांचा केक कापतात. आणि दुसऱ्या दिवशी जेठमलानी आसरामाचं वकीलपत्र घेतात. याचा अर्थ काय? 

राज्यातले आणि दिल्लीतीले सत्ताधारी (कॉंग्रेस - राष्ट्रवादीवाले)  स्वतःला सेक्युलर म्हणवत असले तरी नथुरामी ते आसारामी या पिलावळीला त्यांनीही जागोजागी सांभाळले आहे. सत्तेला धोका येईल, तेव्हाच नथुरामी शक्तींकडे ते बोट दाखवतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांनाही फासिस्ट नथुरामी शक्तींच्या अटकावात रस नाही. अन्यथा हेमंत करकरे यांनी सुरु केलेली मोहिम या सत्ताधार्‍यांनी थांबवली नसती. महिना उलटल्यानंतरही खूनी सापडत नाहीत याचं खरं कारण हे आहे.

दाभोलकरांच्या हत्येमुळे राज्यातल्या सगळ्याच विवेकशील, संवेनशील नागरिकांच्या मनात उठाव आहे. नथुरामी फासिस्ट शक्तींच्या विरोधात जे जे डावे पुरोगामी आहेत, फुले, शाहू, आंबेडकरवादी आहेत, गांधीवादी आहेत, उदार वारकरी अन सुफी आहेत. हे सर्वच एकत्र येत आहेत. गांधी जयंतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्रभर निर्धार होतो आहे. त्यातून पर्यायी राजकारण उभे राहिले तरच  फासिस्ट शक्ती आणि मतलबी सत्ताधारी यांना उत्तर मिळेल. 


आमदार कपिल पाटील
अध्यक्ष, लोक भारती
kapilhpatil@gmail.com