Saturday 4 April 2020

कोरोनानंतर कोरोनापेक्षा भीषण


कोरोनाच्या प्रसाराशी सगळं जग एकजुटीने लढतं आहे. देश, भाषा, प्रांत, धर्म सगळ्यांच्याच भिंती पडून गेल्या आहेत. कोरोनाने कोणालाच सोडलेलं नाही. एरव्ही संकटात ज्यांचा आधार असतो त्या देवांची घरंही बंद आहेत. डॉ. श्रीराम लागू म्हणायचे, 'देवाला रिटायर करा'. खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मुखपत्रातच लिहून टाकलं, 'मक्केपासून शिर्डी, सिद्धिविनायक पर्यंत सर्वत्र सन्नाटा पसरला आहे. माणसांवर येणाऱ्या प्रत्येक संकट प्रसंगी ईश्वर सर्वप्रथम मैदान सोडून जातो. कोरोनामुळे धर्म, ईश्वर सगळेच निरुपयोगी झाले आहेत.' खरंच सगळेच देव आणि सगळेच धर्म कडी कुलपात गेले आहेत. त्यापैकी कुणाचंही चालत नाहीय. अगदी तबलिग मरकजच्या मौलाना साद यांनीही शेवटी म्हटलं, 'घरीच थांबा. सरकारचं ऐका.' 

आधुनिक विज्ञानाशिवाय या संकटावर मात करता येणार नाही, हे आता कळून चुकलं आहे. गोमूत्राची पार्टी करणाऱ्यांनीही आता यज्ञ थांबवले आहेत. आचरटपणा फक्त दिल्लीच्या निजामुद्दीनलाच झाला असं नाही.  अयोध्येत यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही जाऊन आले. कनिकाच्या पार्टीला सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी गर्दी केली होती. शिवराज चौहानांचा शपथविधी होईपर्यंत राष्ट्रीय लॉकडाऊनही थांबलं होतं. आजारापेक्षा राजकारण अधिक प्रभावी असतं आणि धर्म तर निरंतर चालणारं राजकारण असतं. दिल्लीतून लाखो मजुरांचे तांडे रस्त्यावर आले तेव्हा केंद्र सरकार अडचणीत आलं. पण तबलिग मरकजच्या नावाने हिंदू मुसलमान करण्याचा सोपा रस्ता त्यांनी शोधला. हे आपल्या देशातच होऊ शकतं असं मानण्याचं कारण नाही. जगभर तो खेळ गेल्या काही वर्षात आपण पाहतो आहोत. तबलिगच्या मौलाना सादचं कुणी समर्थन करणार नाही. पण तिथे इतके परदेशी लोक आले आहेत हे खुद्द तबलिगनेच 21 तारखेला सरकारला कळवलं होतं. पण शिवराज चौहान यांचा शपथविधी व्हायचा होता. आणि लॉकडाऊनमुळे उद्भवणाऱ्या असंतोषावर हिंदू मुसलमान करण्याचा जालीम उपाय त्यांना करायचा होता. तसं नसतं तर अजित डोवाल इतक्या उशिरा मरकजला गेले नसते.

सामान्य माणसाला हा खेळ कळतो आहे. रोगाच्या लागणाची जोखीम, सार्वजनिक भय, थांबलेला रोजगार, घरात संपलेला किराणा हे सारं असतानाही लोक एकमेकांची मदत करताहेत. माणुसकी जिवंत आहे. डॉक्टर, नर्सेस आणि सफाई कामगार ज्या पद्धतीने लढताहेत त्याला तोड नाही. पोलीस कर्मचारी, अत्यावश्यक सेवा देणारे सर्वच कर्मचारी आणि एसटी, बीएसटीचे ड्रायव्हर, कंडक्टर यांचंही कौतुक केलं पाहिजे. 

इतर कर्मचारी जे प्रत्यक्ष मैदानात नाहीत आणि सरकारच्याच आदेशाने घरात बंद आहेत तेही तक्रार करत नाहीयेत. पगार टप्प्यात मिळणार आहे, पण तो निर्णय इतका उशीरा झाला की पगार कधी मिळेल याची चिंता आहे. तरीही लोक तक्रार करत नाहीयेत. महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीने कोरोनाशी लढतं आहे, त्याला लोक दाद देत आहेत. म्हणूनच तक्रार करत नाहीयेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री अनिल देशमुख आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचं टीम वर्क पहायला मिळतं आहे. अधिकारी म्हणून मुंबई मनपा आयुक्त प्रवीण परदेशी, गृहसचिव संजय कुमार, प्रधान सचिव भूषण गगराणी, आरोग्य संचालक तात्याराव लहाने, डॉ. पल्लवी सापळे, पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या कामालाही दाद दिली पाहिजे. 

