Tuesday 5 August 2014

बात्रायण आणि दवेंचा हुकूमशाह




नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री तेव्हाही त्यांची हिंमत झाली नाही, ते त्यांच्या उत्तराधिकारी आनंदीबेन पटेल करु शकतात काय ?

आनंदीबेन करु शकतात. कारण नरेंद्र मोदी आता देशाचे सर्वेसर्वा झाले आहेत.

गुजरातच्या 42 हजार सरकारी शाळांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिक्षण भारतीचे राष्ट्रीय कार्यवाह दीनानाथ बात्रा यांनी तयार केलेली पुरवणी अभ्यासाची पुस्तकं मोफत वाटली जाणार आहेत. शिक्षणनु भारतीयरण या नावाखाली आधुनिकीकरणाचा कडेलोट करण्याचा विडा संघ परिवारातल्या या मंडळीनी उचलला आहे. दीनानाथ बात्रांच्या पुस्तकांमधल्या आचरट कथांचा वृत्तांत इंडियन एक्सप्रेसच्या रितू शर्मा यांनी दिला आहे. लोकसत्तेने तो अनुवादीन करुन प्रकाशित केला त्याबद्दल त्या दोन्ही वर्तमानपकत्रांचे आभार मानले पाहिजेत.

प्रेरणादीप भाग - 1 या पुस्तकातल्या पान 10 वरची ही कथा बघा,
“ स्वामींचे बूट - एक दिवस स्वामी विवेकानंद व्याख्यान देण्यासाठी गेले होते. समोर बसलेल्या जनसमुदायाला उद्देशून ते म्हणाले, की आपण नेहमी भारतीय वस्त्रे परिधान केली पाहिजेत...त्या वेळी स्वामी विवेकानंद यांच्या अंगावर भगवी वस्त्रे होती आणि पायात परदेशी बूट होते. ब्रिटनहून आलेल्या एका महिलेच्या ती गोष्ट लक्षात आली. ती म्हणाली, स्वामीजी तुम्ही इतरांना स्वदेशी कपडे घाला, असा आग्रह धरीत आहात, परंतु तुमच्या पायात तर परदेशी बूट आहेत ! स्वांमीनी ते शांतपणे एेकून घेतले आणि हसून म्हणाले, मला तेच तर सांगायचेय की, आमच्या लेखी परदेशी लोकांसाठीची जागा पायातच आहे. यावर ती महिला निरुत्तर झाली.”

जागतिक धर्म परिषदेत Sisters and Brothers of America, अशी हाक घालणारे विवेकानंद यांच्या तोंडी अशी कथा घालणं हा केवळ विपर्यास नाही. विकृती आहे. हिंदू धर्मातल्या अनिष्ट प्रथांवर आणि विषमतेवर घणाघाती प्रहार करणारे आधुनिकतेची कास धरा असे सांगणारे, विश्व बंधूतेचा नारा देणारे स्वामी विवेकानंद यांच्या नावावर इतकी तद्दन कथा खपवण्याचं धाडस बात्रा करतात तेव्हा या पुरवणी पुस्तकांमागचा त्यांचा हेतू अगदी स्पष्ट होतो.

देशाचे दुसरे राष्ट्रपती डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नावावर खपवलेली कथा तर संतापजनक आहे. “ देव भाकरी करत होता. भाकरी कच्ची राहीली तेव्हा ब्रिटीश जन्माला आले. करपून काळी पडली तेव्हा निग्रो जन्माला आले. अगदी योग्य भाकरी भाजली तेव्हा भारतीय जन्माला आले.”

केवळ मूर्ख या शब्दात बात्राकरणाची संभावना करुन चालणार नाही. हा एक जाणून बुजून ठरवून केलेला प्रयास आहे. एक सोची समझी चाल आहे. प्रेरणा आणि संस्काराच्या नावाखाली मध्ययुगीन काळातील मूल्यांचं पुनर्जीवन करण्याचा तो प्रयत्न आहे. जाती, वर्ण वर्चस्वाचं समर्थन आहे. रंगभेदाचं समर्थन आहे. समताधिष्ठीत मानवी मूल्यांना सुरुंग लावण्याचा प्रयत्न आहे.

बात्रांच्या पुढे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.आर.दवे गले आहेत. मी हुकूमशाह असतो तर गीता सक्तीची केली असती, अशी मुक्ताफळं त्यांनी उधळली. गीतेच्या अभ्यासाला कोणीच विरोध करणार नाही. गीतेवर टीका लिहणाऱया संत ज्ञानेश्वरांनी पसायदान मागितलं. विवेकानंद आणि गांधींनी आपल्या चळवळीसाठी आधार शोधला. पण या तिघांचाही विरोधात द्वेष आणि भेद यांचं तत्वज्ञान ठासून भरलेल्या बात्रायणाची भाषा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती करत असतील तर ती चिंतेची बाब आहे. दवे यांनी भारतीय संविधानाची शपथ घेतलेली आहे. न्यायमूर्ती म्हणून ते फक्त भारतीय संविधानाला बांधलेले आहेत. लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीला हुकूमशाह बनण्याची आणि धर्मग्रंथांच्या सक्तीची भाषा करता येणार नाही. न्यायमूर्ती म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा आणि मग खुशाल ही मागणी करावी.

बात्रायणानंतर दवे हुकूमशाहीची भाषा करतात. येणाऱया संकटाची चाहुलच या दोघांनी दिली आहे.


आमदार कपिल पाटील
अध्यक्ष, लोक भारती
kapilhpatil@gmail.com
www.facebook.com/kapilpatil.mlc




No comments:

Post a Comment