Monday 25 May 2020

दादा कुठे आहेत...?


परवा खासदार गिरीश बापट म्हणाले, 'अजित दादा कुठे आहेत?'

अजित दादांनी त्यांना उत्तर दिलं असेलही. पण बापटांच्या त्या प्रश्नांने मी स्वतः चकीत झालो. 

लॉकडाऊनच्या या सगळ्या काळामध्ये मंत्रालयात मला 10 ते 12 वेळा जावं लागलं. आणि त्यातला असा एकही दिवस गेला नाही की, मंत्रालयात अजित दादा दिसले नाहीत. 

उपमुख्यमंत्री झाल्यापासून दादांची एक ख्याती होती की, भल्या सकाळी 7.30 वाजता ते मंत्रालयात येऊन दाखल होत. अजून त्यांना रितसर बंगला मिळालेला नाही. पण मुंबईतल्या आपल्या फ्लॅटवरून ते सकाळीच मंत्रालयातल्या आपल्या दालनात येऊन बसत आणि कामाला सुरुवात करत. मंत्रालयाचे दरवाजे उघडतात सकाळी 10 वाजता. पण दादा पहाटे येऊन बसत ते यासाठी की दादांच्या मागे त्यांना भेटणाऱ्यांची संख्या प्रचंड असते. त्या भेटीगाठीत मंत्रालयीन कामकाज बाजूला पडता कामा नये हा त्यांचा हेतू असे. तेव्हा सुद्धा दादा मला गराड्याशिवाय कधी दिसले नाहीत. दादांशी फोनवर बोलणं अधिक बरं पडायचं. आणि आपला फोन उचलला गेला नाही तर ते उलटा फोन करतात. कारण भेटायला गेलं की ही तोबा गर्दी. आता फरक इतकाच झालाय कोविडनंतर की लोकांची गर्दी मंत्रालयात नसते. कारण घराबाहेर पडायला मिळत नाही आणि मंत्रालयात प्रवेश नाही. पण दादा मंत्रालयात असतात. 

अख्खं मंत्रालय रिकामं आहे अक्षरशः. कारण 5 टक्क्यांहून अधिक कर्मचारी मंत्रालयात असता कामा नयेत, असा कोरोनामुळे प्रशासनाचा दंडक आहे. येण्याजाण्याची सोयही नाही. पण बहुतेक मंत्रालय 5 टक्के काय 1 टक्कासुद्धा भरलेलं दिसत नव्हतं. मला पूर्ण मंत्रालयात या दहा दिवसात दिसले ते चार, पाचच मंत्री. कधी अनिल देशमुख, अनिल परब, एकनाथ शिंदे आणि राजेश टोपे. पण दादांचा दिवस चुकत नव्हता. दादा सकाळपासून संध्याकाळपर्यंत बैठकाहून बैठक घेत होते. त्यांच्या दिमतीला फक्त एक खाजगी सचिव, संबंधित खात्याचे सचिव आणि एक शिपाई. दोन, चार पोलीस. यापलीकडे मंत्रालयात कुणी दिसत नसे. 

राजेश टोपे, अनिल परब, अनिल देशमुख आणि एकनाथ शिंदे या चार मंत्र्यांचे अपवाद वगळता अक्षरशः मंत्रालय रिकामं असायचं. मंत्रालयात आवाज येतात ते फक्त मांजरींचे. कर्मचाऱ्यांच्या डब्यातलं अन्न त्यांना मिळत नाही. त्यामुळे ते बहुतेक उंदीरच शोधत असतात. 

प्रत्येकवेळी मला दादांकडेच जावं लागलं. संबंधित विषय दादांच्या खात्याशी निगडित नसताना सुद्धा. पण दादा दोन मिनिटात काम पूर्ण करायचे. तिथल्या तिथे रिझल्ट द्यायचे. मी एकदा त्यांना म्हटलं यूपीतल्या शिक्षकांच्या कुटुंबियांना घरी जायचं आहे. त्यांना आश्चर्य वाटलं, की हिंदी भाषिक शिक्षक आपल्याकडे इतक्या मोठ्या संख्येने आहेत. 

दादांनी विचारलं,
इतके शिक्षक आहेत?

मी म्हटलं, 
हो.

पण दुसऱ्या क्षणी त्यांनी सचिवांना फोन लावला. 

ट्रेन जात असेल तर कपिल पाटलांचंही काम करा.

