Saturday 7 October 2017

अन्यथा मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांच्या दारी दिवाळीत काळा आकाश कंदील लावणार - कपिल पाटील


दिनांक : ०७ ऑक्टोबर २०१७

प्रति,
मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री, महाराष्ट्र

मा. ना. श्री. विनोद तावडे
शालेय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र

महोदय,
या दिवाळीच्या आधी जर माझ्या रात्रशाळांमधील शिक्षकांना परत घेणार नसाल, मुंबईच्या शिक्षकांचे पगार पूर्ववत करणार नसाल, त्यांना तुम्ही मुंबई बँकेत ढकललं आहे. तर मग आमच्या घरात अंधार ठेवून तुम्हाला दिवाळी नाही साजरी करता येणार.  माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, कृपा करून हे दोन्ही निर्णय मागे घ्या. रात्रशाळांतील शिक्षकांच्या पोटावर पाय ठेवण्याचा आणि मुंबईतील शिक्षकांचे पगार मुंबई बँकेत ढकलण्याचा. तुम्ही हे करणार नसाल, आणि या दिवाळीत तुम्ही आमच्या शिक्षकांना अंधारात लोटणार असाल, तर या दिवाळीच्या पहिल्या दिवशी मी मा. मुख्यमंत्री महोदय, मा. शिक्षण मंत्री महोदय मी तुमच्या दारात येईन आणि तुमच्या दारात काळा आकाश कंदील लावीन. आम्हाला शिक्षकांना अंधारात लोटून तुम्हाला दिवाळी साजरी नाही करता येणार. काय व्हायचे ते होईल. तुम्हाला मला अटक करायची, अटक करा. जो त्रास द्यायचा तो त्रास द्या. पण काळा आकाश कंदील तुमच्या दारात मी लावल्याशिवाय थांबणार नाही. मला हे नाही करायचंय. तुम्ही दोन्ही निर्णय मागे घ्या. मी तुमचं अभिनंदन करीन. 

गेली सहा महिने माझे मुंबईतले शिक्षक एका कठीण परिस्थितीचा सामना करत आहेत. सरकारने अत्यंत निर्ममपणे, निर्दयपणे रात्रशाळांवरती कुऱ्हाड चालवली आहे. त्याविरोधात आम्ही लढतो आहोत. गेले सहा महिने शिक्षकांच्या घरामध्ये रात्रशाळेचा पगार येत नाही. रात्रशाळा ओस पडल्या आहेत. मुलांच्या शिक्षणाची दुर्दशा झालेली आहे. पण सरकार ढुंकूनही पहायला तयार नाही. रात्रशाळा हा तर माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. रात्रशाळा माझा जीव की प्राण आहे, इतका तो माझ्या सार्वजनिक जीवनातील महत्वाचा विषय आहे. रात्रशाळेतून माझ्या  विद्यार्थी चळवळीला सुरुवात झाली. आज त्या रात्रशाळा पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संकटात सापडल्या आहेत. आम्ही हायकोर्टापर्यंत गेलो. हायकोर्टाने आमच्या विरोधात निकाल दिल्याचा जो समज आहे तो तितकासा खरा नाही. हायकोर्टाने काय म्हटले आहे आहे? मा. हायकोर्टाचं म्हणणं एवढंच आहे, शासनाला त्यांचं धोरण ठरवण्याचा अधिकार आहे आणि त्या धोरणानुसार त्यांनी जो काही जीआर काढलाय तो वैध आहे. प्रश्न असा आहे की सरकारचा जीआर हा Prospective (आजपासून) लागतो की Retrospective (आधीपासून म्हणजे पूर्वलक्षीप्रभावाने) लागतो. जीआर हा ज्या दिवशी येतो त्या दिवसापासून लागू होतो. आधीपासून लागू होत नाही. दहा वर्षा पूर्वीपासून हा जीआर लागू झाला, पाच महिन्यांपासून हा जीआर लागू झाला, असं नाही होत. मग रात्रशाळेतले शिक्षक जे रात्रशाळेमध्ये कार्यरत आहेत. त्यांना काढून टाकण्याचं काहीच कारण नव्हतं. पण सूड बुद्धीने सरकारने ठरवून, शिक्षण विभागाने ठरवून अत्यंत बेदरकारपणे, निर्ममपणे, निर्दयपणे कारवाई केली. रात्रशाळेतील सगळ्या शिक्षकांना त्यांनी बाहेर काढले आणि सांगितले की, दिवसाचे सरप्लस शिक्षक आहेत त्यांना आम्ही येथे आम्ही काम देणार आहोत ते कामाविना आहेत. खरं तर माझ्या मते दिवसाच्या शाळांमध्ये कोणीही सरप्लस नाही. जर शासनाने मागच्या वर्षीचा २८ ऑगस्टचा जीआर मागे घेतला, बदललेले संच मान्यतेचे निकष मागे घेतले, तर कुणीही सरप्लस होणार नाही. आता सरकारने तो निर्णय घेतला त्यातून सरप्लस झाले. सरप्लस झालेले शिक्षक तुम्ही रात्रशाळेत पाठवत आहात. त्यात बहुसंख्य महिला आहेत, त्या महिलांची नक्की अडचण होते. कारण रात्रशाळा रात्री चालतात. ७.३० ला मुलं येतात, १०.३० पर्यंत शाळा सुटते आणि मग १० ते १०.३० ला कधी ट्रेन पकडणार. तिथून मग रात्री ११.३० ते १२.०० पर्यंत घरी पोहोचणार. काय त्यांची अवस्था होत असेल. त्या सरप्लस शिक्षकांची विशेषतः महिला शिक्षकांची वाईट स्थिती आहे. पण त्याहून अधिक वाईट स्थिती रात्रशाळेतल्या माझ्या शिक्षकांची आहे. माझे रात्र शाळांतील शिक्षक एकटे कमावते होते दिवसांच्या शाळांमध्ये. जेव्हा रात्रशाळांमध्ये ५६ रुपये पगार होता, ९० रुपये पगार होता, १९० रुपये पगार होता. त्यावेळेला माझे सर्व शिक्षक लागलेले होते. २५ ते ३० वर्षे सेवा केल्यानंतर आता निवृत्तीच्या जवळ आले असताना त्यांना अत्यंत अपमानास्पद रितीने सरकारने बाहेर काढलेलं आहे. याबद्दल मी मुख्यमंत्र्यांना एकदा नाही गेले वर्षभर भेटतो आहे. आम्ही मोर्चा काढला, निदर्शने केली, आंदोलने केली. मुख्यमंत्री महोदय करतो, करतो म्हणाले पण काहीही करत नाहीत, हे आपल्या समोर आहे. शिक्षणमंत्री काही करत नाहीत. 

