मुंबई जिल्हा बँकेत ४१२ कोटींचा घोटाळा
- विनोद तावडे, विरोधी पक्ष नेता
मुंबईतील शिक्षकांचे पगार मुंबई जिल्हा बँकेतून
- विनोद तावडे, शिक्षणमंत्री
मुंबई, दि. १९ ऑक्टोबर २०१७ :
शिक्षणमंत्री विनोद तावडे विरोधी पक्ष नेते असताना स्वतः पत्र लिहून मुंबई जिल्हा बँकेची चौकशी करुन संचालकांना तुरुंगात टाकण्याची मागणी केली होती. ४१२ कोटींचा घोटाळा सिद्ध झाल्याने कारवाईचा आग्रह धरला होता. त्याच बुडणाऱ्या आणि भ्रष्टाचारी मुंबई जिल्हा बँकेत मुंबईतील शिक्षकांचे १२०० कोटी रुपयांचे पगार का ढकलले जात आहेत? नक्की काय व्यवहार झाला आहे? याची उत्तरं शिक्षणमंत्री देतील का? असा थेट सवाल आमदार कपिल पाटील यांनी विचारला आहे.
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी कपिल पाटील यांनी विनोद तावडे यांच्या घरी काळा आकाश कंदील लावला. त्याचाच राग आल्याने काल तावडे यांनी प्रेस नोट काढत कपिल पाटील यांच्यावर बेछूट आरोप केले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना कपिल पाटील यांनी हा सवाल केला आहे.
विरोधी पक्ष नेता ते शिक्षणमंत्री यादरम्यान काय बदल घडले?
राज्यभर अनेक जिल्हा बँका बुडाल्या आहेत. ठेवीदारांच्या, शिक्षकांच्या ठेवी बुडाल्या आहेत. अजूनही मिळालेल्या नाहीत. त्यासर्व ठिकाणी राष्ट्रीयकृत बँक देण्यात आली आहे. अगदी अलिकडेच नाशिकलाही तावडे साहेबांनी राष्ट्रीयकृत बँकेतून पगार करण्याचे आदेश दिले आहेत. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या नागपूर शहरात जिल्हा बँक बुडाल्यानंतर राष्ट्रीयकृत युनियन बँकेतून पगार केले जात आहेत. मग मुंबईतच तावडे साहेबांचा जिल्हा बँकेचा आग्रह का आहे? तावडे साहेबांचे नक्की लागेबंध काय आहेत? मुंबईतील शिक्षकांचे पगार मुंबई बँक वेळेवर करेलही नव्हे त्यांना करावेच लागतील. पण उद्या मुंबई बँक बुडाल्यावर शिक्षकांच्या पगार आणि ठेवींची हमी तावडे साहेब घेणार आहेत का? विरोधी पक्ष नेता ते शिक्षणमंत्री यादरम्यान काय बदल घडले? असे अनेक सवाल शिक्षकांच्या मनात आहेत. मी शिक्षकांची भावना मांडत असतो. मी शिक्षक हिताची भूमिका मांडतोय याचा तावडेसाहेबांना त्रास होतोय, असं कपिल पाटील यांनी म्हटलं आहे.
रात्रशाळा बंद करण्याचा डाव
ज्या अर्धनोकरी करणाऱ्या २०० शिक्षकांना पुढे करत शिक्षक परिषद आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी १ हजार रात्रशाळा शिक्षकांना अपमानीत करुन घरी पाठवलं, त्या अर्धवेळ नोकरी करणाऱ्या शिक्षकांना पूर्णवेळ करणं तर दूर राहिलं त्या शिक्षकांनाही गेले सहा महिने पगार देण्यात आलेले नाहीत, असा आरोप कपिल पाटील यांनी केला आहे.
१,१०० शिक्षकांना नोकरीवरुन काढून टाकताना शिक्षणमंत्र्यांनी त्या शिक्षकांच्या संसाराचा जराही विचार केला नाही. यातील बहुतांश शिक्षक हे २५ ते ३० वर्षांपूर्वी जेव्हा रात्रशाळांचं मानधन १९० रुपये होतं तेव्हा लागलेले आहेत. हे सगळे अनुभवी आणि तज्ज्ञ विषय शिक्षक मानले जातात. कमी वेळात गोळीबंद शिक्षण देण्याचा त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्यामुळे रात्रशाळांमधून काही इन्स्पेक्टर झाले, अधिकारी झाले, व्यावसायिक झाले आणि दोन मुख्यमंत्री झाले. या शिक्षकांनी निष्ठेने काम करुन उपेक्षित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं. आता निवृत्तीची दोन-तीन वर्षे राहिली असताना ते अपमानित करुन काढण्यात आलं आहे. काहींच्या मुलींची लग्न निघाली आहेत. अनेकांची मुलं उच्च शिक्षण घेत आहेत. कुणी मेडिकलला आहे, इंजिनिअरींगला आहे. दुबार कामामुळे शिक्षकांनी मुंबईत घरं घेतली. आता त्या घराचा २० ते २५ हजारांचा ईएमआय कुठून भरणार? त्याचा प्रश्न आहे.
