Friday 4 January 2019

मुंबई क्रिकेटचा बाप गेला


'रमाकांत आचरेकर सरांना द्रोणाचार्य का म्हणतात', हे मला समजत नाही. 

माझ्या या वाक्यावर सचिन तेंडुलकरने डोळे मोठे केले. जन्मदात्या वडिलांइतकंच ज्यांचं स्थान भारतरत्न सचिन तेंडुलकरांच्या जीवनात आहे, त्यांच्याबद्दल असे उद्गार काढणारा हा 'शहाणा' माणूस कोण, अशा काही रागानेच सचिनचे डोळे बोलत होते. 

'द्रोणाचार्यांनी अर्जून आणि एकलव्यामध्ये फरक केला. एकलव्याला शिक्षण नाकारलं. राजघराणं आणि वर्णाश्रमाशी निष्ठा राखली. आचरेकर सरांनी असा भेदभाव कधीच केला नाही. सचिन तेंडुलकर असो की विनोद कांबळी. प्रवीण आमरे असो की नरेश चुरी. लालचंद राजपूत असो की अजित आगरकर. कोण कोणत्या घरातून आलाय हे आचरेकर सरांनी पाहिलं नाही. समोर आलेल्या मुलाने हातात बॅट कशी धरलीय? बॉल कसा फेकतोय? एवढंच ते पाहत होते. त्यांच्यातला खेळाडू हेरत होते आणि भरभरुन त्याला शिकवत होते. म्हणून आचरेकर सरांना द्रोणाचार्य म्हणणं बरोबर नाही. आचरेकर सरांचं स्थान द्रोणाचार्यापेक्षा खूप खूप मोठं आहे.' 

माझ्या या प्रस्तावनेवर सचिनचे मोठे झालेले डोळे हसू लागले. संजीव पाध्येचं आचरेकर सरांवरचं पुस्तक लोकमुद्रा प्रकाशनने प्रकाशित केलं ते सचिनच्या हस्ते. द्वारकानाथ संझगिरी आणि आज दिनांक परिवारातील अनेक लेखक मंडळी हजर होती. शिवाजी पार्कवरचे आचरेकर सरांचे अनेक चाहते आले होते. एमआयजी क्लबमधला तो प्रसंग आजही मला आठवतो आहे. सचिन तेंडुलकर तेव्हा भारतरत्न झालेला नव्हता. भारतीयांच्या गळ्यातला ताईत मात्र तो कधीच झाला होता. आपलं सारं श्रेय तो आचरेकर सरांच्या पारड्यात टाकत होता. 

तेंडुलकर आज भारतरत्न आहेत. जगातील सर्वोत्तम क्रिकेट दिग्गज आहेत. परवा आचरेकर सर गेले तेव्हा तेंडुलकरांना अश्रू आवरता आले नाहीत. ग्लॅमर, किताब, सेलीब्रिटी आणि मोठेपणा हे सारं विसरुन भारतरत्न आपल्या गुरुला खांदा देत होते. विनोद कांबळी आणि प्रवीण आमरे रडत होते. सगळं शिवाजीपार्क आचरेकर सरांच्या मोठ्या झालेल्या शिष्यांच्या अश्रूंनी भिजून गेलं होतं. 


आचरेकर सरांनी किती खेळाडू घडवले त्याला गणती नाही. लहान वयातली मुलं पालक किंवा कुणी क्रिकेटप्रेमी आचरेकर सरांकडे आणून देत. आचरेकर सर त्याच्यातला खेळाडू ओळखत आणि तसा त्याला आकार देत. सचिन तेंडुलकरांच्या शब्दात सांगायचं तर, 'भारतीय क्रिकेट विश्व आचरेकर सरांनी समृद्ध केलं. 

खेळ विश्वातल्या गुरुंची परंपरा मोठी आहे. फोगट भगिनींच्या वडिलांपासून ते सिंधूला घडवणाऱ्या गोपीचंद पर्यंत. महाराष्ट्राच्या मातीत कुस्ती फुलवणारे काका पवारांसारखे वस्तादही खूप आहेत. त्या सर्वांनी आपापल्या शिष्यांवर घेतलेली प्रचंड मेहनत, लगन, त्याग आणि खेळावरची निष्ठा वादातित आहे. पण आचरेकर सर खास आहेत. त्यांनी भारतरत्न घडवला आहे. पण सचिन हेच त्यांचं एकमेव प्रॉडक्ट नाही. द्रोणाचार्यांप्रमाणे त्यांनी भेदभाव केला नाही. प्रतिस्पर्धी संघाला धावांचं दान मिळणार नाही, याचं अचूक प्रशिक्षण त्यांनी झारीतल्या शुक्राचार्यांप्रमाणे दिलं. मैदानावरची सभ्यता आणि विवेक शिकवणारे आचरेकर सर शिवाजीपार्कवरचे आचार्य बृहस्पती होते. क्रिकेटचं परीक्षण द्वारकानाथ संझगिरींच्या उपमांनीच होऊ शकतं. आचरेकर सरांना शुक्राचार्य आणि बृहस्पतींच्या उपमा मी उगाच देत नाहीय. क्रिकेट मला कमी कळतं. पण संझगिरींमुळे आचरेकर सरांसह शिवाजीपार्कवरची माणसं मला कळली. क्रिकेटही थोडं कळलं. शिवाजी पार्कावरच्या माणसांमध्ये आचरेकर सर हा बाप माणूस होता. म्हणून दिग्गजांच्या पापण्या अश्रू थांबवू शकल्या नाहीत. मुंबई क्रिकेटचा बाप गेला, हीच भावना त्यांचे अश्रू बोलत होते. 

- कपिल पाटील

2 comments:

  1. सचिन तेंडुलकराना घडवणारा द्रोणाचार्य आचरेकर सर जाण्यानं कतीदा क्षेत्रातील एक तारा निखळला असून त्यांच्या जाण्यानं मोठं नुकसान झालं आहे

    ReplyDelete