आमच्या शिक्षकांवर तुमचा राग का आहे? रात्रशाळांतील कितीतरी मुलं मोठी झालेली आहे. या राज्याला दोन मुख्यमंत्री रात्रशाळेने दिले आहेत. त्या मुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडे येऊन सांगितले की, नका असे करू. तरी तुम्ही ऐकत नाही आहात. मग ऐकण्यासाठी काय केलं पाहिजे हे तुम्ही मला सांगा मुख्यमंत्री महोदय, शिक्षणमंत्री महोदय मी सगळं करायला तयार आहे. पण यापुढे अंत पाहू नका, दिवाळी जवळ आली आहे. या दिवाळीच्या आधी जर तुम्ही माझ्या रात्रशाळेतील शिक्षकांना परत घेणार नसाल, मुंबईच्या शिक्षकांचे पगार पूर्ववत करणार नसाल, त्यांना तुम्ही मुंबई बँकेत ढकललं आहे. तर मग आमच्या घरात अंधार ठेवून तुम्हाला दिवाळी नाही साजरी करता येणार. 

गेले सहा महिने माझ्या रात्रशाळांतील शिक्षकांना जे अंधारात लोटले आहे, त्यांना तुम्ही परत घ्या. मुंबईतील त्या शिक्षकांचे पगार नियमित राष्ट्रीयकृत बँकेतून करा. कृपा करून एवढे करा. आणखीन काय सांगणार.. 

अत्यंत क्लेशाने आणि वेदनेने मी हे लिहीत आहे. कृपया दखल घ्यावी
धन्यवाद.     

आपला स्नेहांकित,
कपिल पाटील, वि.प.स.



Tap to Watch - 



10 comments:

  1. ह्या सरकारला ही भाषा कळत नाही साहेब. .यांना त्यांच्याच भाषेत उत्तर हवे..जय शिक्षक भारती.

    ReplyDelete
  2. मा. शिक्षण मंत्री आणि मा. मुख्यमंत्री यांना ही भाषा आणि ही तळमळ समजत नसेल तर यांचं काळीज कसले आहे हे शोधावे लागेल

    ReplyDelete
  3. एकदम अगदी खरी परिस्थिती मांडली आहे.

    ReplyDelete
  4. Sir Ata Je 20% Pagar Ghet Ahet Tyanch Kay Sir Vadhiv Tappa Lagnar Ki Nhi Sir Amchya Laksh Dya Ho Sir

    ReplyDelete
  5. सर्व प्रकारे प्रयत्न करूनही सरकारला जाग येत नाही.

    ReplyDelete
  6. I will participate our movement sir

    ReplyDelete
  7. Shikshna vishyi Government chi evdhi anastha ka tech klt nahi

    ReplyDelete
  8. Shikshna vishyi Government chi evdhi anastha ka tech klt nahi

    ReplyDelete