पुढे एक श्रमिक ट्रेन शिक्षकांसाठी उपलब्ध झाली. शिक्षक, त्यांचे कुटुंबीय गावी पोचलेही.

आयत्यावेळी ती ट्रेन रद्द होणार होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या क्षणी मदत केली म्हणून ती ट्रेन गेली. 

पण या सगळ्या काळामध्ये दादा कुठेही पडद्यावर येत नाहीत. पत्रकारांच्या कॅमेऱ्यासमोर जात नाहीत. पण पडद्यामागे राहून एखाद्या फिल्ड मार्शल सारखं तेही युद्ध लढत आहेत. ठाकरे सरकारचे खरे फिल्ड मार्शल हे अजित दादाच आहेत. 



दादांनी खात्यांच्या बैठका तर खूप घेतल्या. प्रत्येक खात्याची बैठक घेतली. तिजोरी रिकामी असताना सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार त्यांनी करायला लावले. राजेश टोपेंच्या खात्याला जिथे जिथे अडचण असेल तिथे काही क्षणात ते फाईल तयार करायचे आणि मुखमंत्र्यांकडे पाठवून द्यायचे. लोक त्यांना भेटायला येत नाहीत. पण म्हणून फोन थोडी थांबले आहेत. सचिवांबरोबर चर्चा आणि फाईली मोकळ्या करत असताना शेकडो फोन ते रोज घेत असतात. आणि प्रत्येकाच्या कामाला न्याय देत असतात.  

कुणी गुजरातमध्ये एक मुलगा अडकला होता. आईबाप इथे पुण्यात. त्या मुलाला आणण्याची व्यवस्था त्यांनी केली. 

सिंधुताई सकपाळ यांच्या आश्रमात भाजीपाला पाठवण्यात अडचण येत होती. दादांनी पोलिसांना सांगितलं, अरं तिथं तर भाजीपाल्याची गाडी आश्रमापर्यंत गेली पाहिजे. भाजीपाल्याची गाडी रोजच्या रोज जायला लागली.

पुणे, पिंपरी चिंचवड, बारामती हे दादांचं होमटाऊन किंवा कार्यक्षेत्र. दादांनी रेड झोनचं रूपांतर ऑरेंज आणि काही ठिकाणी ग्रीन झोनमध्ये करण्याचं शिवधनुष्य उचललं आणि करून दाखवलं. कारखाने चालू केले. छोटे मोठे उद्योग धंदे चालू करायला लावले. बजाजचा उद्योग समूह सुरू झाला. अर्थचक्र चाललं नाही तर राज्य चालू शकणार नाही, हे दादांना पक्कं ठावूक आहे. म्हणून जिथे जिथे शक्य आहे तिथे उद्योग सुरू करावेत, यासाठी दादा अक्षरशः व्यक्तीशः लक्ष घालतात. चालू करून देतात.

एकनाथ शिंदे, अनिल परब, राजेश टोपे, अनिल देशमुख हे वेगवेगळ्या आघाड्यांवर लढत आहेत. त्यांच्या प्रत्येक अडचणीला दादा प्राधान्याने मदत करताहेत. 

दादा बोलायला तसे फटकळ आहेत. तसे कसले पक्के फटकळ आहेत. पण दादा अत्यंत सहहृदय आहेत. संवेदनशील आहेत. ते निर्भय आणि निडर आहेत. अभ्यासू आहेत आणि निर्णय घेण्याची प्रचंड क्षमता त्यांच्याकडे आहे. कोविड युद्धामध्ये मी ती अगदी जवळून पाहिली. म्हणून चकित झालो माजी मंत्री आणि भाजप खासदार गिरीश बापट यांच्या त्या प्रश्नांने की दादा कुठे आहेत?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे हे स्वाभाविकपणे सर्वांना समोर दिसतात. त्यात आश्चर्य नाही. पण त्या दोघांच्या यशामध्ये दादांचा अदृश्य वाटा आहे, हे नाकारता येणार नाही. म्हणून मी त्यांना या कोविड युद्धातला फिल्ड मार्शल म्हटलं. फिल्ड मार्शल म्हणजे काय हे गिरीश बापटांना सांगण्याची आवश्यकता नाही. बापट तसे दादांचे मित्र आहेत. आणि त्यांना माहीत नाही असं असू शकत नाही. हे बापटांसाठी म्हणून मी लिहीत नाहीये. अनेकांना वाटत असेल की दादा कुठे आहेत?  म्हणून हा प्रपंच. 

