Wednesday, 9 August 2017

बुडणाऱ्या नौकेत बसायला कोण तयार होईल?


दि. ऑगस्ट २०१७ (क्रांतीदिन)
प्रति,
मा. प्राचार्य, मुखाध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर बंधू-भगिनीनो,
मुंबई

सप्रेम नमस्कार,
मुंबई बँकेला नकार देणाऱ्या शिक्षकांच्या युनियन बँकेवरील अकाऊंटस् वर अजून पगार का झाला नाही? असा संतप्त सवाल मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्तींनी आज सरकारला विचारला. बिलं सादर केली नाहीत म्हणून पगार दिला नाही, असं समर्थन सरकारी वकीलांनी देण्याचा प्रयत्न केला. पण तो किती फोल आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. सणासुदीचे दिवस असतानाही अजूनही अकाऊंटस् उघडणाऱ्या शिक्षकांचं कौतुकच म्हणावं लागेल. आता तातडीने युनियन बँकेची बिलं सादर करायला हवीत म्हणजे पगाराचा मार्गही मोकळा होईल. न्यायमूर्ती शुक्रवारी निर्णय देतील. तोपर्यंत आपणही तयारीत असायला हवं.

शिक्षक भारतीच्या वतीने करण्यात आलेलं रिट पिटीशन आज मा. हायकोर्टापुढे आलं. सीनिअर काैसिंल अॅड. राजीव पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यांचे आभार मानायला हवेत.

आता एकजुटीची गरज आहे. जे मुंबई बँकेकडे गेले आहेत त्यांनाही परतण्याची ही संधी आहे. सक्ती, दडपण आणि घरातली आर्थिक अडचण यामुळे अकाऊंटस् उघडले गेले आहेत. हे आपण समजू शकतो. नाईलाजाने मुंबई बँकेत गेलेले शिक्षकही हायकोर्टाच्या निर्णयाकडे डोळे आणि कान लावून आहेत. भ्रष्टाचाराची भोकं पडलेल्या बुडणाऱ्या नौकेत बसायला कोण तयार होईल. तेव्हा युनियन बँकेत थांबलेले आणि मुंबई बँकेत नाईलाजाने गेलेले दोघेही एक होऊया. आपला पगार आणि आपल्या ठेवी सुरक्षित करुया. राष्ट्रीयकृत बँकेतच राहूया.

शिक्षण विभागाने शिक्षकांच्या पगाराचं लोणी मुंबई बँकेच्या हंडीत नेऊन ठेवलं आहे. येणारा गोविंदा ही भ्रष्टाचाराची दहिहंडी फोडल्याशिवाय राहणार नाही. गणपतीचा उत्सव आणि येणारी ईद नवा आनंद घेऊन येईल, अशी अपेक्षा करुया. सरकारी छळातून मुक्त होण्याचा आनंद स्वातंत्र्यदिनी मिळो.

लढूया, जिंकूया!

आपला,

----------------------------------------

आधीचे वृत्त

मुंबईतील शिक्षकांचे पगार युनियन बँकेतून होणार

मुंबई, दि. ऑगस्ट २०१७ (प्रतिनिधी) :
मुंबई बँकेला नकार देणाऱ्या मुंबईतील शिक्षकांना युनियन बँकेतून पगार का देत नाहीत? असा संतप्त सवाल करत मुंबई हायकोर्टाने आज महाराष्ट्र शासनाला झापले. जिल्हा बँका बुडत असताना मुंबईतच जिल्हा बँकेकडे जाण्याची सक्ती का? असा सवालही आज हायकोर्टाने केला.

शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, सुभाष मोरे आणि जालिंदर सरोदे यांचे रिटपिटीशन (२०३९/२०१७) आज न्यायमूर्ती अनुप मोहता आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे सुनावणीसाठी आले. शुक्रवार पर्यंत शासनाला याबाबतची वस्तुस्थिती मांडण्यास हायकोर्टाने सांगितले. सिनिअर काैसिंल अॅड. राजीव पाटील आणि अॅड. सचिन पुंडे अॅड. मिलिंद सावंत यांनी युनियन बँकेतील सुमारे २० हजार शिक्षकांना अद्यापी पगार मिळाले नसल्याचे आणि मुंबईत बँकेत अकाऊंट उघडण्याची सक्ती होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. सरकारी वकील आणि मुंबई बँकेच्या वकीलांनी शासकीय निर्णयाचे समर्थन केले. सणासुदीचे दिवस असतानाही शासन पगार देत नसल्याबद्दल न्यायमूर्तींनी तीव्र नापसंती व्यक्त केली.

मुंबई बँकेने सक्तीने आणि केवायसी शिवाय अकाऊंटस् उघडली आहेत, असे शिक्षक भारतीच्या वकीलांनी निदर्शनास आणून दिल्यनंतर अशी अकाऊंटस्  इनव्हॅलिड आहेत, अशा इनव्हॅलिड अकाऊंटसला तुम्ही पगार कसे करता असे न्यायमूर्तींनी बँकेला आणि शासनला फटकारले. शिक्षक भारतीने यापूर्वीच याबाबत आरबीआयकडे तक्रार केली आहे.

आज दिवसभराचे कामकाज संपता संपता शिक्षक भारतीची (फक्त) ही केस सुनावणीसाठी आली आणि तासभर उभय बाजूंनी खडाजंगी झाली. आणखी एका संघटनेचे पिटीशनही शुक्रवारीच ऐकण्यात येणार आहे.


Wednesday, 2 August 2017

संघर्षाचं फळ गोड असतं


दिनांक - २ ऑगस्ट २०१७

मा. प्राचार्य / मुख्याध्यापक आणि शिक्षक-शिक्षकेतर बंधू-भगिनींनो,

सप्रेम नमस्कार,
मुंबई बँकेविरोधातील आपली लढाई आता अंतिम टप्प्यात आहे. मी बेमुदत उपोषण सुरु केलं होतं. मात्र विधान परिषदेचे मा. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी तातडीने स्वतः पुढाकार घेत दोन दिवसात खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सभागृहाचे ज्येष्ठ नेते सुनिल तटकरे, ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी चर्चा करुन त्यांना याबाबत तातडीने मार्ग काढण्याचे आवाहन केले. काल सभागृहात पुरोगामी गटाचे नेते जयंत पाटील यांनी हा प्रश्न उपस्थित केला. मा. सभापती आणि दोन्ही बाजूच्या सदस्यांनी चर्चेने प्रश्न सोडवू. सभागृहाचे कामकाज चालू असताना उपोषण नको, ते मागे घ्या, असे आवाहन केले. शिक्षणमंत्री आणि संसदीय कार्यमंत्री या दोघांनीही चर्चा घडवून आणण्याचे मान्य केले. मा. सभापतींच्या आवाहनानंतर मी काल दुपारनंतर सभापतींच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण संपवले. 

आज मा. हायकोर्टातही शिक्षक भारतीची मुंबई बँकेच्या विरोधातली केस उभी राहीली आहे. आपल्या ज्येष्ठ वकीलांच्या युक्तिवादामुळे मा. न्यायमूर्ती महोदयांनी सरकार आणि मुंबई बँकेकडून स्पष्टीकरण मागवले आहे. प्रत्येक जिल्ह्यात वेगळी पॉलिसी का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिक्षक भारतीने अ‍ॅड. मिलिंद सावंत आणि अ‍ॅड. सचिन पुंदे यांच्यासह सिनिअर काैसिंल आणि बार काैसिंलचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. राजीव पाटील यांना उभे केले आहे. त्यामुळे भिण्याचे कारण नाही. न्यायसंस्थेवर विश्वास ठेवू या. 

