Friday 31 July 2020

बडा कब्रस्थान, हिंदू समशान


मरकजच्या नावाने किती बोंब मारली गेली. संशयाचं किटाळ तर आपल्या मनातही जमा झालं होतं. 

अहमदाबादची ट्रम्प यात्रा मागे कोरोना ठेवून गेली, पण ते झाकण्यात आलं. 

दाढीवाल्यांच्या नावाने शिमगा करण्यात तर ते सराईतच आहेत. 

पण कोविडग्रस्त हिंदू प्रेतांवर अंतिम संस्कार करायला कुटुंबातले धजत नव्हते, तेव्हा मुंबईतल्या प्रसिद्ध बडा कब्रस्थान मधले मुसलमान पुढे आले. एक नाही, दोन नाही 300 पेक्षा जास्त हिंदू प्रेतांवर त्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी शेवटचे संस्कार केले. अगदी हिंदू पद्धतीने. गळ्यात तुळशीची माळ घालून. व्यवस्थित तिरडी बांधून. चिता रचून. छिद्र असलेल्या मडक्यातून पाण्याची धार वाहत, प्रदक्षिणा घालत. नंतर पालिकेच्या प्रोटोकॉल नुसार विद्युत वाहिनीवर. भडाग्नी दिला. मंत्राग्नी दिला. मोबाईल वरून Whatsapp Video Call लावत सगळे अंतिम संस्कार त्यांच्या कुटुंबियांना दाखवले. अगदी काहींनी विनंती केली तर अस्थी विसर्जनही केलं. ज्यांनी मागितल्या त्यांच्या घरी अस्थी पोचवल्या. त्यासाठी एक पैसाही आकारला नाही. उलट भटजीला दान दक्षिणा दिली. अंतर ठेवून भटजी सूचना देत होता. आणि नमाजी टोपीधारी मुसलमान हिंदू मंत्र बोलत शेवटचा अग्नी देत होते. 

कुपर हॉस्पिटल मधील पहिलं हिंदू प्रेत घेऊन टिपिकल मुसलमानी पेहरावातील ते सहा जण ओशिवऱ्याच्या स्मशातभूमीत पहिल्यांदा पोचले तेव्हा, स्मशानातले कर्मचारी घाबरले होते. पण त्यांच्याकडे बाकायदा मृत्यूचं सर्टिफिकेट होतं. हॉस्पिटलचं पत्र होतं आणि कुटुंबियांचा व्हिडीओ मेसेज होता. स्मशानभूमीतले कर्मचारी तयार झाले. पहिल्या दिवशी त्या मुस्लिम कार्यकर्त्यांची नवागतासारखी अडचण जरूर झाली. पण माहिती घेत त्यांनी तो अंतिम संस्कार पार पाडला. 

हिंदूंमध्ये सुद्धा एक प्रथा नाही, अनेक प्रथा आहेत. कुटुंबियांनी सांगितलं तसं प्रत्येक प्रथेचं पालन त्यांनी केलं. एका कुटुंबात तर मुलगीच होती. नातेवाईक कोणी यायला तयार नव्हते. इक्बाल ममदानी त्या मुलीला घेऊन बाणगंगेवर गेले. श्रीराम दंडकारण्यात असताना इथे येऊन गेल्याची कथा प्रचलित आहे. त्यांच्या बाणानेच इथे गंगा अवतरली अशी दंतकथा आहे. त्या बाणगंगेवर इक्बाल भाईंनी त्या मुलीच्या वडिलांचं अस्थी विसर्जन विधीवत केलं. 