आमदार कपिल पाटील
अध्यक्ष, लोक भारती

17 comments:

  1. विनाअनुदानित शिक्षकांचा पण तेवढा प्रश्न मार्गी लावा मग अडचणी कसल्या येतात

    ReplyDelete
  2. छान साहेब.ईतरांच्या चांगल्या कामाची तारीफ स्तुती पण करता यावीच..आपले मोठेपण..

    ReplyDelete
  3. अप्रतिम शब्दांकन,
    अजितदादांचे आमच्या कपिलदादांनी केलेल.

    ReplyDelete
  4. उत्तम ! भल्यांचे भलेपन कर्तृत्वातून दिसते !

    ReplyDelete
  5. योग्य कामाचे कौतुकही केले पाहिजे आणि अनावश्यक बोंबा मारणाऱ्यांना उत्तर पण दिले पाहिजे.

    ReplyDelete
  6. इतर पक्षाचे असून सुद्धा इतर नेत्याच्या खरय कामाच कौतुक करणे यातच आपल मोठेपण दिसून येते.

    ReplyDelete
  7. जुनी पेंशन योजना लागू करण्यासाठी प्रयत्न केले तर खूप चांगले होईल

    ReplyDelete
  8. दादाच्या कामाविषयी ते बोलले न्हवते
    पुण्याचे पालक मंत्री आहेत,त्यांनी पुण्यात लोणकानी भेटायला पाहिजे असं ते म्हणत आहे
    दादांच्या कामाविषयी कुणीच बोलू नये
    ओन्ली excellent एवढं म्हणही कमी पडेल
    ग्रेट दादा

    नावाप्रमाणेच

    ReplyDelete
  9. अजित दादा पवार दिले शब्दाला जागणारे आणि त्यासाठी जिवाचे रान करणारे नेते आहेत. दादांचा फटकळ स्वभाव सगळ्यांना दिसतो. दादांची कार्यपद्धती जवळून पाहिलेली व्यक्ती दादांबद्दल असे मत कधीच व्यक्त करणार नाही. वेळेचा आणि शब्दाचा पक्का दादांसारखा राजकारणी दुर्मिळच!

    ReplyDelete
  10. आमदार कपिल दादा पाटील, आपण अजितदादांची कार्यपद्धती सर्वांच्याच लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद!

    विठ् ठल माने,वाई,जि.सातारा

    ReplyDelete
  11. प्रती
    मा.कपिल पाटील
    शिकक आमदार कोकण विभाग मुंबई .
    आपणास विनंती कि मागिल 22 मार्च पासुन सर्व भारत कोरोना मुळे बंद असल्याने सर्व शाळा कॉलेज सार्वजनीक स्थळ बंद करण्यात आली आहे. त्या मुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असे शासनाचे किंवा पालकांचे म्हणणे आहे हे कितपत योग्य आहे हे आपणास च माहिती आहे. आताचे शिक्षण मंत्री मा.वर्षा गायकवाड यांनी 15जुन पासुन शाळा कॉलेज सुरु कराव्यात अश्या चर्चा वर्तमान पत्रात झळकलयात पण मि तर म्हणतो की विदयारथयाचे नुकसान जर झालेत तर शाळा कॉलेज 1 जुन 2020 पासुन सुरुवात कराव्यात.आणि दिवाळीच्या सुट्टीत पण सुट्टी देता कामा नये.दरवर्षी शाळा 26 जुनला सुरु होतात.पण यावर्षी कोरोना च्या काळात 1 जुन पासुन शाळा कॉलेज सुरु करायला हरकत नाही. पण त्यांमधे शाळेमधे सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असायला पाहिजेत.
    1.जर गावात किवा गावाजवळच शाळा कॉलेज असेल तर तिथेच विदयारथयाना शिक्षण घेण्याची बंदी घालण्यात यावी.गावचे विद्यार्थी बाहेर गावी जाण्यास बंधनकारक करण्यात यावी कि जेणेकरुन विद्यार्थी गर्दी मधे प्रवास करणार नाहित.कि जेणेकरुण कोरिणाची लागण/ प्रसार होणारं नाही .आणि विद्यार्थी जर बाहेर गावातून येत असतिल तर आवश्यक तेवढया बसेस सोडणयात येऊन त्यात सर्व आवश्यक कोरोना बाधित सोयी असाव्यात.
    2. वर्गखोलीत विद्यार्थी संख्या 30 पर्यंत असावी.त्यापेक्षा जास्त असु नये.
    3. प्रत्येक विदयारथयाना मासक असने आवश्यक आहे.हात धुणयाकरिता सॅनिटराईज, टावेल/ हात रुमाल वैयक्तिक असावा आणि हया सर्व सोयी शासनानी मुफतामधे सर्व शाळाना पुरवावेत.
    4 .विदयारथयाना अभ्यासक्रम हा संरव महाराष्ट्रात सारखाच असावा.(जेवढा आवश्यक आहे तेवढाच .)
    5.E ..learning किवा android mobile च्या माध्यमातून शिक्षण पुर्ण करायची असेल तर खेडयातिल विदयारथयाना android mobile ची व्यवस्था सवत:शासनानी करावी.
    6.शाळेच्या बाहेर फाटकावर, आवारात , वर्ग खोलीत, कोरोना बाधित सर्व सोयी असाव्यात.
    7 प्रतेक तालुक्यात कोरोना वर मात करण्यासाठी दवाखाने/ असपताल असावेत.
    8.प्रतेक आठवड्यातून एक दिवस कोरोना चे प्रशिक्षण विदयारथयाना आवश्यक.
    9 .एखादि कोरोना चि घटना घडत असेल तर शिक्षकांना जबाबदार धरण्यात येउ नये.
    खुशाल शेंडे मोहाडि जि भंडारा.