मुंबई बँकेत ज्यांनी दडपणामुळे खाती उघडली त्यांचे शेकडो फोन दोन दिवसात येऊन गेले. एका ज्येष्ठ शिक्षिकेने चेक कसा बाऊंस झाला आणि खात्यावर सफिशंट अमाऊंट नसल्याचा मेसेज कसा आला? ते अक्षरशः रडत सांगितले. अनेकांना आपला अकाऊंट नंबर मेसेजमध्ये पूर्ण आल्याने धक्काच बसला. मुंबई बँकेने गोपनीयता का पाळली नाही? हा त्यांचा प्रश्न आहे. एका शाळेत तर दुसऱ्याच्या अकाऊंटला पैसे ट्रान्सफर झाले. आता ही स्थिती तर पुढे काय? बँक बुडाली तर आपल्याला वाचवणार कोण? असे अनेक प्रश्न उभे आहेत. 

मुंबई बँकेत ज्यांनी खाती उघडली तेही आता आपल्यावर म्हणजे खाती न उघडणाऱ्यांवर भरोसा ठेवून आहेत. २१ हजार शिक्षकांनी मुंबई बँकेत अकाऊंट उघडली नाहीत. पगार आलेला नाही तरी ते ठाम आहेत, ही एकजुट अभूतपूर्व आहे. 

अफवांवर आणि अपप्रचारावर विश्वास ठेवू नका. 

शिक्षक भारती ही महात्मा फुले, महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, साने गुरुजी यांची विचारमुल्ये घेऊन काम करते. या मूल्यांशी शिक्षक भारती कधी प्रतारणा करणार नाही. संघर्षात त्रास होणारच. पगार लांबलेला आहे ही खरी गोष्ट पण संघर्षाचं फळ गोड असतं. 

दरम्यान आज मी पुन्हा मा. मुख्यमंत्र्यांना भेटलो. त्यांना लवकर लक्ष घालण्याचं आवाहन केलं. त्यांच्या काही अडचणी आहेत. पण आज, उद्या त्यांना निर्णय घ्यावाच लागेल. कारण आता सभागृहाचं आणि समाजात जागल्याची भूमिका करणाऱ्या शिक्षकांचं दडपण त्यांच्यावर वाढलेलं आहे. 

खालचा मेसेज वाचून तातडीने सहकार्य करावे, ही विनंती. 

आपला,
कपिल पाटील, वि.प.स.

--------------------------------


शिक्षक बंधु-भगिनींनो ,

आज दिनांक 2/8/2017 रोजी उच्च न्यायालायमध्ये शिक्षक भारतीने टाकलेल्या केस मध्ये मा.न्यायाधीशांनी मुंबैबँकला आपली क्षमता सिद्ध करण्यास सांगितले आहे. राज्य सरकारला कडक शब्दात राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी पॉलिसी कशी वापरता येईल? याचे स्पष्टीकरण प्रतिज्ञापत्रासह मागितले आहे. ७ ऑगस्टला अंतिम सुनावणी आहे. आपल्या ज्येष्ठ वकिलांच्या युक्तीवादामुळे न्यायालयीन प्रक्रियेत आशावादी वातावरण निर्माण झाले आहे. 

ज्या शिक्षकांचे मुंबई बँकेत जबरदस्तीने खाते उघडून पगार टाकले गेले आहेत, त्यांच्या खूप तक्रारी येत आहेत. 

1) ज्यांचे चेक बाऊन्स झाले आहेत,
2) ज्यांना पगाराचा msg पूर्ण खाते क्रमांकासह मोबाईलवर आला आहे,
3) ज्यांचे पगार दुसऱ्याच खात्यावर जमा झाले आहेत,

त्यांनी कृपया वरील सर्व पुरावे कागदपत्रांसह शिक्षक भारती कार्यालय परेल, येथे पोहचवावेत.

किंवा

खालील कार्यकर्त्यांकडे दोन दिवसात जमा करावेत.