महिन्यापूर्वी उत्तर प्रदेशात कानपूर जवळच्या एका गावात एक हिंदू म्हातारा गेला. तेव्हा त्याची प्रेत यात्रा खांद्यावर घेत आणि हातात अग्नीचं मडक घेत, राम नाम सत्य है चा जप करत मुसलमानांनी त्यांची अंत्ययात्रा काढली. कारण लॉकडाऊनमुळे त्यांचे कोणतेच नातेवाईक येऊ शकत नव्हते. गावात सगळे मुसलमान, एकच घर हिंदूंचं होतं. त्या घरातले सगळे दूर शहरात नोकरीला गेलेले. म्हाताऱ्याला शेजारचे मुसलमानच सांभाळत होते. पण अंतिम संस्कार कसा करायचा? हा प्रश्न होता. नातेवाईकांनी सांगितलं तुम्हीच करा. मुस्लिम तरुण जमले आणि त्यांनी पुढचे सोपस्कार पार पाडले. राम नाम सत्य है, असा त्यांचा ध्वनी त्या व्हिडीओत तुम्ही पाहिलाही असेल. पण राम नाम सत्य है, असा 300 प्रेतांच्या अंतिम संस्कारात तोच प्रतिध्वनी मुंबईत ऐकू येत होता. कारण जवळ असूनही कोरोनाग्रस्त प्रेताला हात कोण लावणार? 

जळगावला एक शिक्षक कोरोनामुळे गेले. त्यांचे अंतिम संस्कार करायला, खांदा द्यायला कुणीही आलं नाही. सगळे लांबून पाहत होते. त्यांच्या मुलाने आपल्या वडिलांचं प्रेत एकट्याने खांद्यावर नेलं. सरणावर कसं चढवलं असेल ते त्यालाच माहीत.

पण इक्बाल ममदानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मागे उभे राहिले ते बडा कब्रस्थानचे चेअरमन शोहेब खतीब. अनेकांसाठी तर त्यांनी कब्रस्थानची जागाच उपलब्ध करून दिली. हिंदूंचा अंतिम संस्कार करताना आपला धर्म बाटतो असा विचार सुद्धा त्यांना शिवला नाही. फक्त हिंदूंचीच नाही तर काही पारशी आणि ख्रिस्ती बांधवांच्या प्रेतांचीही त्यांनी त्यांच्या त्यांच्या धर्म संस्कारानुसार विल्हेवाट लावली. पारशी बांधवांचे रीतिरिवाज वेगळे. ख्रिस्ती बांधवांचे रीतिरिवाज वेगळे. पण सगळेच सोपस्कार त्यांच्या त्यांच्या धर्माप्रमाणे खतीब आणि ममदानी यांच्या टीमने पार पाडले.

इक्बाल ममदानी सांगत होते, आम्ही मुस्लिम प्रेतांची विल्हेवाट लावत होतो. त्यांचा विधीवत दफनविधी करत होतो. तेव्हा लक्षात आलं शवागरात अनेक प्रेतं पडून आहेत. आम्ही डॉक्टरांना विचारलं. तर ते म्हणाले, ही हिंदूंची प्रेतं आहेत. कुणीच घ्यायला यायला तयार नाही. महापालिकेचा स्टाफही आता कमी पडतोय. 

ममदानींनी त्यांना विचारलं, आम्ही हे केलं तर चालेल का? आम्ही त्यांच्या पद्धतीने करू. डॉक्टर म्हणाले, याहून काय चांगली गोष्ट आहे. फक्त रितसर परवानग्या काढू. मग तुम्ही हे करा. 

त्या सगळ्या परवानग्या मिळाल्या नंतर एप्रिल, मे, जून आणि आता जुलै चार महिने अव्याहतपणे ही टीम काम करतेय. या टीममध्ये आहेत दोनशे तरुण. पण ज्यांनी सुरवात केली त्या पहिल्या सात जणांची नावं मला तर आवर्जून सांगितलीच पाहिजेत. बडा कब्रस्थानचे चेअरमन शोहेब खतीब, वरिष्ठ पत्रकार इक्बाल ममदानी, उद्योजक शाबीर निर्बन, अ‍ॅड. इरफान शेख, उद्योजक सलीम पारेख, उद्योजक सोहेल शेख, सामाजिक कार्यकर्ते रफिक सुरतीया. आजतागायत हे लोक त्याच कामात आहेत. सुरवातीला अडचण आली Ambulance ची, शववहिनीची. कोविडग्रस्तांसाठी नातेवाईक येत नाही तर Ambulance कुठून मिळणार. ममदानी आणि खतीब यांनी मग नादुरुस्त, पडून राहिलेल्या Ambulance शोधून काढल्या. त्या दुरुस्त केल्या. आता त्या अखंडपणे काम करताहेत. या कामासाठी बडा कब्रस्थान खतीब भाई, इक्बाल भाई आणि त्यांची सगळी टीम एक रुपया घेत नाहीत. सगळा खर्च ते स्वतः उभा करतात. काही दानशूरांनी त्यांना मदत केली आहे. पण नातेवाईकांकडून ते एक पैसा घेत नाहीत. लॉकडाऊनमुळे लोक आधीच आर्थिक संकटात आहेत. शेवटचा संस्कार करायला त्यांच्याकडे कसे पैसे मागायचे? असा इक्बाल भाईंचा सवाल आहे.

इक्बाल भाई, त्यांचे सहकारी आणि या कामात जोडले गेलेले 200 मुस्लिम तरुण आपल्या कुटुंबाची पर्वा न करता काम करत आहेत. त्यांची गळाभेट घ्यावी, असं तुम्हालाही नक्कीच वाटत असेल. 

देशात द्वेषाचा विखार पसरवणारे, हिंदू - मुसलमान हिंदू - मुसलमान करणारे, Whatsapp वरती घाणेरड्या भाषेत उद्धार करणारे, गोडसेवाद्यांची जमात काही कमी नाही. आपल्या डोळ्यावरची आंधळी पट्टी कधी ते काढतील का? द्वेषानं भरलेलं पित्त कधी ओकून बाहेर फेकतील का? मोकळ्या मनाने कधी ममदानी, खतीब आणि त्यांच्या सहकाऱ्यांची गळा भेट घेतील का? या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी यावं ही भाबडी आशा असेल कदाचित. उम्मीद का सोडायची?

(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य, राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)

63 comments:

  1. सर आपल्या देशाची हीच खरी संस्कृती आहे . आपल्यासारखे विचारवंत जोपर्यंत आपल्या देशात आहेत या आमच्या मातृभूमीला कुणीही धक्का लावू शकत नाही. आपला समाज एक आहे आणि एकच राहणार. आपल्या लेखणीला आपल्या विचाराला आमचा सलाम

    ReplyDelete
  2. हाच खरा भारत आहे.

    ReplyDelete
  3. We all proud of this greatness

    ReplyDelete
  4. हीच खरी इस्लामची शिकवण आहे!

    ReplyDelete
  5. This is a great huminity sir..It's demand of a human being..so we proud of them ..

    ReplyDelete
  6. यांच्या या कार्याला सलाम..मानाचा मूजरा..

    ReplyDelete
  7. खूपच छान कार्य,कोणताही भेद भाव मनात न ठेवता केलेल्या कार्याला आमचा कोटी कोटी सलाम

    ReplyDelete
  8. खूपच छान कार्य,कोणताही भेद भाव मनात न ठेवता केलेल्या कार्याला आमचा कोटी कोटी सलाम

    ReplyDelete
  9. त्यांच्या कार्याला झळाळी आपल्यासारख्या नेत्यांनी दिली खरच आपलं सुद्धा अभिनंदन

    त्या देवदूतांचा आदर्श आपल्या समाजाने आणि आपण नक्की घ्यायला हवा.

    सलाम त्यांच्या कार्याला

    ReplyDelete
  10. मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना हिंदी है हम हिंदोस्ता हमारा

    ReplyDelete
  11. मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना हिंदी है हम हिंदोस्ता हमारा

    ReplyDelete
  12. हीचतर खरी, सच्या हिंदुस्थानी मुसलमान ची ओळख आहे
    .मझ्या ह्या हिंदुस्थानी मुस्लिम बंधूंना ,माझ्याकडून व माझ्या परिवार कडून शतश प्रणाम ,,, शुभं भवतु ..

    ReplyDelete
  13. इन लोगो का नाम इतिहास के सुनहरे पन्नो में लिखा जायेगा। इन लोगो का काम मानवता का सही पाठ पढाता हैं।

    ReplyDelete
  14. सलाम बडा कब्रस्तान च्या मानवतावादी कार्याला.

