Friday 4 January 2019

खरा धर्माधिकारी


सेवा दलाचा पूर्णवेळ कार्यकर्ता असताना आचार्य दादा धर्माधिकारी यांची व्याख्यानं मी पार्ल्यात आयोजित केली होती. दादांच्या व्याख्यानांचा प्रभाव आजही अमीट आहे. दादा म्हणजे भारतीय संस्कृतीचे भाष्यकार धर्माधिकारी. दादा म्हणजे आधुनिकता, समता आणि न्याय यांनाच धर्म मानणारे धर्माधिकारी. आचार्य दादांचा तो वारसा तितक्याच सशक्तपणे चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी पुढे चालवला. वडिलांचा वारसा असा चालवणं सोपं नसतं. गांधी, विनोबा यांच्यासोबतीने एखाद्या धर्माधिकाऱ्यासारखं ज्यांच्या शब्दाला वजन होतं त्या आचार्य दादा धर्माधिकारी यांची परंपरा पुढे चालवणं, हा रस्ता सोपा नव्हता. 

चंद्रशेखर धर्माधिकारी यांचा संचार सर्व क्षेत्रात होता. न्यायमूर्ती म्हणून मुंबई हायकोर्टात जेव्हा ते बसत होते, तेव्हा सत्तेची त्यांना तमा नव्हती. आणीबाणीचा काळ होता. सगळ्या स्वातंत्र्यावर वरवंटा फिरत होता. पण निकाल देताना रामशास्त्री प्रभूणेंप्रमाणे चंद्रशेखर धर्माधिकारी वागत असत. संविधान, कायदा आणि न्याय यांच्या पलिकडे भय आणि मोहाला ते बळी कधीच पडले नाहीत. न्यायमूर्ती म्हणून पायउतार झाल्यानंतर चळवळी आणि संघटनांमधील कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम त्यांनी अव्याहतपणे पार पाडलं. डहाणूच्या राष्ट्रीय हरित लवादाचं प्रमुख म्हणून काम करताना त्यांनी सरकारला कधी जुमानलं नाही. लोकांच्या बाजूने ते उभे राहिले. पालघर जिल्ह्यातील सगळा डहाणू पट्टा अजूनही गर्द हिरवा आहे, याचं मुख्य श्रेय न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनाच जातं. 

महाराष्ट्रातील असंख्य संस्थांशी त्यांचा संबंध होता. त्या संस्थांना जोपासणं, वाढवणं, कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणं, कामाला दिशा देणं हा जणू त्यांचा छंद होता. त्यांचं वक्तृत्व अमोघ नसे. शांत सुरावटीसारखं त्यांचं भाषण असे. सुभाषितांसारखं ते बोलत असत. किंचितही न अडखळता शब्दांमागून शब्द येत. मुक्ताईच्या मंदिरात एकतारीवरचं भजन मी एकदाच ऐकलं होतं. हरखून गेलो होतो. तो प्रत्यय चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या प्रत्येक भाषणातून येत असे. सर्वोदयी चळवळीतील गांधी-विनोबाजींचा सत्याचा आग्रह, अपरिग्रह, अहिंसा या मूल्यांशी त्यांची अविचल बांधिलकी होती. शब्दांच्या वापरातूनही कधी त्या विचारांशी प्रतारणा त्यांनी केली नाही. त्यांच्यासाठी ती जीवननिष्ठा होती. आंबेडकरी, विद्रोही, समाजवादी, डाव्या चळवळींशीही त्यांचा तितकाच संवाद होता.सामाजिक न्यायाच्या प्रश्नावर म्हणून ते ठामपणे उभे राहत. 


शिक्षक भारतीच्या एका शिबिरासाठी ते आवर्जून आले होते. त्यांच्या भाषणाने शिक्षक मंडळी खूश झाली होती. 


शिक्षक भारतीने दुष्काळग्रस्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मोठा निधी जमा केला होता. मुंबईतील शिक्षकांनी भरभरुन दान दिलं होतं. त्या स्टुडटन्स् रिलीफ फंडचं अध्यक्षपद न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी स्वीकारताना पेंशनमधले १० हजार रुपये त्यांनी चेकने दिले होते. पैशापैशाचा हिशोब त्यांनी स्वतः तपासला. विद्यार्थ्यांना थेट मदत तीही चेकने दिली गेली. त्याचं त्यांना समाधान होतं. कश्मीरमधील काही मुलं पुण्यातील सरहदमध्ये शिकतात. खोऱ्यातील आतंकी कारवाऱ्यांमुळे आई वडिलांकडून पैसे येण्याचं बंद झालं. तेव्हा याच फंडातून मदत दिली गेली. 

फारच थोड्यांना माहित असेल अंधश्रद्धा विरोधी बिलाचा ड्राफ्ट धर्माधिकारी यांनी तयार केलाय. डॉ. नरेंद्र दाभोलकर ज्या विधेयकासाठी आयुष्यभर लढले आणि शहीद झाले ते बिल नीट आकाराला यावं यासाठी सरकारने न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांची मदत घेतली. त्या कमिटीवर न्या. धर्माधिकारी यांच्यासोबत विधान परिषद सदस्य म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली होती. नरबळी आणि जादुटोणा विरोधी विधेयकाचा तो प्रस्ताव धर्माधिकारी यांच्या हातून तयार होतो आहे, हे कळताच काही सनातनी कार्यकर्ते त्यांच्याकडे गेले होते. हा आमच्या धर्मात हस्तक्षेप आहे, असं ते म्हणत होते. त्यावर न्यायमूर्ती धर्माधिकारी त्यांना शांतपणे म्हणाले, 'मी स्वतःच धर्माधिकारी आहे. त्यामुळे धर्मातलं मला जास्त कळतं.' निरुत्तर होऊन सनातनी निघून गेले. अल्पावयीन मुलांकडून होणाऱ्या बलात्कारांसारख्या घटनांमध्ये काय व कशी भूमिका घ्यायची याचं मार्गदर्शनही धर्माधिकारी यांनीच केलं. महिलांवरील अत्याचारांबाबत तीन अहवाल त्यांनी सरकारला दिले. 

धर्माधिकारी मला त्यांच्या परिवारातला मानत. कुणी काही सांगितलं तरी ते ठामपणे माझ्या बाजूने उभे राहत. दादा धर्माधिकारी आणि नंतर चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या सावलीत राहता आलं, म्हणून धर्मातलं सत्य आणि असत्य पारखण्याची ताकद मिळाली. त्यासाठी त्यांच्या प्रती आयुष्यभर कृतज्ञ राहावं लागेल.   

- कपिल पाटील

2 comments:

  1. खरोखरच आचार्य दादासाहेब धर्माधिकारी हे खरेखुरे धर्माधिकारी होते .त्यांच्या जाण्याने परिवर्तनवादी चळवळीचं फार मोठं नुकसान झालं आहे.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली����������
    @नितीनभाऊ झिंजाडे करमाळा

    ReplyDelete