    ReplyDelete
  12. मान.सर, आपण खूप छान मुद्दे मांडले परंतु खालील मुद्द्यांचा सुद्धा विचार व्हावा,
    1) पती-पत्नी दोघेही शिक्षक असताना, दोघे दोन वेगवेगळ्या शाळांवर असतील तर त्यांची मुलेही शिक्षणानिमित्त मध्यवर्ती ठिकाणी किंवा शहराच्या ठिकाणी असतात, अशावेळी त्यांना कुटुंब शहराच्या ठिकाणी ठेवून शाळेच्या ठिकाणी जाऊन येऊन करावे लागते आताच्या परिस्थितीत बरेचशे शहरी भाग रेड झोनमध्ये आणि ग्रामीण भाग ग्रीन झोन मध्ये आहेत मग रोजचा हा प्रवास करायचा कसा?
    2) सध्या ग्रामीण भागातील बऱ्याच शाळांमध्ये परिस्थिती अशी आहे की, खिचडी शिजवण्यासाठी सुद्धा पाणी उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत शिक्षक व विद्यार्थ्यांनी दिवसभर हात धुण्यासाठी पाणी आणायचे कोठून?
    3) पाण्याची वानवा असल्यामुळे शालेय स्वच्छतागृहे ही प्रचंड अस्वच्छ असतात. पाळीच्या काळात शिक्षिकांची होणारी कुचंबणा सांगताही येत नाही इतकी भयाण असते.आताच्या काळात यावर तोडगा काढायचा कसा?
    4) सर्व शालेय इमारती या दुसऱ्या जिल्ह्यातून आलेल्या लोकांना क्वारनटाईन करण्यासाठी दिलेल्या होत्या.शाळा उघडण्यापूर्वी त्या इमारतींचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक नाही का?
    श्रीमती सुनिता सुभाष दरे
    जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडोळी,
    तालुका पैठण,जिल्हा औरंगाबाद.

    ReplyDelete
  13. खूप उपयुक्त मार्गदर्शन,अभ्यासपुर्ण,मुद्दे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. बदलीसंदर्भात एक सुचना -एकल शिक्षकांचा विचार व्हावा तसेच पूर्वीचा आदिवासी /डोंगराळ भाग दुर्गम सर्विसचा विचार व्हावा. सुगमचा विचार नको.

    ReplyDelete
  14. दादा,खरच खुप छान अनुभव आपण दादांचा सांगितलं त्यांची कार्यपद्धती सांगितली असे राजकारणी मानस खूपच थोडी आहेत,आम्ही पुणेकर तर त्याचा खूपच जवळून अनुभव घेत आहोत,दादांचा काम खूप ग्रेट आहे,आणि आपल काम ही खूप मोठ आहे,आज संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षकांबद्दल सामजिक भान असलेला दुसरा कुठला आमदार आम्ही पहिला नाही,आपण ज्या तळमळीने हे काम करत आहात त्या कार्याला सलाम

    ReplyDelete