* कार्याध्यक्ष, श्री. सुभाष मोरे, 
* प्रमुख कार्यवाह, श्री. जालिंदर सरोदे,
* कार्यवाह, श्री. प्रकाश शेळके.
* मुंबई अध्यक्ष, श्री. शशिकांत उतेकर. 
* उत्तर विभाग अध्यक्ष, श्री. मच्छिंद्र खरात.
* दक्षिण विभाग, श्री. चंद्रभान लांडे.
* पश्चिम विभाग अध्यक्ष, श्रीमती. शारदा गायकवाड.
आणि सर्व वार्ड अध्यक्ष.   

लढेंगे जितेंगे 

जीत हमारी पक्की है।
मुंबई बँक कच्ची है।

सर्व मुख्याध्यापक, व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी 
यांना धन्यवाद। आभार। शुक्रिया। Thank You।

--------------------------------


Discussion on Kapil Patil's Fast. 




Monday, 31 July 2017

आपणच जिंकणार आहोत


मा. प्राचार्य / मुख्याध्यापक आणि शिक्षक-शिक्षकेतर बंधू भगिनींनो,

सप्रेम नमस्कार,
भ्रष्टाचारी आणि बुडणाऱ्या मुंबई बँकेत कोणालाच जायचं नाहीये. आपली लढाई अंतिम टप्प्यात आहे. माझा बेमुदत उपवास सुरु आहे. एरव्ही उपोषण एका जागी बसून केलं जातं. मात्र विधिमंडळाचं अधिवेशन सुरु असल्याने मी कामकाजात भाग घेत आहे. म्हणून एका जागी बसून उपोषण करणं शक्य नाही. पण माझा उपवास थांबलेला नाही. हा अन्नत्याग सत्याग्रह आहे. पाण्याशिवाय अन्य कोणताही अन्नपदार्थ मी सेवन करणार नाही. 

मुख्यमंत्र्यांना गेल्या आठवड्याभरात मी अनेकदा भेटलो आहे. त्यांच्या काही अडचणी आहेत. पण त्या अडचणींसाठी माझ्या शिक्षकांना त्रास का होऊ द्यायचा. म्हणून अखेर उपवासाचा निर्णय घेतला आहे. २ ऑगस्टला कोर्टाकडून नक्की काही तरी उत्तर मिळेलच. शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे आणि प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे यांची ही केस आहे. आज ती कोर्टात मेन्शन झाली. २ तारखेला युक्तिवाद होईल. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी काही निर्णय दिला नाही तर तो पर्यंत थांबावं लागेल. 

इतका धीर आपण धरला आणखी दोन दिवस. आपणच लढून जिंकणार आहोत. 

काही शाळांमधल्या शिक्षकांनी मुंबई बँकेत खाती उघडली आहेत. पण त्यांना दोष देऊ नका. तेही आपल्या सोबत आहेत. नाईलाजाने, दडपणापोटी खाती उघडली गेली आहेत. ते सर्व परत येतील, यावर विश्वास ठेवा. आपल्यात भांडण होऊ देऊ नका. आपली एकजुट अभेद्य ठेवा. ते आपली परीक्षा पाहत आहेत. पण आपण लढाई सोडून देता कामा नये. काल प्रकाश शेळकेंची एक पोस्ट तुम्ही पाहिली असेल 'आता खडूंच्या तलवारी होतील' असं प्रकाश शेळकेंनी लिहिलं आहे. केवढा मोठा निर्धार आहे. एका मोठ्या साहित्यिकाचा उद्गार यावा तसं हे वाक्य आहे. शेळकेंच्या या उद्गाराचा प्रकाश राज्यकर्त्यांच्या अंधारलेल्या डोळ्यापुढे पडो. लवकरच तो पडेल. शिक्षकांच्या खडू, फळ्याची ताकद त्यांनी अजून अजमावली नसावी. 

लढूया, जिंकूया!

आपला स्नेहांकित,


कपिल पाटील, वि.प.स.

Sunday, 30 July 2017

उद्यापासून माझे बेमुदत उपोषण



३० जुलै २०१७
प्रति,
मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

सप्रेम नमस्कार,

महोदय,
मुंबईतील शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेतूनच झाले पाहिजेत हा आग्रह मी आपणाकडे गेली दोन महिने धरतो आहे. १७ मे २०१७ चा रात्रशाळांचा जीआर  तर ३ जून २०१७ चा पगाराचा जीआर आपणाकडून वारंवार आश्वासन मिळूनही मागे घेण्यात आलेले नाहीत किंवा त्यात सुधारणा झालेली नाही. 

जुलै पेड इन ऑगस्टचा पगार युनियन बँकेतूनच करायचा आणि पुढच्या पगारांसाठी शिक्षकांना चॉईस द्यायचा. युनियन बँक की मुंबई बँक यापैकी एक पर्याय शिक्षकांना निवडू द्या, इथपर्यंतची तयारी शिक्षक भारतीने दाखवली आपण लगेच तत्वतः मान्यताही दिली. शिक्षणमंत्र्यांशी बोलून कळवतो असं सांगितलं. मात्र अद्यापी उत्तर आलेलं नाही. 

शिक्षकांना त्यांच्या हक्काचा पगार वित्त विभागाच्या नियमानुसार राष्ट्रीयकृत बँकेतूनच मिळाला पाहिजे. मात्र उद्याच्या १ तारखेला गेल्या सहा वर्षात प्रथमच पगार होणार नाहीत. उलट जोर, जबरदस्ती, जुलूम आणि धाकधापटशा सुरु आहेत. शिक्षण विभागाचे अधिकारी आणि बँकेचे अधिकारी मुख्याध्यापक आणि शिक्षकांना धमकावत आहेत. त्यांना अपमानीत करत आहेत. बँकेच्या काही प्रतिनिधींची मजल शिक्षक, मुख्याध्यापकांना आईवरुन शिव्या घालण्यापर्यंत गेली आहे. हे सहन करण्याच्या पलिकडे आहे. तरीही शिक्षकांची एकजुट भंगलेली नाही. हा अभूतपूर्व सत्याग्रह आहे. 

मी अनेकदा आपल्याला भेटलो. आपण प्रत्येकवेळी मा. शिक्षणमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख करता. मा.शिक्षणमंत्री इतके प्रबळ आहेत काय? की मा.मुख्यमंत्री इतके दुर्बळ आहेत? 

उद्ध्वस्त रात्रशाळा -
मुंबईतल्या रात्रशाळा तर शिक्षणमंत्री आणि शिक्षण सचिवांनी बंद पाडल्या आहेत. न्यायालयाने तुमचा जीआर बरोबर ठरवला असं तुम्ही म्हणाल. तर मग, ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांना परत का बोलवावं लागलं? कारण ज्युनिअर कॉलेजमधला एकही शिक्षक सरप्लस नसताना आपण सगळ्या शिक्षकांना काढून टाकलं होतं. नाईट ज्युनिअर कॉलेजच बंद पडली होती. आता नाईटच्या माध्यमिक शिक्षकांनाही परत बोलवा आणि मुलांचं शिक्षण चालू ठेवा, एवढीच माफक मागणी आहे. दीड महिना झाला नाईटच्या मुलांचं शिक्षण बंद आहे. पण सरकारला पर्वा नाही. या देशातल्या चातुर्वण्य व्यवस्थेने २ हजार वर्षे बहुजन शुद्रांचं शिक्षण बंद ठेवलं. नाईटचं शिक्षण बंद करुन त्याची पुन्हा तुमच्या राज्यात सुरवात झाली आहे. 