खोट बोलण्यात तावडे यांचा हात कोण धरणार. अर्धवेळ नोकरी करणाऱ्या शिक्षकांना काढून टाका, अशी मागणी कपिल पाटील करत आहेत असा अत्यंत खोटा आरोप तावडे आता करत आहेत. केवळ रात्रीच्या शाळेत अधर्वळ नोकरी करणाऱ्यांना अर्ध्या पगारात घर चालू शकत नाही, म्हणून त्यांना दिवसाच्या शाळेत रिक्त पदांवर थेट सामावून घ्या, अशी मागणी मी स्वतः आणि शिक्षक भारतीने सातत्याने केली आहे. मात्र मुंबईत १५०० रिक्त जागांवर एकही शिक्षक नेमणूक करायला तावडे तयार नाहीत. उलट ज्या संस्थांनी हायकोर्टाच्या आदेशाने रिक्त जागा भरल्या त्या शिक्षकांनाही तावडे यांनी काढून टाकलं होतं. पण हायकोर्टाने चपराक दिल्यामुळे आता ते आदेश मागे घेण्यात आले आहेत. शिक्षकांमध्येच भांडणं लावण्याचा उद्योग मात्र तावडे करत आहेत.
स्कील इंडियाला प्रोग्रामला विद्यार्थी मिळत नाहीत म्हणून रात्रशाळा सरकारला बंद पाडायच्या आहेत, असा आरोपही कपिल पाटील यांनी केला आहे.
म्हाळगी प्रबोधीनीतील सहकार्याला वाचवण्यासाठी
विद्यार्थी आणि शिक्षक दिवाळी आनंदात साजरी करत आहेत असं शिक्षणमंत्री म्हणतात. मुंबई विद्यापीठातल्या हजारो विद्यार्थ्यांचं करिअर बर्बाद होत असताना शिक्षणमंत्री मात्र म्हाळगी प्रबोधीनीतील आपल्या सहकार्याला वाचवण्यासाठी थंडपणे तारखा देत बसले होते, हे लोक विसरलेले नाहीत. शिक्षण खात्याचा कारभार सुरळीत करण्यापेक्षा म्हाळगी प्रबोधीनीत इतिहासाची पुस्तकं बदलण्यात शिक्षणमंत्र्यांना अधिक रस आहे.
शिक्षक ऑनलाईनवर आणि शिक्षण सलाईनवर
स्टुडन्टस् अपडेटच्या नावाखाली शिक्षकांना शि्ाक्षणबाह्य कामांना जुंपण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांची आधार कार्ड, त्यांच्या पालकांची बँक अकाऊंटस् आणि दुनियाभरची माहिती ऑनलाईन करण्याचं काम शिक्षकांना देण्यात आलं आहे. त्यात होणाऱ्या शिक्षकांच्या हालाची शिक्षणमंत्र्यांना पर्वा नाही. शिक्षक ऑनलाईनवर आणि शिक्षण सलाईनवर अशा गंभीर स्थितीत राज्य आहे. विनाअनुदानित शिक्षकांना पगार नाही. पेन्शनचा पत्ता नाही. बदल्यांचा आणि चौकशांचा ससेमिरा सुरु आहे. वेतनेतर अनुदान बंद आहे. राज्यातले हजारो शिक्षक पगाराविना आहेत. शिक्षण व्यवस्थेत प्रचंड असंतोष आहे.
१०५ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीच्या फाईली कसली वाट पाहत आहेत?
शिक्षण विभागातील १०५ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीच्या फाईली शिक्षणमंत्र्यांच्या टेबलावर गेली तीन महिने मंजुरीसाठी पडून आहेत. शिक्षणमंत्री कशाची वाट पाहत आहेत, असा सवालही पाटील यांनी केला आहे.
आरोपांची राळ उठवून मुख्य प्रश्नांपासून लक्ष विचलित करणे ही भाजपची नीती आहे. तोच हातखंडा तावडे साहेब वापरत आहेत. गेली ३ वर्षे शिक्षकांनी याचा अनुभव घेतला आहे. पण आता शिक्षक याला बळी पडणार नाहीत, असा इशारा कपिल पाटील यांनी दिला आहे.
--------
तावडे साहेबांचा खोटारडेपणा -
--------
तावडे साहेबांची स्टंटबाजी?