    ReplyDelete
  15. धर्मांधळे पणाची पट्टी लोकांच्या डोळ्यावरून निघणे आवश्यक आहे

    ReplyDelete
  16. Sanjay Suryawanshi
    या कामाची दखल भारतीय मेडिया घेवू शकत नाही म्हणून मी चैनल मेडियाचा जाहिर निषेध करतो आपल्या देशात धर्मा धर्मात द्वेष पसरविणाऱ्या अनेक घटकांच्या कानफटीत बसणारी ही सणसनीत चपराक आहे

    ReplyDelete
  17. त्यांनी सिध्द केले कि मानवता हाच खरा धर्म आहे।
    असी मानवतावादी मानसिकता ला प्रोत्साहित केलाच पाहिजे.
    Great Salaam to All these Warriors.

    ReplyDelete
  18. मानवता धर्मा पेक्षा कोणताच धर्म नाही
    जगाला बडा कब्रस्तान नी दाखवून दिलं की आमचं रक्त एक आहे same गोष्ट plasma doner ची आहे हिंदू चं plasma मुस्लिम ला मुस्लीम चा plasma हिंदूला


    Service ForHumanity is Great

    ReplyDelete
  19. Feeling very very proud Iqbal mamdani is my class mate!
    Allaha Iqbal bhai ko behtarin badla ataa kare....

    ReplyDelete
  20. We are proud & salam jai hind

    ReplyDelete
  21. We are proud & salam jai hind

    ReplyDelete
  22. सर अप्रतिम लिहिलंत आपण.समाजात अराजकता पसरविणा-या
    समाजविघातक प्रवृत्तीच्या लोकांनीच हिंदू-मुस्लिम, हिंदू-मुस्लिम वाद सहेतूक निर्माण करून आपली पोळी शेकण्याचा प्रयत्न केला आहे.स्वातंत्र्यासाठी हिंदू-मुस्लिम,शिख,इसाई सगळेच एकत्र आले होते.आहेत आणि राहतील.आपण सारे भारत मातेची लेकरं आहोत.आता तर हिंदूंची केलेली सेवा,मदत पाहून आम्हा हिंदू बांधवांचं ऊर भरून यायलाच पाहिजे आणि मुस्लिम बांधवांना प्रांजळ मनानं सलाम केला पाहिजे.आणि त्यांनी केलेल्या सेवेतून काहीतरी बोध घ्यायला पाहिजे.

    प्रा. संजय तिजारे,नागपूर

    ReplyDelete
    Replies
    1. खूप छान प्रतिक्रिया!

      Delete
  23. ना हिंदू ना मुसलमान, मानवतेचा एकच धर्म महान.

    ReplyDelete
  24. फारच सुंदर असा लेख

    ReplyDelete
  25. बडा कब्रस्तान वाल्यांनी जे केले तो इस्लाम ची शिकवण
    आहे मी पाटील सरांना सलाम करतो की आपल्या मुळे हे कार्य सर्वांना माहीत झाले

    ReplyDelete
  26. सलाम या सगळ्या मुस्लिम बांधवांच्या कार्य कर्तृत्वाला...
    शब्द अपुरे पडतात असे काम करणाऱ्यांचा गौरव करायला.🌹🌹

    ReplyDelete
  27. सर, आधी त्या मानवतावादी कार्यकर्तयांना सलाम व तेवढेच तुम्हाला सलाम तुम्ही आमच्या व जगासमोर सत्य आणले धन्यवाद!!

    ReplyDelete
  28. Super work and great Humanity

    ReplyDelete
  29. राष्ट्रीय ऐक्याच्या या कार्याला आपल्या ब्लॉग मधून पुन्हा प्रसिद्धी दिली त्याबद्दल शतशः आभार. धन्यवाद सर.

    ReplyDelete
  30. Great work by team of bada kabrastan. Salute

    ReplyDelete
  31. खरी मानवता माणसांत आहे धर्मात
    नाही हे अजूनही काही माणसांना
    कळलेले नाही. 🙏🙏🌹🌹🌹

    ReplyDelete
  32. अतिशय सुंदर कार्य हिंदू मुस्लिम भाई भाई

    ReplyDelete
  33. Great work.
    या मुस्लिम बांधवांच्या कामामुळे धर्माचे राजकारण करणा-यांना दु:ख होत असेल.
    Salute to them.

    ReplyDelete
  34. हम सब एक है यावरून आपण जगाला दाखवून दिले

    ReplyDelete
  35. Really humanitarian and excellent work, appreciated by us all. Well done 👏

    ReplyDelete
  36. पाटील साहेब,
    आपल्या मुसलमान बांधवांनी कोरोनाच्या भितीदायक काळात दाखवलेली सर्वधर्मीय वृत्ती आणि खुद्द हिंदूंचे शवदहन त्यांच्या धार्मिक प्रथेनुसार केलेले पाहून मी अचंबित झालो आहे. तसेच त्यांचे हे अद्वितीय कार्य आपल्या लेखाद्वारे आपण जगासमोर आणल्याबद्दल तुम्हालादेखील धन्यवाद!
    वास्तविक अशा प्रकारची सेवा ख्रिस्ती मिशनऱ्यांनी कुठे केलेली दिसत नाही. अन्नधान्य वाटण्याची थोडीशी सेवा अंग सांभाळून केली आहे; परंतु प्रत्यक्षात शव उचलून त्यांची त्या त्या धर्माच्या विधीनुसार दफन किंवा दहन केल्याचे ऐकिवात नाही. उलट काही मिशनऱ्यांनी तर त्यांचे ख्रिस्ती श्रद्धा व त्यांची शहरे परस्पर हॉस्पिटलने त्यांच्याच ख्रिस्ती श्रद्धावंतांचे परस्पर दहन करावे, असे निर्णय घेतले आहेत! अजुन वेळ गेली नाही किंबहुना ती अधिक बिकट बनत चालले आहे तेव्हा ह्या मुसलमान बांधवांचा आदर्श सर्वच धर्मीयांनी गिरवावा अशी अपेक्षा करतो.
    आपला
    फादर मायकल जी., वसई

    ReplyDelete
  37. त्यांच्या सत्कार्याला मनापासून सलाम!!!

    ReplyDelete
  38. Great work thank you very much to all

    ReplyDelete
  39. सर्व मुस्लिम बांधवांचे मनस्वी आभार, हिंदु मुस्लीम भाई भाई

    ReplyDelete
  40. पाटील साहेब प्रथम सलाम करतो त्या मुस्लिम समाजातील तरुणांना त्यांनी दाखवून दिले की वेळ आली की जात धर्म नाहीसा होतो आणि साहेब सत्य परिस्थिती समोर आणली तुम्ही व तुमच्या लेखणीलाही सलाम

    ReplyDelete
  41. यह तो है हमारा प्यारा भारत

    ReplyDelete
  42. याला फक्त ग्रेट हाच शब्द योग्य ठरेल. हे खरे म्हणजे सरसकट सर्व हिंदू धर्मियांच्या घराघरात पोहोचवले पाहिजे. जे मुस्लिमद्वेष्ट्या संघाच्या खोट्या प्रचाराला बळी पडलेत त्यांचे डोळे उघडले तर उघडले. हिंदू-मुस्लिम अशी दुफळी देशाला रसातळाला घेऊन जाईल.आणि जे ही कृष्णकृत्ये करतात ते सगळ्यात मोठे देशद्रोही आहेत. त्यांनी इंग्रजाकरता फितुरी, हेरगिरी केली होती व आत्ताही ते देशाशी व सामान्य जनतेशी गद्दारीच करत आहेत. खरे तर सामान्य जनतेने यांना त्यांची जागा लवकरात लवकर दाखवून दिली पाहिजे.

    ReplyDelete
  43. खरच खूपच महान कार्य करत आहेत. याला तर तोड च नाही. आज कोरोना महामारीच्या काळात आपलेच परके झाले आहेत. सलाम तुमच्या या महान कार्याला..... हाच तर खरा भारत आहे...

    ReplyDelete
  44. नि:शब्द
    सलाम या बांधवांना
    जय हिंद
    जय महाराष्ट्र

    ReplyDelete
  45. हिंदू ,मुस्लीम ,शिख ,इसाई हम सब है भाई भाई हे सत्यात उतरवलेल्या सर्व बांधवांना सलाम

    ReplyDelete
  46. Great work and great thought spreading in public Kapil Patil saheS

    ReplyDelete
  47. बडा कब्रस्तानची पूर्ण टीम व लेखक कपिल पाटील यांना मनःपूर्वक धन्यवाद. खरं तर आपल्याकडे असे लेख अशी कार्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकांसमोर यायला हवेतच. माध्यमांनी या कामांना खूप मोठी प्रसिद्धी द्यायला हवी. ते जर देत नसतील तर आपल्यातील प्रत्येकाच हे काम आहे की आपण शक्य होईल तितक्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे काम पोहोचलं पाहिजे. आजची ती प्राधान्यक्रमाची गरज आहे.आपण सर्वांनी यात सहभाग घ्यायला हवा.
    साने गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे जगाला प्रेम करण्याचा खरा धर्म, मानवतेचा धर्म अंगीकारायला हवा. त्यासाठी यापुढील काळात प्रत्येकाचा वैयक्तिक धर्म ही बाब दिवसेंदिवस कमी महत्त्वाची होऊन मानवता हाच खरा धर्म व्हायला हवा. त्यासाठी आपण आपल्यातील विवेक कायम जागा ठेवून मानवता धर्माची मनामनात खरीखुरी प्रतिष्ठापना करायला हवी.

    ReplyDelete
  48. जाती धर्माचे दलाल जेव्हा लोक ओळखतील तेव्हाच खरा कुठे भारत तयार व्हायला सुरवात होईल.

    ReplyDelete
  49. पाटील सर माझा अस समज होता कि तुम्ही फक्त शिक्षकांच काम
    करता पण तुमच्या लिखाणातुन आसे आटते की तुम्ही सर्व धर्माच्या
    लोकांंनच काम करता तुमच्या विचाराचे चारच लोक असते तर तलवारीला न्यारेच धार असते आणाभाऊ साठे यांच्या विचारातुन
    मुस्लिम बांधव यांच्या टिमला सलाम करतो (व शिक्षकांंच्या जुन्या
    पेन्शन बाबत प्रयत्न करा हि विनंती करतो आम्ही तुमच्या सोबत आहोत धन्यवाद सर.

    ReplyDelete
  50. Great job
    My all Muslims friends
    God bless you always
    Eid mubarak

    ReplyDelete
  51. खुप छान कार्य🌹🌹

    ReplyDelete
  52. खरा तो एकचि धर्म। जगाला प्रेम अर्पावे।।

    पाटील सर आपले आणि बडा कब्रस्तानच्या पूर्ण टीम ला हार्दिक सदिच्छा आणि मनपूर्वक आभार ... आपल्या अशा अगणित उदाहरणातून आजच्या राजकीय सत्तासंघर्षात गुंरफटलेल्याना तसेच सगळ्यांना माणुसकीचा अर्थ नक्कीच कळला असावा आणि जगात कुठलाही भेदभाव न करता एकतेने आणि संविधान मार्गाने चालण्याचा संदेश मिळाला असावा अशी आशा आहे. पुनश्च अभिनंदन .... धन्यवाद!!!

    ReplyDelete
  53. खरा तो एकचि धर्म। जगाला प्रेम अर्पावे।।

    पाटील सर आपले आणि बडा कब्रस्तानच्या पूर्ण टीम ला हार्दिक सदिच्छा आणि मनपूर्वक आभार ... आपल्या अशा अगणित उदाहरणातून आजच्या राजकीय सत्तासंघर्षात गुंरफटलेल्याना तसेच सगळ्यांना माणुसकीचा अर्थ नक्कीच कळला असावा आणि जगात कुठलाही भेदभाव न करता एकतेने आणि संविधान मार्गाने चालण्याचा संदेश मिळाला असावा अशी आशा आहे. पुनश्च अभिनंदन .... धन्यवाद!!!

    ReplyDelete
  54. कपिल सर आपला ब्लॉग वाचून मन भरून आलं जातीय द्वेषाने होरपळलेल्या या देशांमध्ये अशी कुठेतरी हिरवळ बघून मनात आशा पल्लवीत होतात धन्यवाद आपले

    ReplyDelete
  55. Yes, The entire team of Bada Kabrastan doing great job, my humble thanks to this team.
    Thanks Kapil Patil for acknowledgement to this noble job and writing a nice article.

    ReplyDelete