Sunday, 25 April 2021

आपण काय करू शकतो?

शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे सर आणि मुंबई अध्यक्षा कल्पना शेंडे कोविडमुक्त होऊन घरी परतले. तेव्हा डॉ. राहुलचे आभार कसे मानू, असं मला झालं होतं. विजय आणि सिरत सातपुतेचा मुलगा अनिकेतही बरा झाल्याची बातमी त्यानेच सांगितली

कोविडची दुसरी लाट इतकी मोठी आहे की, सगळेच हतबल झाल्यासारखे वाटत आहे. पण या परिस्थितीत जिद्दीने आणि हिंमतीने देशभरातले आणि जगातले असंख्य कार्यकर्ते कोविड रुग्णांना मदत करताहेत. केंद्रातलं आणि महाराष्ट्रातलं सरकार या लढाईत कमी पडत असताना आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्त्यांचं लढणं किती कठीण आहे, हे लक्षात येतं. 

पाकिस्तान बरोबरच्या युद्धात एकट्याने समोरच्यांचे रणगाडे उद्ध्वस्त करून भारताला विजय मिळवून देण्यात ज्यांचा वाटा होता, त्या परमवीर चक्र विजेत्या अब्दुल हमीद यांच्या मुलाचे प्राण ऑक्सिजन उपलब्ध झाला नाही, म्हणून गेल्याची बातमी कानपूरहून आली आहे. 

राजधानी दिल्लीत ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून ४५ जणांचे प्राण गेले. नाशिकला ऑक्सिजन गळती झाली म्हणून २२ लोकांचे जीव गेले. विरारच्या दुर्घटनेत १५ लोक. 

कोविडची पहिली लाट ओसरली तेव्हाच जगभरच्या तज्ज्ञांनी दुसरी लाट मार्च, एप्रिल महिन्यात येणार असल्याचं भाकीत वर्तवलं होतं. हवामान खात्याच्या भाकितासारखं आपण या भाकिताकडेही दुर्लक्ष केलं. तसाही आपला कारभार वैज्ञानिक भाकितांपेक्षा ज्योतिष, पंचांगामधल्या भाकितांवर जास्त असतो. देश चालतो राम भरोसे. करोना काळात राम मंदिराची पायाभरणी झाल्याने कोरोना येणार नाही, असं आपण समजत होतो. कुठला मंत्र बोलल्यानंतर करोना पळून जातो त्याचं तत्वज्ञान 'प्रज्ञावान' ठाकूर बाई देशाला पाजत होत्या. अशा देशात आपला आणि आपल्या आप्तांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच सैनिक बनणं, याशिवाय उपाय राहिलेला नाही. 

परवा राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी या आपत्ती निवारणासाठी सेवा दल कार्यकर्त्यांनी काही करावं म्हणून देशव्यापी ऑनलाईन बैठक बोलावली होती. १३५ जण सामील झाले होते. ''केंद्र आणि राज्य सरकारं यांच्याकडून पुरेशी तयारी झाली नाही, हे अगदी स्पष्ट आहे. पण या स्थितीत सेवा दलातील सेवा हा शब्द व्यक्त करणारे उदार दायित्व स्वीकारून आपल्यापैकी प्रत्येकाने जबाबदारी घ्यायला हवी. पुढचे तीन महिने तरी वॉर फुटिंगवर काम करायला हवं.'' असं देवींनी आवाहन केलं. देवी सरांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत जे १३५ जण सामील झाले होते, त्यातले बहुतेकजण आधीच कामाला लागले आहेत. नागालँडचे चेन्नईथुनग हुमत्सो, जम्मू काश्मीरचे मोहमद फारूक, युपीचे सुनील यादव आणि रवींद्र  कुमार, बिहारची दीपप्रिया, एमपीचे तुकाराम आठ्या, जम्मूचे जुगनू भगत, कर्नाटकच्या राहत उन्निसा, अश्रफ अली, बंगालच्या झरना आचार्य, गुजरातचे दक्षिण छारा या सगळ्यांची हजेरी उत्साहवर्धक होती. महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती. पण त्यातल्या चार लोकांना सर्वांनी सलाम केला. त्यांच्याबद्दल लिहलं पाहिजे. 

अर्थातच बेलसरे सर, कल्पना शेंडे, सिरतचा मुलगा अनिकेत यांच्यासह अनेकांना बरं करणारा डॉ. राहुल घुले. राहुल मराठवाड्यातल्या भूम परांड्यातला. खेड्यातल्या शिक्षकाचा मुलगा. मुंबईत केईएमच्या मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर झाला. तेव्हा तो मुंबई छात्र भारतीचा अध्यक्ष होता. राज्यभरातल्या ओबीसी मेडिकोचंही संघटन त्याने बांधलं होतं. अलीकडच्या काळात त्याच्या 'वन रुपी क्लीनिक'ने जनप्रशस्ती मिळवली आहे. मुंबईच्या रेल्वे स्टेशन्सवर त्याने क्लीनिक सुरु केली. तेव्हा त्याला एका सतत बडबडणाऱ्या राजकीय नेत्याचा खूप त्रासही झाला. पण त्याने आपली कल्पना यशस्वी करून दाखवली. अखेर रेल्वेला ती स्वीकारावी लागली.

कोविडच्या काळात कल्याण, डोंबिवली आणि ठाण्यात त्याने चार तात्पुरती कोविड हॉस्पिटल्स उभी करून दाखवली. २५०० हुन अधिक बेड्स त्याची टीम सांभाळतेय. अर्थातच विनामूल्य उपचार होताहेत. त्याच्या व्यवस्थापन कौशल्याची दखल आघाडी सरकारमधील बहुतेक नेत्यांनी घेतली. अधिकाधिक जबाबदारी त्याने घ्यावी त्यासाठी ते आता मागे लागले आहेत.त्याचा त्याला तोटाही झाला. खणखणणारा फोन थांबेना. अर्थात म्हणून डॉ. राहुल थांबलेला नाही. 

दुसरं नाव आहे, आमची प्रतिभाताई शिंदे. अवघ्या महिन्यापूर्वी तर ती दिल्लीत महाराष्ट्रातून एक हजार महिला शेतकऱ्यांना घेऊन गेली होती. पंजाबच्या शेतकरी नेत्यांनी प्रतिभा शिंदेला आपल्या कोअर टीममध्ये सामावून घेतलं होतं. त्या लढाईत तिला तिच्या एका सहकारी कार्यकर्तीला गमवावंही लागलं. प्रतिभाताई नुसत्या हिंमतवान नाहीत. झुंजार लढवय्या आहेत. तितक्याच जिद्दी नेत्याही. अफाट संघटन आणि व्यवस्थापन कौशल्य महिला नेतृत्वामध्ये अभावाने आढळतं असा आपला समज आहे. प्रतिभाताईंनी तो खोटा पाडलाय.

साक्रीच्या एका सामान्य शेतकऱ्याच्या घरात जन्मलेली प्रतिभा शिंदे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा आवाज बनली आहे. खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात तिचं काम आहे. जळगावला १२८ बेड्सचं निःशुल्क कोविड हॉस्पिटल त्यांनी उभं केलंय. आजवर जवळपास २५० रुग्ण बरे होऊन घरी गेले. परवा त्यांच्याशी बोलताना त्या अर्ध्या डॉक्टर झाल्यासारख्या वाटल्या. पण फक्त जळगावचं हॉस्पिटल नाही, देशभरातले चळवळीतले कार्यकर्ते करोनाने ग्रस्त झाल्याची बातमी जर त्यांना कळली तर प्रतिभाताई त्यांना फोन करून मदतही उपलब्ध करून देत होत्या. गेल्या आठवड्यात संजीव पवार गेला. पण त्याच्यासाठी एक जीवरक्षक औषध मिळवून देण्यासाठी प्रतिभाताईंनी केलेली मदत विसरता येणार नाही. आणि एकट्या संजीवसाठी नाही अनेकांसाठी.

शेतकरी आणि आदिवासींच्या लढाईत
याहा मोगीचं किंवा कालीचं रौद्र रूप धारण करणाऱ्या प्रतिभाताईच्या हृदयात अपार माणुसकी भरलेली आहे. महामायेसारखी. 

तिसरं नाव आहे, आमच्या अनिकेत भैय्याचं. बाबूजी म्हणजे डॉ. द्वारकादास लोहिया आणि शैलाताई लोहिया यांच्या निधनानंतर 'मानवलोक'चं काही खरं नाही, असं उगाच काही बोलत होते. अनिकेत लोहियांनी त्या सगळ्यांना खोटं पाडलं आहे. अंबाजोगाईच्या मानवलोकचा विस्तार तर झाला आहेच. पण मधल्या काळात नळदुर्गच्या 'आपलं घर'ला सावरण्यासाठी अनिकेतने मोठी मदत केली. दुष्काळ निवारणात आणि पाणलोट विकासात अनिकेत लोहियाने बाबूजींचा वारसा, जे काम पुढे नेलं आहे, ते बीड जिल्ह्यात जाऊन प्रत्यक्ष पाहायला हवं. जमिनीवर पाय ठेऊन काम करणारा, अत्यंत निगर्वी, कार्यकर्त्यांविषयी ममत्व असलेला अनिकेत कामालाही तितकाच वाघ आहे.

मराठवाड्यात विशेषतः बीड जिल्ह्यात करोनाने हातपाय पसरले, तेव्हा अनिकेत लोहियांनी दोन कोविड सेंटर्स उभी केली. प्रशासनालाही मदत केली. ऑक्सिजन सुविधा असलेली ६०० हुन अधिक बेड्सची व्यवस्था हे त्याचं वैशिष्टयं. व्हेंटीलेटर्सही त्याने मिळवले. डॉक्टरांची टीम उभी केली. अनिकेत त्या भागात मोठाच आधार बनून गेला आहे. 

करोनाची पहिली लाट सुरु होती तेव्हा उत्तर प्रदेश आणि बिहारला पायी निघालेल्या मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक मधल्या मजुरांचे हाल पाहवत नव्हते. धुळ्याच्या हायवेवर डॉ. अभिनय दरवडेने दवाखानाच थाटला. डी हायड्रेट झालेल्या २८ हजार मजुरांना त्याने तपासलं. मोफत औषधं दिली. मुलांची काळजी कशी करायची ते सांगितलं. प्रशासनाच्या मदतीने त्यांचा पुढचा प्रवास सुकर कसा होईल, हेही पाहिलं. प्रत्येक कुटुंबाला भेळ भत्ताही बांधून दिला. धुळ्याचे भास्कर दरवडेंचा तो मुलगा. कैक दिवस हायवेच्या उन्हात तो दिवस रात्र उभा होता. थकलेल्या मजुरांचा आसरा बनून, सावली बनून.

या चौघांना सलाम करतानाच पहिल्या कोविड लाटेत स्थलांतरित मजुरांपर्यंत मदत पोचवणाऱ्या आणखी दोघांची आवर्जून आठवण केली पाहिजे. 

भायखळ्याचे फारुख शेख. भिवंडी आणि धारावीत बिहारी मुस्लिमांचे अनेक छोटे मोठे उद्योग, व्यवसाय उभे आहेत. आपल्या व्यावसायिक कौशल्याने त्यात पुढे गेलेले फारुख शेख बिहारच्या मधुबनीचे. समाजवादी चळवळीचा वारसा असलेले. बिहारचे शाहिद कमाल, तन्वीर आलम, नितीश कुमार, लालू प्रसाद यादव आणि शरद यादव सगळ्यांशी संबंध असलेले फारुख भाई काही वर्षांपूर्वी मुंबईत आले आणि मोठे व्यावसायिक झाले. सीएए, एनआरसीच्या विरोधातल्या आंदोलनात त्यांनी झोकून दिलं. व्यावसायिक मंडळी राजकारणात उघडपणे भाग घेत नाहीत. पण फारुखभाई अपवाद ठरले. डॉ. गणेश देवी यांची मुंबईतली आणि कन्हैया कुमारच्या मुंबई आणि बिहारमधल्या मोठ्या सभांचं आयोजन करण्यामध्ये फारुखभाईंचा वाटा मोठा होता. आता ते राष्ट्रीय जनता दलाकडून बिहार विधान परिषदेचे सदस्यही झालेत. पण कोविडच्या पहिल्या लाटेत जेव्हा हजारो मजूर गावाकडे निघाले होते. किंवा जिथे जिथे अडकले होते. त्यांना मदत पोचवण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार स्तिमित करणारा होता. 

फारुखभाईंनी छात्र भारती आणि सेवा दलाच्या मुलांकडे मदत मागितली. पुढच्या काही दिवसात राष्ट्र सेवा दलाचे महासचिव अतुल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रोहित ढाले आणि त्यांच्या टीमने एक लाखाहून अधिक मजुरांपर्यंत शिधा पोचवला. सेवा दलानेही त्यात थोडा हिस्सा उचलला.  दोन, अडीच कोटींहून अधिक मदत उभी राहिली. देणगीदारांकडून वस्तूरूपाने मदत मागण्यात आली. तांदुळ, पीठ, चहा, मीठ, डाळी, तेल, मसाले, यांचे सव्वा लाख किट वाटण्यात आले. रोहित ढाले आणि त्याची टीम थेट नाशिकच्या हायवेपर्यंत पोचत होती. तेव्हा रस्त्यावर खाजगी वाहनाला सुद्धा परवानगी नव्हती. मी मुंबई पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्राच्या डीजींना त्यांच्यासाठी पास मागितला. तर दोघांकडून 'क्या आप रोहित ढाले के लिए पास मांग रहे है?' असा उलटा प्रश्न आला. मी हो म्हणालो. तर कमिशनरांचं उत्तर होतं, 'रोहित ढाले सगळ्या पोलिसांना माहित आहेत, कोणी त्यांना अडवत नाही.' मुंबई, ठाण्याच्या पोलिसांनी ज्या पद्धतीने दखल घेतली होती, त्यातून रोहित आणि फारुखभाईंच्या कामाची पावती मिळत होती.

आपण काय करू शकतो?
डॉ. राहुल, प्रतिभाताई, अनिकेत भैय्यासारखं किंवा डॉ. अभिन
यसारखं आपण काम नाही करू शकत. फारुखभाई किंवा रोहित ढालेसारखं कदाचित धावूही शकणार नाही. वादळानंतर कोकणात सदा मगदूमांच्या नेतृत्वात सेवा पथकं गेली तसं काम आपण कदाचित करू शकू. गोरेगावला दीपक सोनावणेने भाकर फाउंडेशनच्या माध्यमातून वस्तीवस्तीत जे काम केलं, त्याच्यासारखं काम करणं आपल्याला शक्य आहे. गिरीष सामंतांनी त्यांच्या शाळेतल्या गरीब विद्यार्थ्यांपर्यंत धान्य पोचवलं. अंधेरी, वर्सोव्यात प्राचार्य अजय कौल यांनी त्यांच्या शाळेतील सर्व मुलांची फी माफ केली. अरविंद सावला यांनी सुद्धा अंधेरीला छोटं पण सुसज्ज असं कोविड सेंटर सुरु केलं आहे. नंदुरबारमध्ये संगीता हिरालाल पाटील, संगमनेरमध्ये दत्त्ता ढगे, मालेगावात नचिकेत कोळपकर, तर नाशकात समाधान बागुल, नितीन मते यांनीही असंच काम केलं. मालेगावत मुख्याध्यापक विकास मंडल यांनी मालेगाव शहरात आणि आदिवासी भागात पहिल्या लाटेत खूप काम केलं. आणि त्यात त्यांना संसर्ग होऊन त्याचं देहावसन झालं. अनिता पगारेही अशाच गेल्या. नाशिक पोलीस दलात शिपाई असणाऱ्या, छात्र भारतीत घडलेल्या नझीम शेखने कर्ज काढून ऑक्सिजन मशीन घेतलं. परिसरातील कोरोना रुग्णांना ते विनामूल्य देण्यात येतं.राज्यभर अशाच प्रकारचं काम असंख्य कार्यकर्त्यांनी स्वयंस्फुर्तीने केलं. अजूनही करत आहेत. 

पण या महामारीत आपण जिथे आहोत, तिथे स्वतःची, कुटुंबियांची काळजी घेऊन शेजाऱ्यांना, आपल्या परिसरातील लोकांना मदत मिळवून देणं. माहिती मिळवून देणं हे सहज करू शकू. कुठल्या हॉस्पिटलला बेड उपलब्ध आहे? ऑक्सिजन कुठे कमी पडतोय? डॉक्टर आणि रुग्णांच्या काय अडचणी आहेत? कोविड सेंटर किंवा हॉस्पिटलची फायर ऑडिट झाली आहेत की नाही? याची माहिती घेऊ शकतो. प्रशासनाला जागं करू शकतो. कोविडमधून बरे झालेल्या आणि आता सशक्त असलेल्या लोकांची यादी करून प्लाझ्मा डोनर शोधू शकतो. लसीकरणाबाबत निर्माण झालेले गैरसमज दूर करू शकतो. जनजागृती करणं, आवाज उठवणं हे सहज शक्य आहे. या अर्थाने आपण प्रत्येकाने 'साथी हात बढाना', हे गाणं कृतीत आणायला हवं.

- कपिल पाटील

----------------------------------

याच संदर्भातले जुने ब्लॉग - 

कोरोनानंतर कोरोनापेक्षा भीषण
https://bit.ly/3dP1UAT 

______________________________

Social Distancing नका म्हणू, त्याचा इतिहास भयकारी आहे.
https://bit.ly/2XM3VGj

______________________________

बडा कब्रस्थान, हिंदू समशान
https://bit.ly/2BK4tUp

______________________________

फारुख शेख का अभिनन्दन!
https://bit.ly/2QXpbHP 

 

Thursday, 8 April 2021

दत्ताला विसरता कसं येईल...

 

दत्ता इस्वलकरांचे वडिल मिलमध्ये जॉबर होते. इस्वलकरही वयाच्या २३ व्या वर्षी १९७० मध्ये मॉर्डन मिलमध्ये लागले. ७२ व्या वर्षी इस्वलकर गेले. गिरणी कामगारांना न्याय मिळवून देणारा नेता हरपला, अशी प्रतिक्रिया वर्तमानपत्रांनी दिली. गिरण्यांची वाताहात झाली त्याला आता ४० वर्ष होतील. गिरण्या म्हणजे काय? हे मुंबईतल्या नव्या पिढीला माहित असण्याचं कारण नाही. आठ एक वर्षांपूर्वी गिरणगावातल्या एका नाईट स्कूलमधल्या मुलांशी बोलत होतो. तुम्ही सारे गिरणगावातले आहात, असं मी बोलल्यावर त्यांची 'नाही' हीच पहिली प्रतिक्रिया आली. मला माझी चूक कळली. मी विचारलं, लालबाग, परळमध्ये राहणारे तुमच्यापैकी कितीजण आहेत? सगळ्यांचे एक जात हात वर आले. इथे गिरण्या होत्या, हे त्यांच्या गावी नव्हतं. मुंबई गिरणी कामगारांच्या घामातून  उभी राहिली, हे नव्या पिढीला माहित नाही.


दत्ता इस्वलकर गिरणी कामगारांचे नेते झाले ते गिरण्या संपल्यानंतर. वाताहात झाल्यानंतर. लढाई हरल्यानंतर. लढाई हरलेले गिरणी कामगार कधीच न संपलेल्या दत्ता सामंतांच्या संपाला कधीच दोष देताना मी ऐकलं नाही. न दत्ता इस्वलकरांकडून. मुंबईतल्या गिरण्या संपानंतर संपल्या. पण संपामुळे नाही. त्याची आर्थिक, राजकीय कारणं गिरणी कामगार जाणून होते. नारायण मेघाजी लोखंडे ते भाई श्रीपाद अमृत डांगे यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या गिरणी कामगारांची आर्थिक आणि राजकीय समज पक्की होती. हा कामगार मुजोर गिरणी मालकांसमोर नमला नाही. कामगारांमध्ये फूट पाडणाऱ्या राजकीय नेतृत्वालाही कधी साथ देता झाला नाही. गिरणी कामगारांची मुलं मात्र उद्ध्वस्त झाली. वैफल्यामध्ये करपून गेली. त्यातुन जाती व धर्म द्वेषाच्या राजकारणाला बळी पडली. म्हाताऱ्या गिरणी कामगारांच्या मनातला आणि विचारातला लाल बावटा मात्र कधीच खाली आला नाही. तो लाल बावटा अखेर पर्यंत खांद्यावर वागवणारे समाजवादी दत्ता इस्वलकर काल गेले.

निखिल वागळे यांचा परवा रात्री उशिरा फोन आला होता. 'अरे आपला दत्ता सिरीयस आहे. जेजे मध्ये आहे. त्याला उपचार नीट मिळतील असं पहा.' मी म्हणालो, जाऊन येतो. वागळे म्हणाले, 'तुझा फोनही पुरेसा आहे. कोविडच्या काळात हॉस्पिटलमध्ये जाणं जोखमीचं आहे.' काल संध्याकाळी जेजे हॉस्पिटलला गेलो. हॉस्पिटलचे डीन डॉ. माणकेश्वर आणि इतर सिनियर डॉक्टरांशी बोललो. आम्ही सर्व काही करू असं त्यांनी आश्वासन दिलं होतं. फक्त कोविडच्या टेस्टची वाट ते पाहत होते. पण उशीर झालेला होता. काही तासही उरलेले नव्हते. एक ईसीजी काढायचं ठरलं होतं. त्यांनी ईसीजी मागवला. तो फ्लॅट निघाला. 

इस्वलकरांची मुलगी आणि जावई यांची भेट झाली. डॉक्टरांनी त्यांना पूर्वकल्पना दिली होती. डॉक्टरांना मी म्हणालो, हरलेल्या गिरणी कामगारांना घर मिळवून देण्याची लढाई जिंकून देणारा हा नेता आहे. तो इथे हरता कामा नये. पण खरंच उशीर झाला होता. त्यांचे रिपोर्ट डॉक्टर मला समजून सांगत होते, तेव्हा त्याची जाणीव होत होती. इस्वलकर तसे गेले चार वर्षांपासून दूर्धर आजाराने त्रस्त होते. त्याच आजाराने टोक गाठलं. मेंदूतील रक्त स्त्रावाने त्यांचे प्राण घेतले.

निखिल वागळेंना मी फोन करून सगळं सांगितलं. ते खूपच अस्वस्थ झाले होते. आणि इस्वलकर गेल्याची बातमी पुन्हा त्यांनीच फोनवरून सांगितली तेव्हा त्यांचा स्वर व्याकुळला होता. दत्ता इस्वलकरांची गिरणीच्या आवारातली लढाई वागळेंनी पाहिली होती. नंतर दत्ता इस्वलकर वागळेंच्या सोबत 'महानगर' या सांज दैनिकाचे व्यवस्थापकीय काम पाहू लागले होते. वागळेंच्या अडचणींच्या व संघर्षाच्या काळात इस्वलकरांनी त्यांना साथ दिली होती. वागळे झुंजार. तसे इस्वलकरही.

मॉडर्न मिलमधला गिरणी कामगार दत्ता इस्वलकर गिरणी कामगारांचे नेते बनले २ ऑक्टोबर १९८९ ला. बंद पडलेल्या गिरणी कामगारांचे नेते. लढाई हरलेल्या, वाताहात झालेल्या गिरणी कामगारांचे नेते. बंद गिरणी कामगार संघर्ष समितीच त्यांनी स्थापन केली. सगळ्या संघटनांना एकत्र केलं. वर्षभरानंतर त्यांनी बेमुदत उपोषण केलं. तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मध्यस्तीनंतर उपोषण सुटलं. नंतर १९९१ नंतर विकास नियंत्रण नियमावली आली. त्याचा फायदा गिरणी मालकांनी उचलला. जमिनी विकल्या गेल्या. एक काळ गिरण्यांच्या चिमण्या जिथे आकाशात धूर सोडत होत्या तिथे त्या चिमणीच्या उंचीची एक इमारत नव्हती. आता स्काय स्क्रॅपर टॉवर उभे आहेत. कामगारांची मुंबई श्रीमंतांची लंका बनली.

दत्ता इस्वलकरांनी त्याच जमिनींवर गिरणी कामगारांना घरं मिळवून देण्यासाठी लढा सुरु केला. कामगारांच्या घरांचा हक्क आज मान्य झाला आहे. तो हक्क मिळवून देणारा नेता मात्र काळाच्या पडद्याआड गेला आहे.

दत्ता इस्वलकर  समाजवादी चळवळीत वाढलेले. पण त्यांच्यावर वैचारिक प्रभाव होता तो गजाजन खातू यांचा. त्यांच्याशी मसलत केल्याशिवाय इस्वलकर पुढचं पाऊल उचलत नसत. राष्ट्र सेवा दल, समता आंदोलन, माणगावचं साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, डॉ. बाबा आढावांचं विषमता निर्मूलन शिबीर, जॉर्ज फर्नांडिस यांची आंदोलनं, मधू दंडवतेंच्या सभा. दत्ता इस्वलकर प्रत्येक ठिकाणी असत.

केंद्रात २०१४ मध्ये मोदींची राजवट आली आणि सगळ्याच डाव्या, समाजवादी, पुरोगामी चळवळींमध्ये अस्वस्थता पसरली. पुरोगाम्यांचं विखुरलेपण आणि प्रतिक्रियावाद्यांची संघटीत, हिंसक एकजूट यामुळे दत्ता इस्वलकर अस्वस्थ झाले नसते तरच नवल. पाच वर्षांपूर्वी संघमुक्त भारतची घोषणा घेऊन नितीशकुमार पुन्हा सत्तेवर आले होते. ते पर्यायी राजकारण उभं करू शकतील या अपेक्षेने मी आणि लोक भारतीने त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा अनेकांशी चर्चा करत होतो. २२ एप्रिल २०१७ ला नितीशकुमार मुंबईत येणार होते. त्यानिमित्ताने सहयोगी, समविचारी कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचं आवाहन करणारं पत्रक ८ मार्च २०१७ रोजी दत्ता इस्वलकरांनी काढलं होतं. त्यात ते म्हणाले होते, 'मोदींची राजवट आल्यापासून चळवळीतीलच नव्हे तर सर्वच संवेदनशील नागरिक अस्वस्थ आहेत. देशात लोकशाही समाजवादी विचारांचा पर्याय उभा राहावं असं आपल्या सर्वानाच प्रामाणिकपणे वाटते. आपण सारे गटातटात विखुरलेले असलो तरी या मुद्द्यावर आपल्या सर्वांचं एकमत व्हावं. महाराष्ट्रात तरी किमान आपण साऱ्यांनी एकत्र येणं आवश्यक आहे.'

'परस्परांशी संवाद व्हावा', हे  दत्ता इस्वलकरांचं आवाहन होतं. नितीशकुमारांबरोबर जाण्याचा तो प्रयोग बिहारमध्ये बदललेल्या राजकारणामुळे पुढे जाऊ शकला नाही. पण किमान पर्यायी राजकारण उभं राहण्यासाठी परस्परांशी संवाद व्हावा, हे  दत्ता इस्वलकरांचं आवाहन अप्रस्तुत झालेलं नाही. त्यांच्या दूर्धर आजारापेक्षा मतभिन्नतेची कर्कशता त्यांना अधिक त्रास देत होती. कोविडच्या काळात होत असलेली असंघटीत मजुरांची वाताहात आपल्यासमोर आहे. कामगार संपले. कामगारांचे नेतेही. हे वास्तव अस्वस्थ करतं.

दत्ता इस्वलकर यांच्या जाण्याने ही अस्वस्थता आणखीनच तीव्र केली आहे. आजार तीव्र होतो तशी. आजार दूर्धर होता त्यांचा. अवस्थतेच्याबाबत तसं व्हायला नको. हरलेल्या कामगारांना हक्काचं घर मिळवून दिलं होतं दत्ता इस्वलकरांनी. विसरता कसं येईल ते. ती जिद्द बाळगणं हेच खरं त्यांना अभिवादन ठरेल. 

- कपिल पाटील    

Friday, 26 March 2021

मूकनायिका

 


प्रा. पुष्पा भावे यांना जाऊन जेमतेम पाच महिने झाले असतील. आज त्यांचा जन्मदिवस आहे. पण त्यांच्या आठवणी तितक्याच जाग्या आहेत. सार्वजनिक जीवनात असं जागं राहणं फक्त पुष्पाताईच करू शकत होत्या. त्यांची वाणी आणि लेखणी कपाट बंद पुस्तकांसाठी कधीच नव्हती. प्रश्नांना त्या थेट भिडत होत्या. लोकांसाठी उभ्या राहत होत्या. जनतेच्या प्रश्नावर त्यांची वाणी सत्याग्रहासारखी प्रत्येक आघाडीवर व्यक्त होत होती.


पुष्पाताईंनी तसं बसून लेखन खूप कमी केलं. पण साहित्य आणि समीक्षा या दोन्ही क्षेत्रात त्यांची असलेली प्रतिष्ठा आणि दरारा सर्वमान्य होता. दुर्गाबाई भागवतांसारखं विपुल लेखन नाही केलं कधी पुष्पाबाईंनी, पण दुर्गाबाईंची जी भीती सत्ताधाऱ्यांना वाटत होती, तितकीच भीती पुष्पाताईंबद्दल सत्तेवर कुणी असो त्यांना वाटत होती. 

सामाजिक आणि सार्वजनिक नीती मूल्यांचा आवाज म्हणजे पुष्पाताई होत्या. अन्यायाच्या विरोधात 'मेरी झाँसी नही दूंगी' सारखा त्यांचा प्रण असायचा. 'लोकशाही, स्वातंत्र्य आणि मानवाधिकार याबाबत कधीच तडजोड नाही', असा त्यांचा झाँसीच्या राणीसारखा नही दूंगी निर्धार होता. पुष्पाबाईंचा हा निर्धारच आधार होता निराश्रित, परावलंबी, दुर्बल, अव्यक्त मूक समाज समूहांचा.

मागच्या चार दशकांमधल्या त्या मूकनायिका होत्या. बोलू न शकणाऱ्यांच्या, अन्यायाचा प्रतिवाद करू ना शकणाऱ्यांच्या आवाज बनून राहिल्या होत्या. त्या कायम सत्याग्रही असायच्या. बोलायच्या तेव्हा त्यांना शब्द शोधावे लागत नसत. पारंपरिक शब्दांची उपमा द्यायची तर, सरस्वतीचं जणू वरदान त्यांना होतं. सरस्वती म्हणजे वाणी. भाषा. खरंच त्यांना वाणी आणि भाषेचं जे वरदान होतं, त्यामुळे शब्दच काय, एक अक्षरही त्यांना इथे तिथे जावं लागत नसे. शब्दामागून शब्द लीलया प्रगट होत. नुसते प्रगट नसत होत, कानात, मनात घुमत असत. अन्याय, उपेक्षा, अत्याचार यांच्याविरोधात आदळत असत. शस्त्र बनून. तुकोबाराय जसे शब्दांना रत्न आणि शस्त्र मानत पुष्पाताई तशा होत्या.

चळवळीत आणि पत्रकारितेत असताना पुष्पाताईंचा सहवास अनेकदा लाभला, मिळाला. सेवादल, समाजवादी संघटना, दलित संघटना, उपेक्षितांची व्यासपिठं या सगळ्यांना पुष्पाताई आपल्या वाटत होत्या. यापैकी कुणाच्याच त्या सभासद झाल्या नसतील कदाचित. पण त्या त्यांच्यातल्याच एक होत्या. आणि त्यांच्यासाठी बोलत होत्या.

आणीबाणीच्या विरोधात त्या निडरपणे लढल्या. लोकशाही स्वातंत्र्याच्या प्रश्नावर त्यांनी तडजोड केली नाही. समतेच्या प्रश्नावर तशाच त्या कायम आग्रही राहिल्या. मग प्रश्न मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा असो किंवा मंडल आयोगाचा. मराठावाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मिळावं यासाठी जो प्रदीर्घ संघर्ष झाला, त्या संघर्षात पुष्पाताई अग्रणी होत्या.

पुष्पाताईंचं वाचन अफाट होतं. व्यासंग खूप मोठा होता. संदर्भ शोधायला त्यांना पुस्तकं चाळावी लागत नव्हती. कमालीची स्मरणशक्ती. विवेचक बुद्धिमत्ता. मर्मग्राही समिक्षा. काय नव्हतं त्यांच्याकडे, सगळंच होतं.

शिक्षक भारतीचं संघटन करताना कार्यकर्त्यांची वैचारिक बैठक बांधण्यासाठी आम्हाला पुष्पाताईंचीच मदत झाली. शिबिरांमध्ये त्या यायच्या. शिक्षकांना मंत्रमुग्ध करायच्या. कवयित्री नीरजा यांच्या अध्यक्षतेखाली पहिलं राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलन झालं तेव्हा उदघाटन सत्राच्या प्रमुख पाहुण्या पुष्पाताई होत्या, तर समारोप भालचंद्र नेमाडे यांनी केला होता. शिक्षक भारतीच्या प्रत्येक उपक्रमाला त्यांची अशी साथ होती. नीरजाताईंमुळे पुष्पाबाई शिक्षक भारतीशी जोडल्या गेल्या त्या अखेरपर्यंत. 


मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आरक्षणवादी चळवळींमध्ये एक मोठा पेच निर्माण करून गेला होता. ५० टक्क्यांची मर्यादा, ओबीसी आरक्षणाचे निकष आणि दुसऱ्या बाजूला मराठा समाजात शेती अरिष्टामुळे निर्माण झालेले प्रश्न, आलेलं वैफल्य, विशेषतः मराठा स्त्रियांमध्ये निर्माण झालेला असंतोष या सगळ्याकडे पुष्पाताई वेगळ्या नजरेने पाहत होत्या. त्यांनी एक टिपण तयार केलं. मी त्यांच्या घरी गेलो होतो. दलित, ओबीसी, मुस्लिम ओबीसींच्या आरक्षणाच्या चळवळीतला माझा सहभाग त्यांनी जवळून पाहिला होता. माझ्या हाती त्यांनी ते टिपण दिलं. मराठा समाजाच्या दैन्य, वैफल्य आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीच्यासंदर्भात  पुष्पाताईंचा कौल अर्थातच मराठा आरक्षणाच्या बाजूने होता.  ते टिपण त्यांनी प्रसिद्धीस न देता संबंधित कार्यकर्त्यांच्या चर्चेला खुलं केलं. अशा प्रश्नांच्या चळवळीत पुढारपणा न करता कार्यकर्ते व नेते यांची वैचारिक बांधणी नेमकी कशी होईल यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील असायच्या. त्यांच्या टिपणाची चर्चा आंदोलनामधल्या फार थोड्या लोकांपर्यंत पोचली होती. पण ज्यांच्यापर्यंत पोचली त्यांना तो मोठा आधार वाटला. पुष्पाताईंबाबत एक नवं कुतूहल त्यांच्यामध्ये निर्माण झालं.

पुष्पाबाईंचं पूर्वीचं आडनाव 'सरकार' होतं. आरमारी आंग्रे घराण्यातल्या त्या  सरकारच. त्यांच्या दारावर तीच पाटी होती. पण ते नाव मिरवण्याचा सरंजामी लवलेश पुष्पाताईंच्या आचारात, विचारात कुठेही नव्हता. जमिनीशी त्यांचं नातं होतं. वेशीबाहेरच्या माणसांबद्दल त्यांना जिव्हाळा होता. उपेक्षितांच्या प्रश्नांशी त्यांची निष्ठा होती. ती त्यांनी अनमिषपणे जपली.

त्या गेल्या त्या दिवशी नीरजाताईंनी कळवलं. पण कोविडमुळे लवकरच उरकण्यात आलं. आणि अनंत भावे पुण्याला निघूनही गेले.  पोचता नाही आलं. दूर होतो. पुष्पाताईंची आठवण येत असताना अनंत भावेंना हा त्यांच्याशिवायचा काळ नीट जावा एवढीच प्रार्थना.

प्रा. पुष्पा भावे यांना विनम्र अभिवादन!

- कपिल पाटील
( सदस्य - महाराष्ट्र विधान परिषद , अध्यक्ष - लोक भारती आणि कार्यकारी विश्वस्त - राष्ट्र सेवा दल.)

Thursday, 18 March 2021

संजय कुमार आणि सीताराम कुंटे

 


परमवीर सिंग जाऊन हेमंत नगराळे मुंबईचे पोलीस आयुक्त झाले, या बातमीची चर्चा वाजेंमुळे चांगलीच वाजली. तसं राज्याच्या मुख्य सचिवांच्या बाबत काही घडलं नाही. कारण संजयकुमार त्यांच्या नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त झाले. सीताराम कुंटे सेवा ज्येष्ठतेने मुख्य सचिव झाले. कोविड आणि वादळी अधिवेशन या पार्श्वभूमीवर ना संजय कुमारांना नीट निरोप देता आला, ना सीताराम कुंटेंचं नीट स्वागत झालं.


संजय कुमार आणि सीताराम कुंटे दोघांचाही स्वभाव काही वादळी नाही. चर्चेत राहण्याचा दोघांनाही सोस नाही. दोघंही कोणत्या राजकीय गोटात नाहीत. अत्यंत संयत स्वभावाचे. उत्तम प्रशासक. सचोटीचे अधिकारी, ही दोघांची ओळख. दोघांच्याही शोधून भानगडी सापडणार नाहीत, अशी दोघांची कारकीर्द.

संजय कुमार शिक्षण सचिव असताना त्यांचा निकटचा संबंध आला. मूळ बिहारचे कायस्थ. त्यांच्या खुर्चीमागे गौतम बुद्धांचं सुंदर चित्र होतं. मी त्यांना त्याबद्दल छेडलं. त्यांचं उत्तर होतं, 'बिहार ही बुद्धांची भूमी. बिहार म्हणजे विहार. महाराष्ट्रात आल्यावर बुद्ध कुणा जातीचे दैवत? या प्रश्नाची चर्चा ऐकली. बुद्ध तर सर्वांचे. भारताची ओळख.'

त्यांच्या उत्तराने त्यांच्याशी मैत्री जमली. मला म्हणाले, 'शिक्षक आमदार आहात, तर काही चांगलं करा.' मी त्यांना विचारलं, 'आयएएस, आयपीएस अधिकारी फक्त बिहारमधून जास्त का येतात?' त्यांनी मला रांचीची नेत्रहट शाळा दाखवली. झारखंड तेव्हा बिहारचा भाग होतं. ही शाळा सरकारी बोर्डिंग स्कूल. संजय कुमार याच शाळेत शिकले. मला म्हणाले, 'या शाळेतील २०० माजी विद्यार्थी आज मुंबईत उच्च पदावर कार्यरत आहेत.'

बिहारमध्ये अशा काही मोजक्या शाळा आहेत, तिथे मुलं निवडून घेतली जातात. सरकारच सगळा खर्च करतं. पदव्युत्तर शिक्षण घेतलेले शिक्षक तिथे असतात. तिथेच राहतात. अट असते त्या शिक्षकांची मुलंही त्याच शाळेत शिकतील. आरटीई  येईपर्यंत महाराष्ट्रात बारावी डीएड शिक्षक आठवीपर्यंत शिकवू शकत होते. बिहार, केरळ, दिल्लीत मात्र तशी स्थिती नव्हती. तिन्ही ठिकाणी अभ्यासक्रम सीबीएसई बोर्डाचा. या तिन्ही राज्यात मुंबईतील मुख्याध्यापक व शिक्षकांच्या टीम्स शिक्षक भारतीच्या वतीने मी पाठवल्या. त्यांनी अहवाल तयार केला. विधान परिषदेत तत्कालीन शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांना सादर केला. त्यांनी स्वीकारला. तेव्हा कुठे आपलं गणित आणि सायन्स सीबीएसई दर्जाचं झालं. त्याचं श्रेय संजय कुमार आणि राजेंद्र दर्डा यांचंच.

संजय कुमार यांनी मुंबईतल्या रात्रशाळा वाचवल्या. २०१२ मध्ये वाढतेल्या तुकड्यांवर बंद तुकड्यांचं समायोजन केलं. तिथे शिकवणाऱ्या मूळ शिक्षकांना खास जीआर काढून संरक्षण दिलं. युनियन बँकेत शिक्षकांचे पगार नेले. नंतर सरकार बदललं. तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या तिघांनाही संकटात टाकलं. राष्ट्रीयकृत बँकेतले पगार वाचवण्यासाठी अखेर सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं. २०१२ च्या वाढीव तुकड्यांवरील शिक्षकांना हायकोर्टाने संरक्षण दिलं. सरकार बदललं. नव्या शिक्षणमंत्र्यांनी हे संरक्षण देण्याचं मान्य केलं आहे. पण सचिव बदलले की कसं संकट ओढवतं, ते अनुभवतो आहे. शर्वरी गोखले, संजय कुमार यांनी महाराष्ट्राचं शिक्षण वाचवलं. ते वाचवायचं असेल तर आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भूमिका घ्यावी लागेल. महाराष्ट्राचं शिक्षण चांगलं करायचं असेल तर संजय कुमारांसारखा डायनॅमिक शिक्षण सचिव आणावा लागेल.

मुख्यमंत्र्यांनी तसा निर्णय मुख्य सचिवांच्या बाबत घेतला आहे. सीताराम कुंटे यांच्यासारखा. एक अत्यंत सत्शील, कार्यक्षम आणि दूरदृष्टी असलेला अधिकारी राज्याच्या मुख्य सचिव पदी आला आहे. कोविड सारख्या काळात दिलासा देणारी ही गोष्ट आहे. कुंटे साहेब मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त होते तेव्हा त्यांचा कारभार मुंबईने अनुभवला आहे. मुंबई महानगरपालिकेची इमारत जागतिक दर्जाची हेरिटेज मानली जाते. कुंटे साहेब येईपर्यंत तिची रया गेली होती. कुंटे यांनी तिचं रुपडं बदललं. तिचं मूळ वैभव प्राप्त करून दिलं. कारभारातही तीच स्वच्छता आणि लखलखता त्यांनी आणली. अर्थात पारदर्शकताही. आयुक्तांची केबिन त्यांच्या आधी मी अनेकदा पाहिली होती. बदललेल्या रूपाबद्दल त्यांना विचारलं. त्यांनी खुर्चीवरून उठून मला सगळे बदल दाखवले. म्हणाले, 'मी बदललं नाही, रिस्टोर केलं. आपल्या मुंबईचं हे वैभव आहे.'

सीताराम कुंटे त्यांच्या साधेपणाबद्दल आणि सचोटीबद्दल प्रसिद्ध आहेत. राज्यपालांकडेही काही काळ ते होते. मुंबई महानगरपालिका आयुक्त पदावरून ते मंत्रालयात परत आले. आणि उच्च शिक्षणाचा कार्यभार त्यांच्याकडे आला. त्यावेळची एक आठवण महत्त्वाची आहे, महाराष्ट्र युनिव्हर्सिटीचं बिल मागच्या सरकारच्या काळात आलं. या बिलावरून शिक्षण मंत्र्यांशी माझा थेट संघर्ष झाला होता. हे बिल जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे म्हणजे विधिमंडळाच्या संयुक्त प्रवर समितीकडे पाठवायला विरोधी पक्षांनी भाग पाडलं. विधान परिषदेतून माझ्या नावाची शिफारस विरोधी पक्षांनी केली होती. पण शिक्षणमंत्री तावडे यांनी प्रस्ताव मांडताना माझं नाव गाळून टाकलं. विरोधी बाकावर बसणारे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांच्या चाणाक्ष नजरेत ते चटकन लक्षात आलं. त्यांनी उभं राहून माझ्या नावाचा आग्रह धरला. शिक्षणमंत्र्यांनी संख्या मर्यादेचा मुद्दा काढला. तटकरे यांनी तात्काळ राष्ट्रवादीचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांचं नाव मागे घेतलं आणि त्या जागी कपिल पाटील यांचं नाव घाला असं ठासून सांगितलं. तटकरेंमुळे मी त्या कमिटीवर गेलो. सीताराम कुंटेंच्या स्वभावाचं आणि विचारांचं एक नवं दर्शन त्या कमिटीच्या बैठकांमध्ये मला घडलं.

महाराष्ट्र युनिव्हर्सिटी कायद्यात आरक्षणाला बगल देण्यात आली होती. मी थेट कुलगुरू पदा पर्यंतच्या आरक्षणाचा आग्रह धरला. पण आपला आग्रह मानला जाईल याची मलाच खात्री नव्हती. शिक्षणमंत्री समिती प्रमुख होते. त्यांनी अखेर उच्च शिक्षण सचिव सीताराम कुंटे यांना त्यांचं ओपिनियन समितीपुढे मांडण्यास सांगितलं. सीताराम कुंटे अत्यंत साध्या, संयत, स्वच्छ आणि ठाम शब्दात म्हणाले, 'आरक्षण संविधानिक आहे. कुलगुरू पदापर्यंत ते देणं शक्य आहे. दिलं पाहिजे.'

विद्यापीठांमधलं आरक्षण सीताराम कुंटे यांच्यामुळे टिकलं. त्याक्षणी मी चकीत झालो होतो. पण नंतर अनौपचारिक बोलताना माणसाचा स्वभाव लक्षात आला. ते तांत्रिकतेने बोलले नव्हते. मनापासून बोलत होते. ती बैठक संपल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांना मी कुंटेंबद्दल विचारलं. ते दोनच शब्दात म्हणाले, 'आपला माणूस आहे.'

राज्याचे मुख्य सचिव म्हणून कुंटे यांची मुख्यमंत्र्यांशी नाळ जुळेल. सरकारची खरी कसोटी अजून लागायची आहे. त्यात कुंटे यांचं मुख्य सचिव असणं राज्याच्या हिताचं आहे.

- कपिल पाटील
(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य, लोक भारतीचे अध्यक्ष आणि राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त आहेत.)

Monday, 22 February 2021

सुशीलाबाई महाराव : प्रेरणादायी शिक्षिका


कर्मवीर भाऊराव पाटील आणि साने गुरुजी यांच्या शिष्या, मुंबईतील ज्येष्ठ निवृत्त मुख्याध्यापिका सुशीलाबाई महाराव यांचे काल ब्रेन स्ट्रोकने निधन झाले. त्या ९४ वर्षांच्या होत्या. अखेरपर्यंत कार्यरत होत्या. चित्रलेखाचे संपादक, सत्यशोधक वक्ते व नाटककार ज्ञानेश महाराव यांच्या त्या आई. 

माझी गोष्ट नावाचे त्यांचे आत्मचरित्र अलीकडेच प्रसिद्ध झाले होते. प्रख्यात साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन झाले होते. अलंकृत भाषा आणि निखळ जीवनानुभव हे त्यांच्या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. बाई मोठ्या निर्धारी होत्या. मुलांना शिकवलं, मोठं केलं. चिकित्सक आणि विवेकी दृष्टिकोन दिला. अखेर पर्यंत स्वावलंबी आणि स्वाभिमानी जीवन जगल्या. 

मुंबई महापालिकेच्या शाळेत त्या शिक्षिका होत्या. मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या. शिक्षिका असताना अर्ध मागधी भाषा शिकल्या. जैन संस्कृतीचा अभ्यास केला. भारतातील अवैदिक संस्कृतीचा संस्कार त्यातूनच त्यांनी घेतला असावा. त्यांचे अनेक विद्यार्थी नावारुपाला आले. त्याकाळी महापालिका शाळांमध्ये गर्दी असायची. सुशीलाबाई महाराव यांच्यासारख्या शिक्षकांनी तो विश्वास निर्माण केला होता. 

त्यांचं वाचनही अफाट होतं. संगीत आणि नाटकाची आवड होती. अभिनयाचीही. नुसती आवड नव्हे जाण होती. तो वारसा त्यांनी आपल्या मुलांकडे दिला. रंगमंचावरचा ज्ञानेश महारावांचा बहुढंगी अविष्कार पाहिला की त्यांच्या आईने दिलेल्या देणग्या लक्षात येतात. 

सुशीलाबाईंचे वडील साई बाबांचे मित्र होते. भक्त नव्हते. साई बाबांना चमत्कार नंतर जोडले गेले. श्रद्धा, सबुरी आणि सर्व धर्म समभावाचा संदेश त्या संत फकिराने आपल्या आयुष्यात लोकांना दिला. त्यांच्या आठवणी साध्या, सरळ शब्दात त्यांनी लिहिल्या आहेत. 

सुशीला बाई त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातही साध्या, सरळ जगल्या. निढळ हाताने मदत केली. हात पसरले नाहीत. ज्ञानेश महाराव यांच्यातला सत्यशोधक आणि चिकित्सक संपादक ही सुशीलाबाई महाराव यांचीच देणगी आहे. 

सुशीलाबाई महाराव यांना विनम्र श्रद्धांजली!

- कपिल पाटील 

Saturday, 12 December 2020

शरद पवारांवर शरद पवारांनीच अन्याय केला


वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना त्यांच्या जिवंतपणी त्यांचा पुतळा उभारला गेला. मायावतींनी कांशीराम पार्कमध्ये स्वतःचाही पुतळा उभारला. नाईकांचं तसं झालं नव्हतं. वसंतराव नाईक महाराष्ट्रातील कृषी क्रांतीचे प्रवर्तक मानले जातात. पण म्हणून त्यांचा पुतळा उभारला गेला नाही. नाईक यांच्यामुळे महाराष्ट्रातील तमाम भटक्या विमुक्तांना ओळख मिळाली. प्रतिष्ठा मिळाली. नाईक साहेब जणू त्यांच्या अस्मितेचे प्रतिक बनले होते. पुतळा म्हणून उभारला गेला. 

असंच काहीसं शरद पवार यांच्याबाबत घडलं आहे. शरद पवारांचा आज 80 वा वाढदिवस. शरद पवार यांच्या आयुष्याची 8 दशकं आज पूर्ण झाली आहेत. त्यांच्याच प्रयत्नातून सत्तेवर आलेल्या 'महाराष्ट्र विकास आघाडी' सरकारने त्यांच्या नावाने 'ग्राम समृद्धी योजना' सुरु केली आहे. पवारांच्या पक्षाने म्हणजे राष्ट्रवादीने 80 हजार तरुणांना रोजगार मिळवून देण्याचा संकल्पही केला आहे. त्यांच्या पक्षाने तसा कार्यक्रम करणे स्वाभाविकच आहे. पण महाराष्ट्र सरकारची ग्राम समृद्धी योजना ही अधिक औचित्यपूर्ण आणि पवार साहेबांचा सार्थ गौरव करणारी आहे. वसंतराव नाईक यांच्याप्रमाणे पवारांचाही त्यांच्या हयातीत असा सन्मान होतो आहे, ही मोठी गोष्ट आहे. 

लोकशाहीत राज्यकर्त्यांनी आपले वाढदिवस साजरे करावेत की नाही? पूर्वीच्या राजे रजवाड्यांप्रमाणे आपल्याच वाढदिवसाला योजना जाहीर कराव्यात की नाही? याची चर्चा होऊ शकेल. पण शरद पवार यांच्या नावाने महाराष्ट्राचं सरकार राज्यातल्या खेड्यापांड्याना समृद्ध करण्याची योजना आणत असेल तर त्याला नावं ठेवण्याची गरज नाही. पवारांचे अनुयायी कल्पक आणि प्रगल्भही आहेत. त्यामुळे जिवंतपणी पुतळा उभा करण्यापेक्षा शरद पवारांना ज्यात आनंद वाटेल अशी योजना त्यांनी सुरु केली असावी. 

शरद पवार एक जितीजागती दंतकथा बनले आहेत. मान्यच करावं लागेल ते. कॅन्सरवर मात करून कैक वर्ष उलटली आहेत. पाय जायबंदी होऊनही हा माणूस हातात काठी न घेता चालतो. वयाची, आजारपणाची पर्वा करत नाही. वादळ येवो, अतिवृष्टी होवो, पूर येवो, भूकंप येवो शरद पवार वादळी वाऱ्यासारखे फिरतात. निवडणुकीत साताऱ्याला भर पावसात झालेली त्यांची सभा गाजली. त्याचं कौतुकही झालं. 'वारा खात, गारा खात, बाभूळ झाड उभंच आहे.' पण कौतुक त्याचं नाही. लातूरला भूकंप झाला, कलेक्टर पोचण्याच्या आत मुख्यमंत्री असलेले शरद पवार किल्लारीला जाऊन पहाटे पोचले होते. कोसळलेली घरे त्यांनी वर्षभरात उभी केली. गावं वसवली. दुःख आणि वेदनांवर मात करत लोकांना उभं केलं. बॉम्ब स्फोटात मुंबई हादरली होती. पवारांनी 24 तासांच्या आत मुंबईचं स्टॉक एक्सचेंज पुन्हा चालू केलं. दंगलीच्या काळात पवार साहेब दिल्लीत स्वस्थ बसू शकले नाहीत. ते मुंबईत धावून आले. मराठवाड्यात नामांतराच्या प्रश्नावरून दंगल पेटली. पोलादी हातांनी त्यांनी दंगल शमवली. आपली सत्ता गमावून. पण मराठवाडा विद्यापीठाचं नामांतरही करून दाखवलं. दोन्ही समाजांची मनं जुळवण्यासाठी पुन्हा शरद पवारच उभे राहिले. 

80 व्या वर्षी त्यांना कुणी सांगितलंय फिरायला? पण ते ऐकायला तयार नसतात. कोकणात वादळ आलं, शरद पवार धावून गेले. अतिवृष्टीत खेड्यापाड्यातली पिकं झोपून गेली, शरद पवार बांधांवर पोचले. सत्तेवर असोत, नसोत पवार ठिकाणावर गेले नाहीत असं झालेलं नाही. ते विरोधी पक्ष नेते असताना मी पाहिलंय.  उरणच्या शेतकऱ्यांवर सरकारचा गोळीबार सुरु असताना धावून जाणारे शरद पवारच होते. शरद पवार हा माणसांचा माणूस आहे. फक्त नेता नाही. नेते खूप असतात. पण माणसात माणूस म्हणून राहणारे, माणूस माणूस समजून घेणारे शरद पवार एकच असतात. जात, पात, धर्म, प्रांताच्या सीमा ओलांडून माणुसकीच्या बांधावर ते उभे असतात. 

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना त्यांचा वाटा देणारे शरद पवार, मंडल आयोगाची अंमलबजावणी करणारे शरद पवार, मुस्लिम ओबीसींना सवलती देणारे शरद पवार, भटक्या विमुक्तांच्या पाठीशी उभे राहणारे शरद पवार, शेल्टी हत्याकांडानंतर आदिवासींच्या पाड्यावर जाणारे शरद पवार, आदिवासी हितांच्या बाबत यत्किंचितही तडजोड न करणारे शरद पवार. असे शरद पवार आपण जेव्हा पाहतो तेव्हा त्यांना केवळ ग्रेट मराठा लीडर का म्हटलं जातं कळत नाही. शरद पवारांच्या विकासाच्या मॉडेलबाबत अनेकदा टीका झाली आहे. राजकारणातील त्यांच्या घटापटाच्या डावांबद्दलही लिहलं गेलं आहे. त्यांनी दिलेले शह, काट शह देशभरात चर्चेत राहिले आहेत. पत्रकारितेत असताना मी त्यांच्या राजकीय निर्णयांवर अनेकदा कठोर टीका केली आहे. पण हे कबुल केलं पाहिजे की, या सगळ्यातून उरतात ते शरद पवार ज्यांच्यात एक कमालीचा माणूस प्रेमी राजकीय नेता फक्त दिसतो. विचाराने ते पक्के सत्यशोधक आहेत. इहवादी आहेत. कर्मकांडांपासून कोसो दूर राहतात. राजकारणातल्या माणसाला या गोष्टी सहज जमणं शक्य नसतं. हमीद दलवाईंना त्यांच्या उपचारासाठी आपल्या घरात ठेवणारे शरद पवार, फारुख अब्दुलांच्या मुलाचं उमरचं आपल्या घरात मुलासारखं संगोपन करणारे शरद पवार, पहिल्याच  मुलीनंतर  विचारपूर्वक कुटुंब नियोजन करणारे शरद पवार, मोतीराज राठोड, लक्ष्मण माने यांना प्रतिष्ठा देणारे शरद पवार, दलित, मुस्लिम, ओबीसी प्रश्नांकडे आणि नेतृत्वाकडे समन्यायाने पाहणारे शरद पवार, प्रकाश आंबेडकरांच्या भेटीसाठी राजगृहावर जाणारे शरद पवार, मृणाल गोरेंच्या आजारपणात त्यांची विचारपूस करायला जाणारे शरद पवार, दिल्लीत हरवलेल्या महाराष्ट्रातील स्त्री चळवळीतील कार्यकर्त्यांच्या मदतीसाठी रात्रभर जागणारे शरद पवार, किती गोष्टी सांगता येतील. 

विरोधी पक्षांशी सन्मानाने वागणं. त्यांचं काम प्राधान्याने करणं. ही महाराष्ट्राची एक खासियत आहे. संस्कृती आहे. यशवंतराव चव्हाणांची ती देणगी आहे. बॅ. ए. आर. अंतुलेंपासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंतच्या महाराष्ट्राच्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी ती परंपरा पाळली आहे. अगदी विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही अपवाद नाहीत. पण या परंपरेचं मूर्तिमंत प्रतिक म्हणून जर कुणाला पाहायचं असेल तर ते शरद पवारांनाच पाहावं लागेल. शरद पवारांच्या भांडवली विकासाचं मॉडेल कदाचित मान्य होणार नाही. पण ग्राम विकासाला आणि सहकाराला काळाप्रमाणे बदलण्याची ताकद फक्त शरद पवारांकडेच होती आणि आहे. कोकणात फुललेल्या फळबागा आणि सोलापूरच्या पर्जन्य छायेखालील प्रदेशात फुललेल्या सीताफळाच्या बागा ही शरद पवारांचीच देणगी आहे. म्हणून असेल कदाचित शरद पवारांच्या नावाने ग्राम समृद्धीची योजना सरकारने ठरवली असेल. 

80 वर्षांचं आयुष्य आणि 60 वर्षांचं राजकारण. भाजप, काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादी हा तसा लहान पक्ष. तुलनाच करायची तर सेनेपेक्षाही कमी आमदार. एका राज्याची त्याला मर्यादा आहे. पण शरद पवारांना ती नाही. श्रीनगरपासून चैन्नईपर्यंत आणि अहमदाबादपासून कलकत्यापर्यंत शरद पवारांचा राजकीय दबदबा मोठा आहे. 6 दशकांच्या राजकारणात तो अबाधीत राहिलेला आहे. देशातल्या उद्योगपतींना आणि खेड्यातल्या शेतकऱ्यांना एकाच वेळी दोघांनाही शरद पवार आपला माणूस वाटतात. ही पवारांची खासियत आहे. 

युपीएचं चेअरमन पद मिळण्याची चर्चा आज काल वर्तमानपत्रात आहे. त्यात तथ्य किती ते माहित नाही. पण शरद पवार कधीतरी पंतप्रधान होतील असं महाराष्ट्रातील अनेकांचं स्वप्न आहे. ते आधीच व्हायला हवे होते. ती संधीही होती. शरद पवार जेव्हा विरोधी पक्षात होते, तेव्हा त्यांनी देशातल्या तमाम डाव्या, पुरोगामी आणि प्रादेशिक पक्षांची मोट बांधली होती. त्या सगळ्या पक्षांचे तेच नेते होते. राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर शरद पवार पुन्हा काँग्रेसमध्ये परतले. ते परतले नसते तर देवेगौडा आणि गुजराल यांच्याऐवजी शरद पवार पंतप्रधान झाले असते. पवारांनी त्यावेळी घेतलेला निर्णय हा यशवंतराव चव्हाणांपासून ते महाराष्ट्रातल्या त्यांना मानणाऱ्या नेत्यांच्या दडपणाचा तो भाग होता. महाराष्ट्रातील साखर कारखाने, सहकारी चळवळ आणि ग्रामीण नेतृत्व या प्रत्येकाचं प्रेशर होतं शरद पवारांवर. त्यामुळे शरद पवारांनी स्वतंत्रपणे पुढे जाण्याऐवजी काँग्रेसमध्ये घरवापसी केली. आणि तीच मोठी चूक ठरली. अन्यथा ते देशाचे अनेक वर्ष नेतृत्व करताना दिसले असते. शरद पवार अगदी तरुणपणात मुख्यमंत्री झाले. ते काँग्रेसमुळे नव्हे, तर एस. एम. जोशींमुळे. जनता पक्षाच्या पाठिंब्यामुळे. जनता पक्षातल्या संघीय नेतृत्वाकडे महाराष्ट्र जाऊ नये म्हणून एस. एम. जोशींनी शरद पवारांना सोबत घेतलं आणि नेतृत्व दिलं. शरद पवारांना तेव्हा समाजवादाचं आकर्षण होतं. राष्ट्र सेवा दलामुळे असेल. एस. एम. जोशींना त्यामुळे पवारांबद्दल कायम ममत्व वाटलं. शरद पवारांनीही आयुष्यभर एस. एम. जोशींबद्दल कृतज्ञता बाळगली. तीच वाट त्यांना पुढे पंतप्रधान पदापर्यंत घेऊन जाऊ शकली असती. पण तसं झालं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसपासून त्यांचा पुन्हा तो प्रवास सुरु झाला आहे. 

पण पवारांवर मोठाच अन्याय झाला. केवळ पंतप्रधान पदाच्या स्वप्नापुरतं हे मी म्हणत नाही. शरद पवारांना समजून घेण्यात महाराष्ट्र कमी पडला, असं खेदाने म्हणावसं वाटतं. कारणं काहीही असोत. शरद पवारांवर झालेला हा अन्याय त्याला महाराष्ट्राचं राजकारण जितकं कारण आहे, महाराष्ट्रातील माध्यमं आणि बुद्धिजीवी वर्ग जितका कारण आहे, तितकंच कारण शरद पवार स्वतःही आहेत. शरद पवारांमधल्या राजकारण्याने ज्यांना महाराष्ट्र पुरुष म्हणता येईल अशा एकमेव शरद पवार नावाच्या नेत्यावर अन्याय केला आहे. 

शरद पवारांचं मला भावतं ते त्यांच्यातलं माणूसपण. त्यांच्यातला सत्यशोधक. आणि सामाजिक न्यायाच्या प्रति असलेली त्यांची निष्ठा. शरद पवारांकडे हे सारं आलं कुठून? एकच उत्तर आहे, शारदाबाई गोविंदराव पवार. त्यांच्या आई. 

देशाच्या इतिहासात महामानवांची चर्चा खूप होते. पराक्रमी पुरुषांच्या गाथा खूप लिहल्या जातात. शिल्पकार सारे देशाचे असोत किंवा राज्याचे असोत किंवा विशिष्ट्य समाजाचे शिल्पकार फक्त पुरुषच ठरवले जातात. पण देशातल्या महामानवींचा इतिहास जिथे लिहला जात नाही, तिथे राज्याराज्यातल्या कर्तबगार स्त्रियांचं चरित्र कोण लिहणार? 'मेकर्स ऑफ इंडिया' या पुस्तकात डॉ. रामचंद्र गुहा यांनी महाराष्ट्रातील ताराबाई शिंदेंचा समावेश केला आहे. अजून काही स्त्रियांचा खरं तर त्यांनी समावेश करायला हवा होता. जगभरच्या स्त्रीयांच्या हक्काचे कायदे बदलायला भाग पाडणाऱ्या डॉ. रखमाबाईंचा उल्लेखही रामचंद्र गुहांनी केलेला नाही. तिथे महाराष्ट्र घडवणाऱ्या स्त्रियांची चर्चा होताना कशी दिसेल? जिजामाता आणि सावित्रीबाई फुले किंवा अहिल्याबाई यांचं आपण नाव घेतो. पण त्या झाल्या महामानवी. महाराष्ट्र ज्यांनी घडवला त्यात अनेक लखलखत्या स्त्रियांची चरित्र लिहली गेली पाहिजेत. ती सांगितली जात नाहीत. संख्येने भल्या त्या मोजक्या असतील. पण महाराष्ट्र घडवणाऱ्या त्या स्त्रियांच्या यादीत सत्यशोधक शारदाबाई गोविंदराव पवार यांचं नाव आवर्जून सांगावं लागेल. महाराष्ट्र घडवण्याऱ्यांमध्ये शारदाबाईंचाही एक वाटा होता. तसा महाराष्ट्राला शरद पवारांसारखा नेता शारदाबाईंमुळेच मिळाला. केवळ जन्माने नाही. शारदाबाईंनी त्यांना घडवलं. पवार साहेबांचा आज गौरव करताना शारदाबाईंना विसरून चालणार नाही. 

- कपिल पाटील
(कार्यकारी विश्वस्त - राष्ट्र सेवा दल, आमदार - मुंबई शिक्षक मतदार संघ, अध्यक्ष - लोक भारती.)

Friday, 11 December 2020

दिलीपकुमारांच्या त्या एका कॉलने भारत-पाक युद्ध टळलं


दिलीपकुमार म्हणजे चित्रपटसृष्टीतले महानायक.

अत्यंत संयत अभिनयासाठी प्रसिद्ध. ते अभिनय करतात असं कधी वाटतच नाही. अमिताभ बच्चन पासून शाहरुख खान पर्यंत प्रत्येकावर दिलीपकुमार यांचा ठसा आहे.

भारतीय अभिनयाचा मानदंड म्हणजे दिलीपकुमार.  

गेली 30 ते 40 वर्ष अमिताभ बच्चन भारतीय सिने सृष्टी व्यापून आहेत. त्यांच्या तितक्याच श्रेष्ठ दर्जाच्या अभिनेत्री असलेल्या पत्नी खासदार जया बच्चन यांना एकदा विचारलं, भारतीय सिने सृष्टीचा महानायक कोण? अमिताभ बच्चनच ना? त्या म्हणाल्या, 'नाही. दिलीपकुमार. फक्त दिलीपकुमार.' 

पण अभिनय एवढीच काय ती दिलीप कुमार यांची ओळख नाही. माणुसकीने ओतप्रोत भरलेला हा अभिनय सम्राट तितकाच रसिक वाचक आहे. इंग्रजी, हिंदी, उर्दू, पंजाबी आणि मराठी या पाच भाषांवर त्यांचं प्रभुत्व आहे. त्यांच्याकडे विपुल ग्रंथ भंडार आहे.

दिलीप कुमारांचं कुटुंब पेशावरवरुन आलं नाशकात. देवळाली जवळ राहिलं. नाशिककडचं कुणी भेटलं की ते नाशिकच्या ढंगातलं मराठी आवर्जून बोलतात. मराठीतली अनेक गाणी त्यांना तोंडपाठ आहेत. तमाशा त्यांच्या आवडीचा. अनेक लावण्या त्यांना मुखोद्गत आहेत. मूड मध्ये असले की अगदी तालासुरात ते लावणी गात.

मला एकदा ते म्हणाले, 'मी मराठी बोलतो ती नाशिककडची. मुंबई, पुण्याची मराठी मला काही नाही जमत.'

खूप आधीची गोष्ट. औरंगाबादला त्यांचं शुटींग सुरु होतं. त्यांना कळलं डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुभेदारी गेस्ट हाऊसला आले आहेत. ते बाबासाहेबांना जाऊन भेटले. खूप बोलले. खूप गप्पा मारल्या. बाबासाहेब त्यांना म्हणाले, 'मुस्लिम समाजातल्या दुबळ्या वर्गासाठी काही करा.'

दिलीपकुमार मला म्हणाले, 'तेव्हा मला नाही जमलं. पण मुस्लिम ओबीसींच्या प्रश्नावर काम करताना माझ्या मनात आंबेडकरांची ती याद होती.'

इस्लाममध्ये जात पात नाही. भेदभाव नाही. पण भारतीय मुस्लिम समाजात त्याच जाती पाती आहेत. बिरादरी आहेत. मुस्लिम समाज हा जातीग्रस्त भारतीय समाजाचा अभिन्न अंग आहे. इथे आलेल्या सगळ्या धर्मांना जाती व्यवस्थेने गिळून टाकलं आहे. जातीचा संबंध नसलेल्या धर्मांना जाती व्यवस्थेची तडजोड करावी लागली. धर्मांतरं झाली पण जात्यंतरं झाली नाहीत. जाती तशाच राहिल्या. त्यामुळेच मंडल आयोगाने ओबीसींच्या यादीत अनेक मुस्लिम जातींचा समावेश केला. त्यांना आरक्षण मिळावं म्हणून मुस्लिम ओबीसींची चळवळ उभी राहिली. वरिष्ठ मुस्लिम वर्गीयांकडून आधी विरोध झाला. पण दिलीपकुमार ठामपणे उभे राहिल्यानंतर विरोध संपुष्टात आला. महाराष्ट्रात ठिकठिकाणी परिषदा झाल्या. लखनौ, दिल्ली, हैदराबाद. प्रत्येक ठिकाणी स्वतः दिलीप कुमार गेले. मुस्लिम ओबीसींना सवलती देण्याचा निर्णय शरद पवार यांनी प्रथम घेतला तेव्हा, मुस्लिम ओबीसींच्या सवलती आणि सर्टिफिकेटचा प्रश्न विलासरावांनी सोडवला तेव्हा आणि युतीच्या काळात रद्द झालेल्या सवलती गोपीनाथ मुंडे यांनी पुनर्स्थापित केल्या तेव्हा त्यामागची खरी ताकद दिलीपकुमार यांचीच होती. शब्बीर अन्सारी, हसन कमाल, जहीर काझी, मी आम्ही सारे त्या चळवळीत होतो. पण दिलीपकुमार पाठीशी नसते तर मुस्लिम ओबीसींना न्याय मिळाला नसता. हिंदू ओबीसी आणि मुस्लिम ओबीसी एक कसे आहेत, एका जातीचे, एका बिरादरीचे कसे आहेत हे त्यावेळी मुख्यमंत्री असलेले शरद पवार यांना सांगताना दिलीपकुमार म्हणाले, 'छगन भुजबळ माळी आहेत आणि मी बागवान. म्हणजे माळीच. जात एक. सवलत त्यांना मिळते मग बागवानाला का नको?' शरद पवार आणि छगन भुजबळ यांचे डोळे त्याक्षणी विस्मयचकीत झाले होते. 

दिलीप कुमारांकडे, ही प्रेरणा आणि हिम्मत आली कुठून?  मी एकदा विचारलं. तेव्हा त्यांनी मला सुभेदारी गेस्ट हाऊस मधला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटीचा प्रसंग सांगितला. त्यांच्या सामाजिक जाणिवांच्या मागची प्रेरणा होती डॉ. आंबेडकर.  त्या आधीचा आणखी एक प्रसंग आहे. मुंबई विद्यापीठ अंतर्गत फुटबॉल टूर्नामेंटमध्ये दिलीपकुमार खालसा कॉलेजकडून खेळत होते. सामना जिंकल्यावर टीमच्या कॅप्टनने बाबूने संध्याकाळी सगळ्यांना घरी जेवायला बोलावलं. बाबूने स्वतः कोंबडी शिजवली होती. पण जेवायला फक्त दिलीप कुमार पोचले. टीम मधले अन्य कुणीच आलं नाही. दिलीप कुमारांनी बाबूला विचारलं, 'अरे इतर कुणी का नाही आले?' विजेत्या टीमचा कॅप्टन बाबू म्हणाला, 'युसुफ भाई मी दलित महार आहे. माझ्या हातचं ते कसं खातील?' तो प्रसंग सांगताना दिलीप कुमारांच्या डोळ्यात पाणी होतं. गळा भरलेला होता.

आणखी एक प्रसंग आहे. अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान होते. तर पाकिस्तानात नवाज शरीफ. भारत - पाकिस्तान समोरासमोर ठाकले होते. प्रसंग मोठा बाका होता. अचानक बांद्रा पाली हिलला दिलीपकुमार यांच्या घरात फोन खणखणला. खुद्द वाजपेयी साहेब बोलत होते. त्यांनी तातडीने दिल्लीला बोलावलं. डॉ. जहीर काझी यांना घेऊन दिलीपकुमार थेट दिल्लीला पोचले. जहीर काझी हे त्यांचे जवळचे डॉक्टर, मित्र. जहीर काझींच्या घरात आणि सासरी स्वातंत्र्यसैनिकांची समाजवादी परंपरा. काझींचे सासरे मोहिद्दीन हॅरिस दिलीप कुमारांचे मित्र. त्यामुळे काझींवर दिलीप कुमारांचा फार भरवसा.

वाजपेयींनी दिलीप कुमारांना सांगितलं, की तुम्ही हे करु शकता? थेट नवाज शरीफांना फोन गेला. पलिकडे दिलीप कुमारांचा आवाज ऐकून नवाज शरीफ एकदम चाट पडले. ते दिलीप कुमारांचे प्रचंड फॅन. त्यांचे अनेक सिनेमे, डॉयलॉग आणि गाणी त्यांना पाठ. दिलीप कुमारांच्या शब्दांने जादू केली आणि पुढचं भयावह युद्ध थांबलं. अटलबिहारी वाजपेयींचं मोठेपण हे की त्यांना ते अचूक सुचलं. दिलीप कुमारांची शिष्टाई कामाला आली. 

मुस्लिम ओबीसींच्या आंदोलनामुळे दिलीपकुमार, शब्बीर अन्सारी, हसन कमाल, डॉ. झहीर काझी या सगळ्यांशी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची दोस्ती जमली. राज्यसभेची निवडणूक होती. मायनॉरिटी कोट्यातून बरेच काँग्रेसजन प्रयत्नात होते. पण विलासरावांना वाटत होतं की दिलीपकुमारांनी राज्यसभेवर जावं. त्यांनी दिलीपकुमारांशी मला बोलायला सांगितलं. दिलीपकुमार म्हणाले, 'अरे या निवडणूकीत घोडेबाजार होतो. मी कुठून पैसे आणू?' मी विलासरावजींना फोन लावून दिला. ते मस्त हसले. त्यांना म्हणाले, 'दिलीपसाब आप को कुछ नही करना है, जिम्मेदारी मेरी है.' विलासरावजी त्याच दिवशी दिल्लीला निघाले होते. सोबत प्रदेशाध्यक्ष गोविंदराव आदिक होते. आदिक स्वतःच्या प्रयत्नात होते. दिलीपकुमारांचं नाव सांगताच सोनिया गांधी यांनी आनंदाने मान्य केलं. 

विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. त्यावेळी मंत्रीमंडळात स्थान मिळावं म्हणून आमदार असलेले हुसेन दलवाई यांनी बरेच प्रयत्न केले होते. पहिल्या पाचात त्यांचा समावेश झालाही. पण तोही एक मोठा किस्सा आहे. सोनिया गांधींनी दिलीपकुमार यांना विचारलं, 'हुसेन दलवाई हे नाव कसं आहे?' दिलीप कुमारांच्या डोक्यात सिनिअर हुसेन दलवाई होते. म्हणजे वसंतदादा पाटील यांच्यासोबत मंत्रिमंडळात असलेले. दिलीप कुमारांचे ते जुने मित्र. त्यांनी एका क्षणात सोनियाजींना सांगितलं, 'हुसेन दलवाई बिलकुल चांगला माणूस आहे. राष्ट्र सेवा दलात वाढलेला आहे. सज्जन आहे. बिलकुल त्यांना करा.' हुसेन दलवाई हे नाव पक्कं झालं. पण तेव्हा त्याच कुटुंबातले एक ज्युनिअर हुसेन दलवाई हे दिलीप कुमारांना माहित नव्हते. ज्युनिअर हुसेन दलवाई म्हणजे युक्रांदवाले. अलीकडच्या काळात राज्यसभेवरही होते ते हुसेन दलवाई. हमीद दलवाई यांचे भाऊ. त्यावरून काँग्रेसमधल्या काही मुस्लिम नेत्यांनी दिल्लीत आक्षेप घेतला. तेव्हा दिलीपकुमारांनी मला विचारलं, 'अरे माझ्या डोक्यात ते सेवा दलाचे हुसेन दलवाई होते. हे हुसेन दलवाई कोण?' मी म्हटलं, 'हे युक्रांदवाले.' ते म्हणाले, 'हे मला माहित नव्हते. मला वाटलं हे सेवा दल वाले हुसेन दलवाई आहेत. म्हणून मी सोनियाजींना तात्काळ हो म्हटलं.' मी हसलो. आणि म्हटलं, 'तुमची जुन्या हुसेन दलवाईंसोबत कशी दोस्ती?' ते म्हणाले, 'ते हुसेन दलवाई माझे जुने मित्र. जुन्या सेवा दलातल्या बऱ्याच लोकांना मी व्यक्तिगत ओळखतही होतो. त्यामुळे माझ्या  डोळ्यात ते नाव राहिलं.' ते सिनियर हुसेन दलवाई या हुसेन दलवाईंचे काकाच. चिपळूणमधलेच. आणि सेवा दलाच्या पहिल्या पिढीतले. कोकणामधली बहुतेक मुस्लिम मंडळी सेवा दलात सुरवातीपासून होती. आणि त्यांचं आणि सेवा दलाचं योगदान दिलीप कुमारांना माहित होतं. त्यामुळे त्यांनी मोठ्या प्रेमाने सोनियाजींना शिफारस केली होती. 


दिलीप कुमारांचं प्रेम हा माझ्यासाठी फार मोठा ठेवा आहे. भेंडी बाजारात घांची म्हणजे मुस्लिम-तेली समाजाच्या पुढाकाराने झालेल्या ओबीसी मेळाव्यात त्यांच्या हातून झालेला सत्कार मी कधीच विसरू शकणार नाही. लखनौच्या मुस्लिम - ओबीसी परिषदेत माझ्याबद्दल ते किती प्रेमाने बोलले. औरंगाबाद, जालना दिलीपकुमार असले की मोठ्या सभा होत. त्यांच्या सोबतीचे हे क्षण विसरता येणार नाहीत. 

दिलीपकुमार यांच्या या दीर्घ आयुष्यात त्यांना साथ आहे ती सायरा बानोंची. त्या त्यांच्या धर्मपत्नी. पण आता जणू त्यांच्या आई बनल्या आहेत. लहान मुलासारखी त्या दिलीप कुमारांची काळजी घेतात. दिलीप कुमारांच्या अनेक सामाजिक उपक्रमात भाग घेतात. लोकांना मदत करतात. सायरा बानोंनी आपलं सगळं आयुष्य दिलीप कुमारांना समर्पित केलं आहे. अभिनेत्री म्हणून त्या मोठ्या आहेतच. पण जीवनसाथी म्हणून आणखी मोठ्या आहेत. सतत त्यांच्या सोबत राहतात. एक क्षणही अंतर देत नाहीत. वय 98 झालंय. फिरणं मुश्किल आहे. Bedridden आहेत. आठवणी पुसल्या जात आहेत. त्यांचा शेवटचा कार्यक्रम म्हणजे ताज एंडला झालेल्या रितेश देशमुख आणि धीरज देशमुख यांच्या रिसेप्शनला ते आले होते. मला पाहताच त्यांनी माझा जो हात पकडला ते माय फ्रेंड कपिल, कपिल करत. ते हात सोडायलाही तयार नव्हते. मोठ्या मुश्किलीने मी त्यांचा हात हळूच काढून पुन्हा सायराजींच्या हातात दिला. तो प्रसंग मला आठवला की आजही गलबलल्या सारखं होतं. कारण दिलीपकुमार हरवत चालले होते. 

दिलीपकुमार तर सिनेमातला मोठा माणूस आहेच. पण त्यांच्यातला माणूस, त्यांच्यातला देशभक्त त्याहून खूप मोठा आहे. ते विचाराने पक्के समाजवादी. पक्के सेक्युलर आणि तितकेच आधुनिकही. मुस्लिम समूहातल्या पस्मांदा तबक्यासाठी त्यांनी दिलेले योगदान अफाट आहे. हिंदू-मुस्लिम एकीसाठी त्यांचं योगदान मोलाचं आहे. 

देशाच्या चित्रपट विश्वातील हा महानायक भारतरत्न किताबाच्या पात्रतेचा आहे. तो किताब मिळेल न मिळेल पण त्यांचं काम त्या तोलामोलाचं आहे हे नक्की. आज 11 डिसेंबर. दिलीप कुमारांचा जन्मदिन. दिलीपकुमार आणि सायरा बानो या दोघांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना आणि सलाम!

- कपिल पाटील
(कार्यकारी विश्वस्त - राष्ट्र सेवा दल, आमदार - मुंबई शिक्षक मतदार संघ, अध्यक्ष - लोक भारती.)