परवा विनाअनुदानित शाळेतील एक शिक्षक गुलाबचंद पाल यांचा फोन आला, मागच्या सरकारने लावलेल्या चौकशी मधील 2012 मधील शिक्षकांपैकी एका शिक्षिकेचा फोन आला त्यांच्यापर्यंत शिक्षक भारतीचे कार्यकर्ते मदत पोचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

पण मला कौतुक वाटतंय छात्र भारती विद्यार्थी संघटनेचा मुंबई अध्यक्ष रोहीत ढाले याचं. राष्ट्र सेवा दलाचे महासचिव अतुल देशमुख यांच्यामुळे सेवादलाच्या कामाशी जोडले गेलेले भायखळ्यातील एक उद्योजक फारुख भाई शेख, शमशाद शेख तसेच इतर काही उद्योजक यांच्या मदतीने कोरोनामुळे संकटात सापडलेल्या शेकडो कामगारांपर्यंत रोहीत ढालेने मदत पोचवली आहे. अतुल देशमुख, फारूख शेख, शमशाद शेख, रोहीत ढाले, विकास पटेकर, विशाल कदम, निलेश झेंडे, जितेश किर्दकुडे यांनी गेल्या आठ दिवसात शेकडो नाही काही हजार स्थलांतरित कामगारांना निकडीची मदत केली. शिधा आणि थोडं सामान पोचवलं. पुढचे पंधरा दिवस काही नसलं तरी त्यांना चालू शकेल. एका बाजूला महाराष्ट्रातील सरकार बद्दल वाटणारा विश्वास आणि दुसऱ्या बाजूला फारूक शेख यांच्या सारखे दानशूर कार्यकर्ते यांच्यामुळे मुंबईतील बिहारी आणि यूपीच्या कामगारांनी दिल्लीसारखं पलायन केलं नाही. लोक इथेच थांबले. छोट्या मोठ्या उद्योगात काम करणाऱ्या या कामगारांना त्यांच्या मालकांनी आपापल्या फॅक्टरीतच आश्रय दिला म्हणून हे शक्य झालं. 

डॉ. गणेश देवी यांच्यामुळे राष्ट्र सेवा दलाचा विस्तार गेल्या आठ नऊ महिन्यात वेगाने झाला आहे. ती सगळी यंत्रणा यावेळी कामाला लागली आहे. 

अतुल देशमुख लॉकडाऊनच्या वेळेला पुण्याहून नागपूरला जात होते. पण तिथून त्यांना देशभरातील किमान 40 ते 50 ठिकाणांहून फोन आले असते. बिहार विधानसभेचे माजी अध्यक्ष उदय नारायण चौधरी, तन्वीर आलम अनेकांचे. त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक ठिकाणी सुरत, अहमदाबाद, वलसाड, वापी, हैद्राबाद, मुंबई, पुणे, नागपूर प्रत्येक ठिकाणी मदत पोचवण्याचं किंवा कुणाची तरी गाठ घालून देण्याचं काम अतुल देशमुख यांनी सेवादल यंत्रणेमार्फत केलं. 

वलसाड येथे सेवा दल राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य रेखा चौधरी, त्यांच्या सहकारी शितल पटेल यांनी ३२ कामगारांना मदतीचा हात दिला. तर सेवा दल राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य दक्षिण छारा यांनी अहमदाबाद येथे ५ बिहारी कुटुंबाना मदत केली. बिहार, उत्तरप्रदेशसह देशभर ठिकठिकाणी सेवा दलाचे कार्यकर्ते आपापल्या परिने गरजूंना मदत करत आहेत. 

पुण्यात राकेश नेवासकर, दत्ता पाखिरे, साधना शिंदे, छात्र भारतीचे अध्यक्ष रवींद्र मेढे यांनी आपल्या गावी परतू न शकलेल्या पुण्यातील विद्यार्थ्यांना हुडकून काढलं. त्या 50 ते 60 विद्यार्थ्यांना सेवा दलाच्या मुख्य कार्यालयातून साने गुरुजी स्मारकावरून रोज सकाळ, संध्याकाळ टिफिन जात आहे. मुलं हॉस्टेलला एकटी आहेत. खानावळी बंद आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट चालू नाहीत. हातातला शिधा संपला आहे. त्या विद्यार्थ्यांना सेवादल आणि छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांनी मोठा दिलासा दिला. 

वर्ध्याला नितेश पाटील आणि सोमनाथ अविनाश सोमनाथे यांनी कामगारांना धान्य वाटप केले. मिरजला सदाभाऊ मगदूम यांनी रक्तदानाचा उपक्रम राबवला. 

सेवा दलाच्या पूर्ण वेळ कार्यकर्त्या जयश्रीताई माजलगावकर या स्वतः रोज १५ मास्क शिवून सेवादल सैनिक त्याचे विनामूल्य वाटप करत आहेत.

मुंबईत माटुंग्याच्या श्रीसुंदर हॉटेलचे सच्चिदानंद शेट्टी हे विचाराने समाजवादी आहेत. सेवादलाचे आहेत. ते रोज रोटी बँक आणि इतर उपक्रमांनी जोडून एक हजार लोकांना जेवण पुरवत आहेत.

मालाड मालवणी येथे सुरेश कांबळे, प्रकाश चव्हाण आणि गोरेगाव येथे दीपक सोनवणे त्याच्या टीमसह मदत कार्य करत आहेत.

छात्र भारती मुंबई विद्यापीठ अध्यक्ष श्रीधर पेडणेकर आणि राज्य संघटक सचिन बनसोडे यांनी मुंबई विद्यापीठातील कॅन्टीन सुरू ठेवायला भाग पाडलं. त्यामुळे अडकलेले विद्यार्थी आणि कर्मचारी यांची मोठी सोय झाली.

सचिन बनसोडे यांने लॉकडाऊननंतर सगळ्या महानगरांमधील हॉस्टेलमध्ये अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा पुरवण्याच्या मागणीला खुद्द सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिसाद देत व्यवस्था केली. 

पुण्याच्या निलेश निंबाळकर आणि महेश बडे यांनी स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला. 

संगमनेर आणि अकोलेच्या काही भागात छात्र भारतीचा माजी अध्यक्ष दत्ता ढगे याने शिव आर्मी संघटनेच्या माध्यमातून लोकांचे जिन्नस घरपोच पोचण्याची सेवा राबवत आहेत.

धुळे, मालेगाव, नाशिक, पनवेल, बुलढाणा, सोलापूर, चंद्रपुर, गोंदिया सहीत राज्यभर सेवादल सैनिक गरजवंतांना मदतीचा हात देत आहेत. 

एकूण संकटाच्या तुलनेत हे सगळं काम कदाचित लहान वाटेल पण मुंबईत रोहीत ढाले आणि फारुख शेख आणि मुंबई बाहेर अतुल देशमुख यांनी सेवादल कार्यकर्त्यांच्या मार्फत निर्माण केलेली साखळी मी गेले काही दिवस पाहतो आहे. त्यांना मदत करतो आहे. या तरुण मित्रांनी थक्क करणारं काम केलं आहे. 

अंजलीताई आंबेडकर, सुरेखाताई दळवी, डॉ. झहीर काझी आपापल्या कार्यप्रांतात मोठं काम करत आहेत. झेलमताई परांजपे यांचाही आपलं घर साठी जीव तुटतो आहे.

कोरोनात एक बरं झालं असंख्य पुरुष आपापल्या घरी पत्नीला मदत करत आहेत. मुलांशी चक्क बोलत आहेत.

कोरोनानंतर जग बदलणार आहे. डोक्यावरचं आकाश साफ झालं आहे. ओझोनचा थर सुधारतो आहे. अनेक देशांमधलं प्रदूषण शून्यावर येत आहे. पण या आकाशाखाली जमिनीवरच्या माणसाचं पुढचं आयुष्य खूप कठीण असणार आहे. कोरोनाच्यामागे  जैविक युद्धाचं राजकारण आहे की नाही? हे नंतर कळेल. पण एक जबरदस्त जागतिक मंदीला जगातल्या माणसांना तोंड द्यावं लागणार आहे. करोडोंचे रोजगार गेलेले असणार आहेत, महागाई वाढलेली असेल आणि हातात पैसा नसेल. राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांना चिंता सतावतेय की या बदललेल्या जगात शोषणाच्या नव्या पद्धती विकसित होतील? संपवलेल्या अस्पृश्यतेला सोशल डिस्टन्सींगच्या नावाखाली नव्या समूहांच्या बाबत नवी अस्पृश्यता उद्धभवेल काय? 

कोरोनाशी युद्ध संपेल तेव्हा महामंदीशी, बेरोजगारीशी, आर्थिक अरिष्टाशी, बदललेल्या सामाजिक संबंधांशी झुंजावं लागणार आहे. कदाचित हे संकट कोरोनापेक्षा भीषण असेल. त्याच्याशी करावी लागणारी झुंज प्रदिर्घ काळची असेल.

या आपत्ती काळात ज्यांना मदत करायची आहे त्यांनी खालील A/c वर आपली देणगी पाठवावी, ही विनंती.

A/C Name: Rashtra Seva Dal Organisation, 
Bank : Union Bank of India 
A/C No. : 360002010210993,
IFSC : UBIN0536008,

Branch : Navi Peth, Pune -30

कार्यकारी विश्वस्त, राष्ट्र सेवा दल

4 comments:

  1. सर्वांच्या कार्याला सलाम..माणुसकी जपली..

    ReplyDelete
  2. आभाळाची आम्ही लेकरे.......

    ReplyDelete
  3. या संकट काळात खूप जबरदस्त काम. सर खरच चिंता भेडसावतेय की या आर्थिक मंदी ला आपण कसे सामोरे जाणार आहोत.

    ReplyDelete
  4. Go palan ani Sheti Karun it's very necessary ...to develop agricultural land

    ReplyDelete