शिक्षकांच्या नोकऱ्या का घालवता? -
रात्रशाळेचे १,०१० शिक्षक, ३४८ शिक्षकेतर कर्मचारी आणि राज्यातील दिवस शाळांमधील ७ हजार शिक्षक यांच्या सेवा आपल्या सरकारने समाप्त केल्या आहेत. २००५ नंतरच्या शिक्षकांच्या सेवाही समाप्त करण्यासाठी चौकशीच्या नोटीसा जारी झाल्या आहेत. शासनाच्या निर्णयानुसार आणि मा.मुंबई हायकोर्टाच्या सुमोटो आदेशानुसार नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या नोकऱ्या घालवण्याचं कारण काय? २०१२ नंतरच्या या शिक्षकांनी जायचं कुठे? 

विद्यार्थ्यांच्या भविष्यावर कुऱ्हाड - 
आता मुलांचे २०टक्के गुणही हिरावून घेण्यात आले आहेत. भाषा आधी मौखिक असते मग ती लिपीबद्ध बनते. ते २० टक्के गुण संपुष्टात आणून महाराष्ट्रातील लक्षावधी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहातून बाद करण्याची तयारी सुरु झाली आहे. कला-क्रीडा शिक्षण तर संपुष्टात आणलं आहे. त्या शिक्षकांना ५० रुपये रोजावर काम करण्याचा फतवा निघाला आहे. विनाअनुदनित शिक्षकांची अवस्थाही बिकट आहे. प्लॅन, आयसीटी, अंशकालीन निदेशक, अंगणवाडी ताई, विशेष शिक्षकांमध्येही प्रचंड असंतोष आहे. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय असो वा आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न असो शिक्षक तणावाखाली आहेत. असे एक ना अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. शिक्षण विभागाच्या कारभारामुळे राज्यभर अनागोंदी आहे. 

ही तर आणीबाणी  -
या सर्वांवर कडी म्हणून भ्रष्टाचारी आणि बुडणाऱ्या मुंबई बँकेत तुम्ही माझ्या मुंबईतील शिक्षकांना इच्छेविरुद्ध ढकलत आहात. जोर जबरदस्ती करत आहात. शिव्या घालून अकाऊंट उघडायला भाग पाडत आहात. मुंबई बँक ही पगार देईल हे मला माहीत आहे, पण ही बँक बुडाली तर काय? राज्यातील सहा जिल्हा बँका बुडाल्या आहेत आणि शिक्षकांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळालेले नाहीत. वारंवार भेटूनही, २३ हजार शिक्षकांचं निवेदन देऊनही, पोकळ आश्वासनांच्या पलिकडे काही घडलेलं नाही. या उलट शिक्षण क्षेत्रात आणीबाणी सदृश्य स्थिती निर्माण करण्यात आली आहे. 

सरकारला माझा बळी हवा असेल तर मी तयार आहे. 'बळी राजाचा बळी घेण्याची परंपरा तुमच्या राज्यात सुरु होणार असेल तर शिक्षण क्षेत्रातील इडा पिडा टाळण्यासाठी मी माझा बळी द्यायला तयार आहे.' उद्या सकाळपासून मी बेमुदत उपोषण सुरु करत आहे. 

कृपया लवकर निर्णय घ्या. शिक्षकांमधला अपमानीत चाणक्य जागवू नका. 
धन्यवाद!

आपला स्नेहांकित,


कपिल पाटील, वि.प.स.

Tuesday, 25 July 2017

मुंबई बँक की युनियन बँक? दोन दिवसात मुख्यमंत्र्यांचा निर्णय



मुंबई बँकेला विरोध करणाऱ्या २३,५०० शिक्षकांच्या सह्यांचं निवेदन शिक्षक भारतीने सोमवार, दि.२४ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना दिलं. रात्री १०.३० ते ११ अशी तब्बल अर्धा तास मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाली. मुंबई बँक की युनियन बँक की दोन्ही याबाबत दोन दिवसात आपण निर्णय देऊ असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी रात्री उशिरा झालेल्या या बैठकीला आमदार कपिल पाटील यांच्या समवेत शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे आणि प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे उपस्थित होते. मंगळवार, दि.२५ जुलै रोजी नव्या राष्ट्रपतींच्या शपथविधीला मला दिल्लीत जायचं असल्यामुळे परवा आपण सर्व संबंधितांशी चर्चा करुन निर्णय घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

मुंबई बँकेचे अधिकारी मुख्याध्यापकांना धमकावत आहेत. शिक्षण निरीक्षकही दमदाटी करत आहेत. मुंबई बँकेवर शिक्षकांचा विश्वास नाही. त्यामुळे  कुणीही मुंबई बँकेत जाणार नाही अशी कैफियत शिष्टमंडळाने मांडली. शिक्षणमंत्री विनोद तावडे विरोधी पक्ष नेते असताना ४१२ कोटींचा मुंबई बँकेचा घोटाळा त्यांनी बाहेर काढला होता. मग आता तीच बँक निवडण्याचं कारण काय? मुंबई बँकेची स्थिती चांगली असेल तर शिक्षकांची खाती कशाला हवीत? जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी निवडलेली राष्ट्रीयकृत बँक दिली पाहिजे, असं वित्त विभागाचा निर्णय सांगतो. त्याच्याशी मुंबई बँकेचा निर्णय विसंगत आहे. याकडेही आमदार कपिल पाटील यांनी लक्ष वेधलं. मुंबईतील बहुसंख्य शिक्षक हे मुंबई बाहेर राहतात. त्यांना सुविधा पुरवण्यात मुंबई बँक असमर्थ आहे, अशी तक्रार जालिंदर सरोदे यांनी केली. आमच्यावर सक्ती का? असा प्रश्न बेलसरेंनी उपस्थित केला.

रात्रशाळांचा प्रश्न -
रात्रशाळेच्या प्रश्नावरही शिष्टमंडळाने प्रभावीपणे बाजू मांडली. मुख्यमंत्र्यांना शिक्षण विभागाकडून पुरेशी माहिती दिली जात नसल्याची व दिशाभुल केली जात असल्याची तक्रारही शिष्टमंडळाने केली. रात्रशाळांमध्ये दुबार नोकरी करणाऱ्यांबाबतचा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने कसा लागू शकतो. २० ते २५ वर्षे निष्ठेने आम्ही काम केलं. आता अपमान करुन का बाहेर काढता? असा सवाल अशोक बेलसरे यांनी केला.

रात्र ज्युनिअर कॉलेजमध्ये एकही शिक्षक सरप्लस नाही. अखेर आहेत त्याच शिक्षकांकडून तूर्त काम करुन घेण्याचं शिक्षण उपसंचालकांनी ठरवलं आहे. तीच स्थिती माध्यमिक रात्रशाळांमध्ये आहे. रात्रशाळांसाठी सरप्लस शिक्षकच उपलब्ध नसताना आहे त्या शिक्षकांना काम करु द्या, अशी कळकळीची विनंती अशोक बेलसरे यांनी केली. शिक्षक नसल्याने रात्रशाळा महिनाभर बंद आहेत, याकडे सुभाष मोरे यांनी लक्ष वेधलं.

मे २०१२ नंतरच्या शिक्षकांची सेवा समाप्ती -
मे २०१२ नंतर मान्यता दिल्या गेलेल्या ७,००० शिक्षकांच्या सेवा समाप्त केल्याबद्दल आमदार कपिल पाटील यांनी संताप व्यक्त केला. २००५ नंतरच्या शिक्षकांनाही नोटीसा पाठवण्यात येत असल्याचं शिक्षण सचिव नंदकुमार यांनी जाहीर केलं आहे. १ लाख शिक्षकांना घरी पाठवून शिक्षणाचा गाडा कोण हाकणार? असा सवाल कपिल पाटील यांनी केला. तेव्हा याबाबत आपण माहिती घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. रात्रशाळांच्या प्रश्नावरही आपण शिक्षण मंत्र्यांशी चर्चा करुन मार्ग काढू असं आश्वासन त्यांनी दिलं.

अंतर्गत मूल्यमापनाचे २० टक्के गुण -
अंतर्गत मूल्यमापनाचे भाषा विषयांचे २० टक्के गुण रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं अतोनात नुकसान करील इतर बोर्डांचे विद्यार्थी पुढे जातील हा निर्णय त्वरीत मागे घ्यावा, असं कळकळीचं आवाहन आमदार कपिल पाटील, बेलसरे, मोरे आणि सरोदे यांनी केलं. सीबीएसई आणि आयसीएससी बोर्डांमध्ये ३० ते २० टक्के गुण अंतर्गत मूल्यमापनासाठी आहेत. त्या बोर्डांची मुलं पुढे जातील आणि राज्य बोर्डाची मुलं मागे पडतील असं शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं. या प्रकरणीही तातडीने लक्ष घालण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.




लढूया, जिंकूया! - आमदार कपिल पाटील
मुंबई बँकेच्या विरोधावर मुंबईतल्या शिक्षकांनी अभूतपूर्व एकजुट दाखवून केलेल्या अभिनव सत्याग्रहाची दखल सरकारला घ्यावीच लागेल. भ्रष्टाचारी, बुडणाऱ्या बँकेत शिक्षकांच्या पगाराचा बळी नको, या मागणीवर सर्वजण ठाम आहेत. जबरदस्तीने व दमदाटीने सरकारला निर्णय रेटता येणार नाही, हे सिद्ध झालं आहे. मुख्यमंत्र्यांनी आज चर्चेला बोलावलं, दोन दिवसात निर्णय देण्याचं त्यांनी मान्य केलं आहे. त्यावर विश्वास ठेवूया. आपली अशीच एकजुट अभेद्य ठेवून लढूया, जिंकूया!

Wednesday, 19 July 2017

पहिल्या दहशतवाद्याला रोखणारा हात हरपला



३० जानेवारी १९४८ ला नथुरामने दिल्लीत महात्म्यावर गोळ्या चालवल्या. त्यादिवशी तिथे भिलारे गुरुजी नव्हते. अन्यथा गांधीजींचे प्राण वाचले असते. त्याआधी जुलै १९४४ मध्ये महात्माजींवरती भर गर्दीत हातात जांबिया घेऊन एका माथेफिरुने हल्ला केला होता. तो माथेफिरु दुसरा, तिसरा कुणी नव्हता, नथुराम गोडसेच होता. पण एका जेमतेम पंचवीशीतल्या तरुणाने नथुरामचा हात पकडला आणि त्याला चांगलं बदडून काढलं. गांधीजींनीच त्याला माफ कर म्हणून सांगितलं. म्हणून नथुराम त्या दिवशी सुटला. भारतातल्या त्या पहिल्या दहशतवाद्याला रोखणारा तो हात आज हरपला आहे. 

भि. दा. भिलारे ऊर्फ भिलारे गुरुजी यांच्या जाण्याने फॅसिझम आणि आतंकवाद यांच्या विरोधात लढणारा महाराष्ट्रातला पहिला स्वातंत्र्यसेनानी काळाच्या पडद्याआड गेला आहे. ९८ वर्षांचं समृद्ध जीवन आणि जिवंतपणी दंतकथा बनलेले भिलारे गुरुजी त्यांच्या वृद्धापकाळाने गेले आहेत. पण नथुरामी शक्ती पुन्हा वाढत असताना गुरुजींचं जाणं चटका लावणारं आहे. नथुरामाला रोखणारे त्यांचे हात फॅसिझम आणि आतंकवादाच्या विरोधात लढणाऱ्यांना सदैव प्रेरणा देत राहतील. 

भि. दा. भिलारे ऊर्फ भिलारे गुरुजींना विनम्र श्रद्धांजली!

- आमदार कपिल पाटील
प्रदेश अध्यक्ष, जनता दल युनायटेड, महाराष्ट्र प्रदेश