Tuesday 12 August 2014

एकनाथ ठाकूरांना घेऊन जाईपर्यंत मृत्यूचाही दम निघाला होता.




80 टक्के नोकऱया मराठी माणसाला हा नारा देत शिवसेनेची स्थानीय लोकाधिकार चळवळ उभी राहीली त्याच काळात एकनाथ ठाकूरांचं नॅशनल स्कूल आॅफ बॅंकिंगही उभं राहीलं. स्थानिय लोकाधिकार चळवळीतून मराठी माणसाला नोकऱया किती लागल्या? हा वादाचा प्रश्न आहे. पण एकनाथ ठाकूरांनी 80 हजार मराठी तरुणांना नोकऱया मिळवून दिल्या. किमान त्या संधीचा दरवाजा त्यांच्या नॅशनल स्कूल आॅफ बॅंकिंग मधून उघडला गेला.

एकनाथ ठाकूर बॅंकिंग क्षेत्रातला फार मोठा माणूस. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचं हे काम लक्षात घेऊन पुढे त्यांना खासदार केलं. पण एकनाथ ठाकूर काही शिवसैनिक नव्हते. ते नाथ पै आणि मधु दंडतेंचे निष्ठावान कार्यकर्ते होते. दंडवतेंनी त्यांना राजकीय वारस केलं असतं तर कोकणातली समाजवादी चळवळ टिकून राहिली असती. जाॅर्ज फर्नांडिस यांनी मात्र एकनाथ ठाकूरांचा गुण अोळखला होता. स्टेट बॅंक आॅफ इंडियाचा आणीबाणीच्या विरोधात राजीनामा देऊन बाहेर पडलेल्या ठाकूरांच्या हातात त्यांनी मुंबईची लेबर बॅंक सोपवली. आणीबाणीत सगळे समाजवादी नेते तुरुंगात असताना लेबर बॅंकेचं रुपांतर एकनाथ ठाकूरांनी न्यू इंडिया को आॅपरेटिव्ह बॅंकेत केलं. बॅंक नावारुपाला आणली. अपना बाजारच्या नावारुपात जसा गजानन खातूंचा वाटा आहे. तसा लेबर ते न्यू इंडिया बॅंक या प्रगतीत एकनाथ ठाकूरांचाही वाटा होता. त्याची दखल फारशी कुणी घेतलेली दिसत नाही.

सुरेश प्रभूंकडून सारस्वत बॅंक ताब्यात घेतल्यानंतर एखाद्या कार्पोरेट बॅंके सारखं वैभव त्यांनी प्राप्त करुन दिलं. ते खरे सारस्वत. नुसते जातीने नाही. साहित्य, कला संस्कृतीच्या अर्थाने एकनाथ ठाकूर खरे सारस्वत. ज्ञानाच्या भांडवलावर उद्योग व्यवसायाचंही भांडवल उभं करता येतं, हे ठाकूरांनी दाखवून दिलं.

बाबा आमटेंचे ते खास भक्त. आनंदवनाच्या मदतीत त्यांचा हात नेहमी असे. बाबांनी भारत जोडो यात्रा सुरू केली, तेव्हा मुंबईची जबाबदारी एकनाथ ठाकूरांकडे होती. यदुनाथ थत्तेंनी मला त्यांच्याकडे पाठवलं. माझ्याकडे जबाबदारी होती काॅलेजच्या तरुणांना या यात्रेत उतरवायचं. आमच्या डहाणूकर काॅलेजचे म.द.लिमये प्रकुलगुरु झाले होते. मी त्यांच्याकडे ठाकूरांना घेऊन गेलो आणि मग अक्षरशः हजारो काॅलेजचे तरुण बाबांच्या सावगताला रस्त्यावर उतरले. त्यासाठी जी यंत्रणा मला लागायची ती सगळी त्यांनी मोठ्या उत्साहाने पुरवली होती.

तरुण वयात झालेल्या कर्करोगावर त्यांनी कितीदा मात केली हे त्यांचं त्यांनाच ठावूक. अगदी अखेरच्या क्षणापर्यंत म्हणजे आपल्या अंतिम यात्रेची व्यवस्था स्वतःच लावण्यापर्यंत त्यांचा उत्साह कायम होता. त्यांच्या उत्साहाचं कोणत्या शब्दात वर्णन करायचं. त्यांना घेऊन जाईपर्यंत मृत्यूचाही दम निघाला होता.

त्यांना विनम्र श्रद्धांजली!!!

आमदार कपिल पाटील
अध्यक्ष, लोक भारती

kapilhpatil@gmail.com

2 comments: